Friday, 4 June 2021

मी जुंदरी.....आणि माझा जुन्नर....!

 

मी जुंदरी.....आणि माझा जुन्नर....!

दंडकारण्य असलेला भुभाग जेव्हा नागरी वस्तीखाली येऊ लागला, तेव्हा महाराष्ट्र नावाचा प्रदेश भौगोलिक दृष्ट्या अस्तित्वात आला. सातवाहन राजे हे महाराष्ट्राचे पहिले राजे. साधारण २५०० वर्षापूर्वीचा कालखंड असेल तो. महाराष्ट्र तेव्हा समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि तगर (आताचे तेर), जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही काही व्यापारी केंद्रे. त्या काळी जगभरातील व्यापारी, कल्याण, नालासोपारा बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत. तेव्हाचे नाणे घाटातील कर आकारणीचे दगडी रांजण आजही इतिहास जीवंत करत; नाणे घाटात विराजमान आहेत. म्हणजे कल्याण- नाणेघाट- जुन्नर- नगर- पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. मग साहजिकच या मार्गावरील जुन्नर, बोरी, नगर, पैठण सारख्या बाजारपेठा तेव्हापासूनच प्रसिध्द होत्या. हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी म्हणुन या व्यापारीमार्गाच्या संरक्षणासाठी त्या त्या वेळच्या राजवटींनी ठिकठिकाणी सैनिकी चौक्या उभारल्या ज्या काळासोबत किल्ल्यांच्या स्वरुपात बदलत गेल्या. नाणेघाट मार्गे येत असताना, जुन्नरच्या  डोंगराळ भागातुन जाताना लुटमारीपासुन बचाव करण्यासाठी भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी, नारायणगड, शिंदोळा या सारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली. 

  


 

देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे, म्हणुनच जुन्नरमध्ये डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी उत्खनन करत असताना ग्रीक लोकांची देवता "युरोस" ची मुर्ती सापडते, चीनी भांडी, जुनी नाणी, सोन्याचा मोहरा, शीला लेख असे खुप काही सापडते. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत. त्यामुळे प्रत्येक धर्माची, धर्मपिठाची भरभराट जुन्नर परिसरात झाली. भौगोलिक अनुकूलता आणि त्याला राजाश्रायासोबत लोकाश्रय पण जुन्नर परिसरात मिळत गेला. आणि म्हणुनच जुन्नरमध्ये भारतातील सर्वात जास्त म्हणजे ३५० च्या आसपास लेणी खोदल्या गेल्या. 



लेण्याद्री, तुळजा लेणी, भीमाशंकर लेणी, भूतलिंग लेणी, आंबा अंबिका लेणी, सुलेमान लेणी, तसेच जवळपास सर्वच किल्ल्यांवरील लेणी समूह अशा विविध ठिकाणी या ३५० लेण्या विभागलेल्या आहेत. प्राचीन जैन मंदिर उभारले गेले, मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली, पेशवे काळात ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला, ओतुर सारख्या ठिकाणी वैष्णव पंथाचा रामकृष्ण हरी हा मंत्र, संत तुकारामांना त्यांचे गुरु चैतन्य महाराजांनी दिला, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला आळे गावी समाधी दिली, पिंपळगाव धरणाजवळ खुबी गावात, कळू नदीच्या काठावर; खिरेश्वराचे मंदिर, पूर गावात कुकडी नदीच्या उगस्थानाजवळ हेमाडपंती कुकडेश्वर मंदिर आणि मीना नदीच्या काठावर वडज गावाजवळ पारुंडे या ठिकाणी ब्रम्हनाथी मंदिराची निर्मिती झाली



हि सगळी मंदिरे यादव राजा झंज याच्या काळात उभारण्यात आलीत. खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्र गडाची अभेद्य वास्तू उभी राहिली. काळाच्या ओघात खुप काही बदलत गेले, अनेक राजवटी आल्या..गेल्या...वैभव ओसंडून वाहू लागले आणि त्याला आटही आली. शेकडो वर्ष वैभव अनुभवत असलेले लोक कधी गुलामगिरीत ढकलले गेले, तर कधी दुसऱ्याच्या दरबारात चाकरी करण्यात धन्यता मानु लागले. कुणबी, बलुतेदार नाडले जाऊ लागले. ..आणि एका योग्य वेळी जन्माला आला एक  मुलगा, चारचौघा सारखा सामन्यच पण असामान्य स्वप्न घेऊन. फेब्रुवारी १६२८, ठिकाण शिवनेरी किल्ला, शिवबा. सर रिचर्ड टेंपल यांनी शिवनेरी बद्दल ऐके ठिकाणी लिहिले आहे की “युगपुरुष जन्मायला अत्यंत आदर्श जागा म्हणजे शिवनेरी”. वयाचे ६ वर्ष शिवाजी महाराज या शिवनेरी किल्ल्यावर राहिले. तिथल्या शिवाई देवीच्या मंदिरात जिजामाता आणि शिवबा रोज जात असत. आजही ती तेजोमय शिवाई देवीची मुर्ती तशीच आहे..आणि आपण तिथे नतमस्तक होताना नकळत तिथली धूळही कपाळाला लावतो. 



तेव्हाचे भविष्य आजचा इतिहास बनलाय आणि अनेकांचे स्फुर्तीस्थान सुद्धा. जुन्नर आणि कलेचे, सुधारणांचे फार पूर्वीपासूनचे नाते आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या “शेतकऱ्याचा आसूड” मध्ये जुन्नर कोर्टाच्या निकालाचा उल्लेख आहे, ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट, मुक्तांगण, कवी, लेखक, विचारवंत, अनिल अवचट, एक संवेदनशील व्यक्तिमत्व जुन्नरचेच, मंगल गाणी दंगल गाणी आणि मराठी बाणाचे अशोक हांडे, शिवाजी पुन्हा जागविणारे डॉ. अमोल कोल्हे जुन्नरचेच, तमाशा लोककला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या विठाबाई नारायणगावकर, दत्ता महाडिक जुन्नरचेच, “टिंग्या” चित्रपटातून जगभर कीर्ती मिळवणारे मंगेश हाडवळे जुन्नरचेच, मराठी मालिका क्षेत्रात स्वतचे स्थान निर्माण करणारी नम्रता आवटे जुन्नरचीच. जुन्नरला आधी जीर्णनगर मग जुन्नेर आणि नंतर जुन्नर असे नाव बदलत गेले. 



जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भुभाग आहे. त्यामुळे इथल्या डोंगर कड्यातील माळशेज घाट, नाणे घाट, दऱ्या घाट त्यांचा अक्राळविक्राळ पणा आणि अभेद्यता डोळ्याचे पारणे फेडणारी असते. आंबा, केळी या फळांचे मूळ ठिकाण इंडो बर्मा भागात आहे, त्याचे मूळ बीज तिथे सापडते. अगदी तेच मूळ बीज माळशेज घाटात सुद्धा सापडते. प्राणी पक्षांवर नेहमीच भूतदया दाखविणाऱ्या जुन्नरमध्ये माणिक डोह धरणाच्या पायथ्याला बिबट्या निवारा केंद्र उभारण्यात आले असुन आजमितीला जवळपास ३६ बिबट्या त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. समुद्र सपाटीपासून २२६० फुट उंचीवर असणाऱ्या या जुन्नरच्या पठाराला भारताचे पहिले वनरक्षक डॉ. अलेक्झांडर गीबसन यांनी भारताचे आरोग्य केंद्र म्हटले आहे. इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचे निरीक्षण होते. म्हणुनच ब्रिटीश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत असत. त्यांनी जुन्नरमध्ये हिवरे बुर्दृक या ठिकणी १८३९ साली वनस्पती उद्यान उभारले होते. गिब्सन भाऊंच्या मुल देशात म्हणजे स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयात २०० वर्षापूर्वीच्या शेती अवजारांच्या प्रतिकृती आजही मांडलेल्या आहेत. 



त्या काळाच्या १९९५ साली जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण जुन्नरमधील खोडद या गावी उभारण्यात आली, यामुळे जुन्नरचे भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे स्थान म्हणुन अधोरेखित झाले. सोबतीला अर्वीचे उपग्रह भूकेंद्र, आणे घाटातील नैसर्गिक पुल, बोरी गावात कुकडी नदीच्या पात्रात आढळणारी ८ लाख वर्ष जुनी टेफ्रा हे सारे जुन्नरचे भौगोलिक महत्व अजुनच वाढवत आहेत. शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा जुन्नर; भाजीपाला, फळफळावळ, दुध दुभते, अगदी भात ते ज्वारी, द्राक्ष ते डाळिंब, ऊस ते ग्रीन हाउस मधील भाजीपाला आणि फुले अशी विविध प्रकारची शेती जुन्नरमध्ये केली जाते. गंमत म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असलेला तालुका म्हणुन जुन्नरचा नावलौकिक आहे. 



पिंपळगाव जोगा, माणिक डोह, यडगाव, चीलेवाडी पाचघर, आणि वडज ही ५ धरणे जुन्नरमध्ये आहेत, संततधार पडणाऱ्या पावसापासून ते अवर्षणग्रस्त भागापर्यतचा भुभाग जुन्नरमध्ये आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर; राहण्यासाठी, फिरण्यासाठी, आरामासाठी आणि पर्यटनसाठी जुन्नर हे अतिशय उपयुक्त ठिकाण बनले आहे. तसेच जुन्नरमध्ये मिळणारी मटन भाकरी आणि मसाला वडी [मासवडी] हे म्हणजे वर्णन करायचे नाही तर प्रत्यक्ष चाखून बघायचे पदार्थ आहेत. जुन्नमधील ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक, धार्मिक, शेती, राहणीमान, जीवन शैली, खानपान याविषयी खुप काही लिहिता येईल, अगदी प्रत्येक मुद्य्यावर एक पुस्तक तयार करता येईल. जुन्नरचे हे सारे पर्यटन वैभव जतनाचे काम “जुन्नर पर्यटन विकास संस्था” मार्फत सुरु आहे. जुन्नरमधील संस्कृती जतनाचे, किल्ले संवर्धनाचे अतुलनीय काम “शिवाजी ट्रेल” च्या माध्यमातुन सुरु आहे. मागील १० वर्षांमध्ये जुन्नरची जबाबदार पर्यटन चळवळ खूप छानप्रकारे रुजली आहे..रुजत आहे. २१ मार्च २०१८ रोजी, महाराष्ट्र शासनाने, जुन्नरला विशेष पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला. 



जुन्नरच्या जबाबदार पर्यटन चळवळीत द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव ते तालुका स्तरावरचे महोत्सव बनले. इथल्या पर्यातान्न विकासात स्थानिक लोकांचा खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शेती आधारित पर्यटनाचे एका तालुक्याचे मॉडेल म्हणून जुन्नरकडे बघता येतं. एक जुन्नरकर म्हणुन मला जुन्नरचे  सारे पर्यटन  वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहे. जगभरातुन लोकांनी जुन्नर फिरायला यावे आणि त्यातून जुन्नरमध्ये रोजगार निर्मिती व्हावी. आणि हे सर्व एका शिस्तप्रिय वातावरणात व्हावे, हे माझे स्वप्न आहे. तसेच लोकसहभागाचे आणि पर्यटनातून शाश्वत विकासाचे हे मॉडेल, राज्यभर आणि पुढं देशभर घेऊन जाण्याची इच्छा आहे. आपली हचीको टुरिझम ही संस्था तेच काम करत आहे. ज्या माध्यमातून पर्यटन, प्रशिक्षण व सल्लागार या सेवा पुरवल्या जातात. पराशर कृषी पर्यटन हा त्याचाच एक भाग. येत्या काळात खुप काही चांगले बदल घडतील अशी अपेक्षा आहे. याला साथ हवी ती जुन्नरची आणि जुन्नरमधील सृष्टी सौंदर्याची आवड असणाऱ्या प्रेमींची. लोक जुन्नरकरांना प्रेमाने जुंदरी असं म्हणतात. म्हणुन मला पण स्वतःला जुंदरी म्हणुन घ्यावेसे वाटते ..कारण मी या मातीत जन्माला आलोय आणि मातृभूमीचा शाश्वत विकासाचा विचार सर्वदूर घेउउन जायचा आहे.

मनोज हाडवळे

संस्थापक संचालक

जुन्नर पर्यटन विकास संस्था

हचीको टुरिझम

पराशर कृषी व संस्कृती पर्यटन

9970515438/7038890500

manoi@hachikotourism.in

15 comments:

  1. खूप छान विचार मांडले आहेत जुन्नरबद्दल,जुन्नरचे वैभव जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचाही नक्कीच खारीचा वाटा असेल, आम्ही आपल्या सोबतच आहोत.

    ReplyDelete
  2. मनोजभाऊ खूप उपयुक्त माहिती दिली आणि जुन्नर पर्यटनाबद्दल आपली जबाबदार पर्यटनाची संकल्पना खूुप छान आहे.

    ReplyDelete
  3. मनोजभाऊ,खूप उपयुक्त माहिती दिली आणि जुन्नर पर्यटनात जबाबदार पर्यटनाची संकल्पना खूप छान आहे.आपण जुन्नरच्या.पर्यटनासाठी देत असलेले योगदान खूुप महत्वपूर्ण आहे.

    ReplyDelete
  4. मनोजभाऊ,खूप उपयुक्त माहिती दिली आणि जुन्नर पर्यटनात जबाबदार पर्यटनाची संकल्पना खूप छान आहे.आपण जुन्नरच्या.पर्यटनासाठी देत असलेले योगदान खूुप महत्वपूर्ण आहे.

    ReplyDelete
  5. मला अभिमान आहे मि जुंदरी, घाटी असल्याचा.साहेब आपण दिलेल्या माहिती मुळे नक्कीच नवीन पिढीच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Excellent information 👌

    ReplyDelete
  8. मस्त माहिती मनोज भाऊ

    ReplyDelete
  9. खरोखरच खुप छान वर्णन केले आहे जुन्नरचे खुप खुप धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  10. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण आणि आपल्या सहकारी वर्गाचे आभार

    ReplyDelete
  11. नमो नमः जुंदरी ।

    जुन्नरकरांना जुंदरी म्हणतात हे कळले.



    ReplyDelete
  12. आपला तालुका आपला अभिमान आपला विकास
    मासवडी हा खाद्यप्रकार आपन आपल्या राज्याला दिला
    इतिहासाच्या पाऊल खुना अनंतकाळ टिकनार कारन आपल्या तालुक्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे
    जगाच्याय लोकशाही राज्याची संकल्पना आपल्याच भुमीपुत्राने जगाला दिली छत्रपती शिवाजी महाराज
    मी जुदंरी.

    ReplyDelete
  13. छान माहिती दिली पण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून जुन्नर शिवनेरी ओळखली जाते त्याचा उल्लेख आला नाही .

    ReplyDelete