Tuesday, 13 July 2021

पिठलं

 पिठलं


 घरात ऐनवेळी भाजीला काही नसेल आणि भाजी कशाची करायची हा प्रश्न त्या गृहिणीच्या मनात आला तर हमखास ठरलेली भाजी म्हणजे पिठलं. स्वयंपाक बनवायला उशीर झाला असेल म्हणून इन्स्टंट होणारी कुठली भाजी असेल तर ती असते पिठलं. गावाकडच्या घराघरात या पिठल्याच्या अन चवी आणि त्यासोबत अनेक रेसिपीज आपल्याला ऐकायला, बघायला आणि चाखायला सुद्धा मिळतील. 

म्हणजे पिठलं या शब्दाला घेऊन जर चर्चा सुरू झाली तर जुन्या लोकांकडून ऐकत रहावं असं वाटतं. आता पिठलं बनवलं जातं ते चण्याच्या पिठाचं जे साधारणता पिवळ्या रंगाचं दिसतं, पण त्याही पलीकडे जाऊन हुलग्याचे सुद्धा खूप छान पिठलं बनवलं जातं. पिठल्याला बोली भाषेत बेसन सुद्धा म्हणतात. कधी हटून तर कधी सुक्कं पिठलं, त्यात कांदा, लसुण आन मिरचीचा तडका म्हणजे एकदम झटकाच. त्या पिठल्याला चार चौघात आणायचं म्हटलं तर थोडी मोहरी आणि कोथिंबीर असली की फोटोही छान येतो. अगदी खानदानी पिठलं बनवायचं म्हटलं तर मग ते तीन-चार प्रकारच्या डाळी भाजून दळून, त्यांना चुलीवरच्या पातेल्यामध्ये तुराट्याच्या काड्याने हटून घ्यावं लागतं. पिठल्याच्या जोडीने गरमागरम भाकरी आणि हाताने फोडलेला कांदा असला की सगळं जग विसरायला होतं. पिठलं तसं फार काही ग्लॅमरस डीश म्हणून कधीच नावारूपाला आलं नव्हतं. ऐनवेळी पोटाची खळगी भरण्यासाठी हक्काचं वरदान म्हणजे पिठलं. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचं गरिबांच्या ताटातलं पिठलं आधी म्हणजे अगदी डाऊन मार्केट म्हणता येईल अशा दर्जाचं होतं, ....मग काळ बदलत गेला... हॉटेलिंग वाढलं, लोक गरिबीतून मध्यमवर्गात; मध्यमवर्गातून उच्च मध्यमवर्ग- उच्चभ्रू वर्गात जाऊ लागले, खिशात पैसा खुळखुळू लागला. आणि मग या ना त्या निमित्ताने हॉटेलमध्ये जेवायला जायचं प्रमाण हे वाढत गेलं. ते आजही वाढतच आहे, रेगुलर हॉटेलिंग सोबत घरात जे काही पदार्थ बनवले जात असत, त्याच्यातही पिठलं हळूहळू मागे पडत गेलं. 

आजमितीला शहर असो किंवा गाव,  प्रत्येक घराघरात; साधारण तीन-चार दिवसांच्या फरकाने वेगवेगळ्या खाद्य संस्कृतीतील मेनू बनवले जातात. मग त्यात पंजाबी, राजस्थानी, गुजराती, दक्षिण भारतीय अगदी देशाबाहेर गेले तर चायनीज आणि इतर प्रकारचं जेवण हे घराघरात सर्रास बनवलं जातं खाल्लं जातं. थोडक्यात जे घराघरात रेगुलर बनणारे पदार्थ होते तेच कधीतरी किंवा अगदीच किचनमधून आणि नंतर ताटातून हद्दपार झाले. थोडक्यात काय तर आपल्या घराचं हॉटेल कधी झालं; हे ना बनवणाऱ्याला कळलं न खाणाऱ्याला. एवढेच काय तर टीव्हीवर येणाऱ्या खाद्य पदार्थांच्या जाहिराती, मग त्यात रेडी टू कुक, रेडी टू इट, जेवण बनवता म्हणजे तुम्ही मागास आहात, ऑनलाईन ऑर्डर करा या अशा आशयाच्या जाहिराती टीव्हीवर दिसू लागल्याने;  रेस्टॉरंट जैसी टेस्ट घर मे  याचा सायकॉलॉजिकल परिणाम झाला. म्हणजे असं की लोकांना घरी हॉटेल सारखं जेवण हवं आणि हॉटेलमध्ये गेले की घरगुती जेवण खाणं पसंत करतात.  मागील पाच-सहा वर्षांपूर्वी सामान्य माणसाचं खाणं असणारं पीठलं कधीच मेनूकार्ड मध्ये दिसत नव्हतं. पण मागील पाच-सहा वर्षांपासून पिठलं, मेथी, शेवगाव, ज्वारी-बाजरीची भाकरी, इंद्रायणीचा भात हे असे पदार्थ मेनू कार्ड मध्ये भाव खाऊन जाताना दिसतात. साधारणता 30 पस्तिशी पेक्षा जास्त आणि त्यापुढील वयाची मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर या अशा प्रकारचे पदार्थ ऑर्डर करतात हे बघण्यात आलेलं आहे. हे असं का होत असावं? घर मे हॉटेल की टेस्ट की हॉटेल मे घर जैसी टेस्ट हा मार्केटचा खेळ न संपणारा आहे. असं म्हणतात समाधानाचा, आनंदाचा मार्ग पोटातून जातो, त्या आनंदाच्या शोधात आपण आधी घराचं हॉटेल केलं आणि आता हॉटेलचं घर करू पाहतोय. आपल्या आनंदाचा, समाधानाचा शोध हा कधीही न संपणारा आहे, हा बदल कधीही न बदलणारा आहे. 

मनोज हाडवळे (लेखक हे पर्यटन प्रशिक्षक आणि पर्यटन सल्लागार आहेत)

09970515438

No comments:

Post a Comment