Monday, 31 July 2023

फ्रांस च्या शाळेतील बाई, भारतातील शाळेच्या भेटीला

 


मॅडम, माझी आई मला भेटायला फ्रान्सवरून आली आहे. तिला  4 दिवस ग्रामीण भारत दाखवायचा आहे, तसंच गप्पा मारायला निवांतपणा ही हवा आहे, आम्हाला कुठे जाता येईल हे आपण सांगू शकाल का? सिम्बॉयसिसच्या मृणाल मॅडमला कॅपूसीन या फ्रेंच मुलीचा मेसेज आला.


कॅपूसीन, तिच्या  महाविद्यालयीन शिक्षणाच्या एका कोर्ससाठी, 6 महिन्यांपासून पुण्यात राहत होती. लोला, तिची आई तिला भेटायला पुण्यात आलेली. 


परदेशी लोकं, त्यात दोन्ही महिला अशा परिस्थितीत त्यांना ग्रामीण भारत अनुभवायला सुरक्षित आणि ऑथेंटिक जागा म्हणून मृणाल मॅडम ने आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचं नाव सुचवलं. 


त्यांनी माझा नंबर कॅपुसीन ला दिला. पुढील सोपस्कारासाठी मला कॅपूसीनचा मेसेज आला. मी अमरनाथ यात्रेला गेलो असल्याने कॅपूसीन आणि लोला या मायलेकीला त्यांच्या चार दिवसांच्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रावरील वास्तव्याला नम्रता बघणार होती. 


आपल्या पराशर वरील मंडळींच्या साथीने, 4 दिवसात कॅपूसीन आणि लोला यांनी आजूबाजूचा शेतशिवार, त्यातील पीक पद्धती, महिला शेतकरी,  एक संध्याकाळ शेतकऱ्याच्या घरी, शेतकऱ्याच्या घरचे जेवण, आठवडी बाजार, गावातील ग्रामपंचायतीचे 23 हजार पुस्तकांचे वाचनालय, 49 वर्ष जुनी दुग्ध सहकारी संस्था इत्यादी गोष्टी मोठ्या उत्साहाने पाहिल्या आणि अनुभवल्या. 


माझी 7 वर्षांची मुलगी आहिल्या, ही गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीला जाते. ती जेव्हा शाळेतून आली तेव्हा तिचा गणवेश बघून, लोलाची उत्सुकता चाळवली. त्याला कारणही तसंच होतं, 


फ्रान्समध्ये लोला नर्सरी टीचर होती. तसेच तिचा लहान मुलांची सायकॉलॉजी, त्यांची शिकण्याची मानसिकता, वयोगट आणि परिस्थिती हे विषय तिच्या आवडीचे आणि अभ्यासाचे होते. त्यामुळे साहजिकच ग्रामीण भारतातील शिक्षण पद्धती बघायची ही संधी अहिल्याच्या शाळेच्या भेटीच्या निमित्ताने तिला मिळणार होती. 


लोलाने नम्रता जवळ ही गोष्ट बोलून दाखवली आणि मग दुसऱ्या दिवशी कॅपूसीन व लोला या मायलेकिं सोबत नम्रता अहिल्याच्या म्हणजेच गावातल्या जिल्हा परिषदेत शाळेत गेल्या. 


शाळा अतिशय रम्य परिसरात आणि कौलारू इमारतीची अजूनही एक टिकून आहे. शाळेतील बोलक्या भिंती, स्वच्छ परिसर हा मनमोहुन टाकणारा दिसतो. शाळा आणि शालेय परिसराच्या प्रेमातच लोला वेडी झाली, तिने मुलांची पुस्तकं बघितली. मराठी भाषा जरी कळली नाही, तरी त्यावरील चित्रांच्या माध्यमातून तिला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पद्धती आणि काठिण्य पातळी लक्षात आली. 


मग शिक्षकांशी गप्पा मारत असताना एक एक गोष्ट उलगडत गेली, मग त्यामध्ये शालेय पोषण आहार, शासनाकडून मिळणारा मोफत गणवेश, पुस्तके याविषयी लोलाने मोठ्या आत्मीयतेने माहिती घेतली. 


तिला खरं आश्चर्य वाटलं ते तेव्हा, जेव्हा तिला कळलं शाळा आणि परिसराची स्वच्छता, शाळेतील मुलं स्वतः करतात ते. जगातील कुठल्याही शाळेतील पहिला संस्कार तो स्वयंशिस्त आणि स्वयंस्वच्छता हा असतो, जो खऱ्या अर्थाने आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून दिला जात आहे, हे बघून लोला आश्चर्यचकित झाली. 


ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेत असताना तिला भारतातील गाव, सहकाराची चळवळ, शिक्षण पद्धती या गोष्टींचा प्रत्यक्ष दर्शी अनुभव तर मिळालाच पण त्यासोबत तिने आपल्या मुलीला जोपर्यंत तू पुण्यात आहेस तेव्हा, जेव्हा कधी तुला घराची आठवण येईल तेव्हा इथे आवर्जून येत जा असं निक्षून सांगितलं.


आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून मागील 11वर्षांत देश-विदेशातील अनेक पै पाहुणे आले, आपल्याकडून जे शक्य आहे ते सर्व प्रकारचे आदरातिथ्य देण्याचा प्रयत्न आपण केला, करत आलो. बदल्यात व्यवहाराच्या पलीकडचं एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं बनत गेलं. आज पराशर जे काही उभं आहे, ते अशा जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पै पाहुण्यांमुळे आणि त्यांनी पराशरला आणि पराशरच्या सेवेला तथास्तु म्हटल्यामुळेच.

मनोज हाडवळे

7038890500

No comments:

Post a Comment