Thursday, 7 September 2023

पूर्णत्वाची ओढ

 

पूर्णत्वाची ओढ



एक बीज मातीत रुजतं...त्याला रुजण्यासाठीचं स्टोअर फूड बिजात असतं...त्याच्या मदतीने त्याला नाजुकशी पानं आणि मुळं फुटतात...मग ती मुळं जमिनीतून आवश्यक अन्नघटक घेतात... त्यासाठी त्यांना मातीतील सूक्ष्मजीव मदत करतात... मुळांनी घेतलेले अन्नघटक खोडातून आणि फांद्यामधून पानांपर्यंत पोहोचवले जातात...पानं, सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर; अन्नघटक आणि कार्बन डायओक्साइडच्या मदतीने अन्न तयार करतात आणि पुन्हा फांद्याच्या मदतीने अंगभर पुरवतात... वाढ सुरू रहाते... 



     त्याचं रोपटं होतं...ते अजून वाढतं...मोठं होतं...छोट्या छोट्या फांद्या फुटतात...त्यावर पानांची संख्या वाढते...झुडप बनतं...वरुन जरी झुडुप दिसत असलं तरी आतमध्ये केमिकल लोचा सुरू असतो...  झुडुप वयात येतं... त्याला कळ्या निघतात...कळ्यांची फुलं होतात...हवेच्या, मधमाशांच्या, किड्यांच्या मदतीने  फुलांचं परागीभवन होतं...यशस्वी मिलनानंतर, अंकुर वाढू लागतो... नव्याने अंकुरलेल्या कवळ्या बिजाचा ग्रुप, एका सरळ  रेषेत कव्हरच्या आत अरेंज होतो, त्याला आपण शेंग म्हणतो... निसर्गाच्या साथीने आणि समतोलाने, पानं आणि मुळं; आपापलं काम चोखपणे बजावत असतात...



 झुडुपातील प्रत्येक पार्ट; मूळ, खोड, फांद्या, पान, फूल, शेंग असे सगळेच, बीज मोठं करण्याच्या कामात स्वतःला झोकून देतात...या प्रत्येक पार्टची ठरवून दिलेली जबाबदारी असते...ती जबाबदारी प्रत्येक जण चोखपणे पार पाडतो.. लहान कवळी बीजं, दाण्यात रूपांतरित होतात... दाणे वाढत जातात... दाणे वयात येतात... दाण्यांना मोठं करण्याच्या कामात, पूर्ण झुडुपच दमून गेलेलं असतं...मग पानं पिवळी पडतात...मुळं जीर्ण होतात... फांद्या सुकू लागतात...आता शेवटच्या घटका मोजताना, ते झुडुप मातीचं देणं विसरत नाही... 



निसर्गाच्या साथीची जाण ठेवत...स्वतःची पानं मातीत मिसळायला देतं...त्यातून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतं...मुळांवर बॅक्टीरियाची वसाहत वाढायला जागा देतं... ते बॅक्टीरिया मातीतील अन्नघटक झाडांना मिळायला सहज सोपे करतात... यातून मातीची सुपीकता वाढते... ज्याचा उपयोग बिजाची पुढची पिढी वाढायला होतो...अशी सगळी देवाण घेवाण झाल्यावर, जीर्ण झुडुप आणि पूर्ण वाढलेल्या आणि सुकलेल्या शेंगा, ज्यात बीज हे ते काढणीला तयार असतं...यातीलच काही बीज पुनः रुजण्यासाठी तयार असतं, तर सरप्लस उत्पादन निसर्गातील इतर घटकांना, त्यात माणूसही आला, अन्न म्हणुन उपयोगात येतं.



ही झाली कुठल्याही झाडाची किवा झुडुपाची पिढ्यानपिढ्या वाढण्याची प्रकिया. पण जेव्हा निसर्गाचा समतोल ढासळतो, खूप पाऊस असेल तर जास्तीच्या ओलाव्याने  मातीतल्या बिजाचा जीव गुदमरतो, बिजातील अन्नघटक आणि जीव कुजून जातो, पूर्णत्वाचा प्रवास कायमचा अपूर्ण रहातो. याउलट जेव्हा   पाऊस ओढ देतो, हवेतील अद्रता सुकत जाते, तेव्हा मात्र ही प्रकिया पूर्ण करण्यात बिजाला खूप सारी आव्हानं तयार होतात. बिजाचा प्रत्येक पावलावरचा लढा सुरू होतो. कमी पावसाचा परिणाम सगळ्या निसर्गावरच होतो. मग बीज खायला किडे येतात, त्यांच्यापासून स्वतःला वाचवत, रुजवत वाढवायचं असतं. जमिनीत अद्रता नसल्याने अन्नघटक उपलब्ध होत नाहीत, हवेत अद्रता नसल्याने पानांना अन्ननिर्मिती प्रकिया जड जाते. जमिनीत नाही, हवेत नाही, त्यामुळे झुडुपातही पाण्याची कमतरता होते.



 त्यामुळे मुळं घट्ट पकड घेत नाहीत. जोरदार हवेत झुडुप कोलमडू शकतं. यातूनही कसंबसं कणाकणाने वाढत असताना, झुडुप, एक एक पान मोठ्या कष्टाने जमवत जातं. अंगात असेल नसेल ती सगळी ताकद पणाला लावून दोन घास अन्न तयार करतं. त्याला कळून चुकलेलं असतं की आता यापेक्षा जास्त पानं तयार करता येणार नाहीत किवा यापेक्षा जास्त आपण वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत झुडुप वाट बघत बसत नाही, कारण त्याच्याकडे फार कमी ऊर्जा आणि दिवस शिल्लक असतात. कशासाठी? पूर्णत्वास जाण्यासाठी. मग अपुरी वाढ (vegetative growth) झाली असली पूर्णत्वाकडे जाण्याचा पुढचा टप्पा म्हणुन, झुडुप कळ्या (reproductive growth) तयार करते. फुलं बनतात, शेंगा निघतात, त्यात दाणे भरू लागतात. दाण्यांना मोठं व्हायला, झुडुप असेल नसेल ती  सगळी शक्ति पणाला लावते. वातावरणातील परिस्थिति बदलली, ओलावा मिळाला तर पुढचं सुरळीत होतं. आणि तसं काही नाहीच झालं तर कळ्या/फुलं/कवळ्या शेंगा/.... असा पूर्णत्वाचा प्रवास, एखाद्या टप्प्यावर अपूर्णच राहून जातो.


      

परिस्थिति कितीही प्रतिकूल असली तरी बीज, आपली पूर्णत्वाच्या प्रवासाची ओढ आणि त्यासाठीचे प्रयत्न करणं सोडत नाही. एखाद्या वर्षी सर्व काही आलबेल असलं की बिजाच्या पूर्णत्वाच्या प्रवासातील एक आवर्तन पूर्ण होते. एखाद्या वर्षी नाहीच जमलं तर प्रवास अधुरा रहातो.



बीज वैश्विक आहे, त्याचा प्रवासही तसाच वैश्विक कक्षेवरचा आहे. बीज आणि आत्मा एकाच ऊर्जेचे आणि चैतन्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे झुडप आणि शरीर यांचे संस्कारही सारखेच आहेत..ते आहेतच. आपण मात्र त्याला वेगवेगळे समजून, प्रकृतीच्या विपरीत नियम लावतो.

मनोज हाडवळे

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन

7038890500  

No comments:

Post a Comment