आराधनाची नृत्याराधना
आराधना... तिच्या नावातच पूजा आहे, समर्पित भाव आहे. तिच्याविषयी लिहिण्यासारखं
बरंच काही आहे. आणि ते सुद्धा फक्त यासाठी नाही की ती आतापर्यंत 3 वेळा पराशर वर येऊन
गेलीय, किवा तिने माझं बंद असलेलं Instagram सुरू करून दिलंय किवा तिला छान डान्स
येतो किवा तिचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे... तिच्या विषयी लिहावं वाटलं कारण ती एक प्रेरणादायी
ऊर्जा आहे.
आराधना व माझी ओळख फक्त वर्षभरा पूर्वीची आहे. 2022 च्या ऑगस्ट महिन्यात आराधना,
तिचा नवरा विश्वजित आणि तिचे सासू सासरे असे चौघे जण पराशरवर एका मुक्कामासाठी आले
होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी उठून बाहेर आलो तेव्हा आराधना, भल्या पहाटे आवरून
, छान साडी घालून, वडाच्या पारावर, ओडिसी नृत्य करत होती आणि तिचा नवरा विश्वा, तिचे
शूटिंग करत होता. आराधनाच्या नृत्यविष्कारासोबतची माझी ती पहिली ओळख. त्यांना लवकर घरी परतायचे होते म्हणुन जास्त गप्पा
मारता आल्या नाहीत पण ते दोघं पुण्यात राहतात, नुकतंच लग्न झालंय, आई वडील ओरिसाहून
आले आहेत म्हणुन त्यांना ग्रामीण महाराष्ट्र दाखवायचा होता, त्यासाठी आलो होतो...इथपर्यंत
कळलं.
आम्ही पुण्यात 5 वर्षांपासून राहतोय आणि महाराष्ट्रियन जेवण म्हणजे पुण्यात मिळतं
तेच आणि तसंच असाच काहीसा असणारा त्यांचा समज, पराशरच्या मुक्कामात दूर झाला. इथलं
जेवण त्यांना फार आवडलं. तेव्हा मी मोबाइल बदलला होता, माझं पराशर Instagram बंद झालं होतं. आराधनाने 2 मिनिटांत ते सुरू करून दिलं.... ही आमची पहिली भेट.
साधारण 3 महिन्यांनी, ऑक्टोबर महिन्यात, पुन्हा एकदा, विश्वा, आराधना आणि तिचे
आई वडील असे चौघेजण एका मुक्कामासाठी पराशर वर आले. आराधनाची आई फार बोलकी होती, उत्साही
होती. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी हौसेने करायची असायची. डांगर भोपळ्याच्या पानांची
भाजी खूप छान होते, तसेच अनेक ओडिसी खाद्यपदार्थांमध्ये ही पाने वापरली जातात म्हणुन
शक्य होतील तितकी डांगराची पाने त्यांनी जमा केली होती.
आराधनाचे आई वडील दोघंही संस्कृत विषयातील डॉक्टरेट मिळविलेले, दोघंही प्रोफेसर
आणि सध्या निवृत्त झालेले. आराधनाच्या आईने स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्या
स्वतःच गाणं लिहितात, कंपोज करतात, स्टुडिओ घेऊन ते रेकॉर्ड करतात आणि युट्यूबवर आपलोड
करतात. त्यांना संत ज्ञानेश्वरांचे काही अभंग
माहीत होते, आम्ही जेव्हा ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिराकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी
खूप छान अभंग गायले होते. त्यांची पराशर वारी खूप आठवणीत राहील अशी होती. तर ही आमची
दुसरी भेट.
आम्ही संपर्कात होतो. विश्वा आणि आराधना कुठे ट्रेक ला जावून आले की फोटोज पाठवायचे.
आम्ही instragram
एकमेकांना फॉलो करत होतो, त्यामुळे सगळे अपडेट रेग्युलर मिळायचे. त्यांना
रुद्रा चं लळा लागला होता. दिवाळीत जेव्हा रुद्रा आजारी पडला होता तेव्हा विश्वा, आराधना
आणि त्यांचे आईवडील अशी सर्वांनीच चौकशी केली होती. आराधना चे, नृत्याराधना नावाचे Instagram अकाऊंट आहे, तिथं ती वेगवेगळे डान्स फॉर्म्स, योग करतानाचे व्हीडिओज पोस्ट
करत असायची. तिची लवचिकता, डान्स करतानाच्या स्टेप्स, तिचं डेडीकेशन बघता माझी उत्सुकता
चाळवली. आराधनाच्या नृत्याराधनेविषयी जाणून घ्यावसं वाटलं आणि अर्थात ती सुद्धा तेवढीच
मोकळी ढाकळी असल्याने तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या.
आराधना सध्या पुण्यात आय टी क्षेत्रात नोकरी करते. तिचं इंजिनिअरिंग भुवनेश्वरला
झालं, कॉलेज पूर्ण व्हायच्या आधी कॅम्पस इंटरव्हीवच्या माध्यमातून तिला पुण्यात नोकरी
मिळाली. ती आणि तीचा नवरा विश्वजित दोघंही ओरीसाचेच. त्यांची 5 वर्षांची मैत्री पुढे
प्रेमात आणि मग लग्नात बदलली. आराधनाला एक भाऊ, तो लंडनला असतो. तिच्या आईवडीलांना
जगण्याच्या धावपळीत एकच अपत्य पुरेसं होतं. पण आईला नृत्याची असणारी आवड अस्वस्थ करत
होती. आपण नृत्याची आराधना करावी, संगीताची पूजा करावी. हे सांस्कृतिक संस्कार पुढच्या
पिढीत झिरपायला हवेत, त्यासाठी त्या मनोमन प्रार्थना करायच्या, मला मुलगी होऊदे म्हणजे
हे सगळं मी तिला देवू शकेल.
जेव्हा “आराधना” ची चाहूल लागली तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, हे अपत्य एकतर खेळाडू
होईल किवा डान्सर होईल. एवढ्या लाथा आराधना
पोटात असताना मारत होती. मुलगी झाली, आईने नाव ठेवले, “आराधना”. तिचं नृत्याचं ट्रेनिंग
सुरू झालं. तिने आयुष्यात पहिली चप्पल घालण्याआधी पायात घुंगरू बांधले होते. वयाच्या 3 ऱ्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला
होता.
वाढत्या वयासोबत ती नृत्याचे धडे गिरवू लागली. ती प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना
बनली. भरतनाट्यम नंतर सर्वात जुना नृत्य प्रकार म्हणुन तिला ओडिसी नृत्य फार जवळचे
आहे. पुढे 10-12 वीच्या व्यापात डान्स प्रॅक्टिस
सुटली, त्यामुळे व्यायाम थांबला, आजारपण वाढलं... तशातच कॉलेज पूर्ण झालं, पुढं नोकरी
लागली.
कोरोनाकाळात बराच काळ एकटीला रहायला मिळालं तेव्हा तिने योग सुरू केला. योग आणि
नृत्य यात बरच साम्य असल्यासारखं तिला जाणवलं. मधल्या काळात तिची आध्यात्मिक बैठक पण
जमून आली होती. या सर्वाचा परिपाक असा झाला की ती, आदियोगी शिव, योग आणि नृत्य या तिघांच्या
फ्यूजन मधून तिने काही डान्स फॉर्म्स डिझाईन करायला घेतले. त्या फ्यूजनचे अनेक व्हिडीओज
ती नृत्याराधना युट्यूब चॅनल वर पोस्ट करत
असतेच.
भीमाशंकरच्या अनुषंगाने आणि शिवाच्या अंगाने, नृत्याच्या माध्यमातून काही करता
येईल का याची चाचपणी आम्ही करून पाहिली, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत. एकदा असंच बोलताना
मी तिला म्हणालो की एखादी डान्स थीम घेऊन तू पराशरवर शूट का करत नाहीस? माझ्या डोक्यात
आहे ते, करूया लवकरच तिने आश्वासक उत्तर दिले. मे महिन्यात तिने आपण पराशरवर शूट करूया
असं सांगितलं. आम्ही सगळी तयारी केली. तिने सांगितलेल्या गोष्टी अरेंज करून ठेवल्या.
शूटचा दिवस अवघा 3 दिवसांवर आला असताना, आराधनाचा मेसेज आला, प्रॅक्टिस करत असताना,
पाय लचकला, पुढील 3 महीने डान्स करता येणार नाही असं डॉक्टर म्हणाले.
पण हार मानेल ती आराधना कसली. जशी पायाची दुखापत जरा बरी झाली, तिने पुनः प्रॅक्टिस
सुरू केली. मध्यंतरी काशी विश्वेश्वराला जावून आली. या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने
तिने एकूण 6 डान्स फॉर्म्सचे फ्यूजन करून एक थीम बनवली, “भारत“ नावाची. त्याच्या शूटिंग
साठी तिने 9 ऑगस्ट ही तारीख फायनल केली. पायाची दुखापत जवळपास बरी झालीय, मी आता परफॉर्म
करू शकते, तेव्हा आपण आता प्लॅनिंग करूच, तिचा मेसेज आला. आमची तयारी झालेलीच होती.
9 ऑगस्ट ला आराधना, विश्वा आणि तिची टीम रात्री 8 वाजता पोहोचले. टीम, शूटिंगच्या
तयारीला लागली. आराधना ड्रेसिंग व मेकअप साठी गेली. नम्रताने तिला साडी नेसवायला थोडी मदत केली. ती स्वतःच सगळं करत होती. सगळं
म्हणजे अगदी सगळंच. मग व्हिडिओची भारत थीम, त्यातील डान्स फॉर्म्स, लोकेशन्स, ड्रेसिंग
हे सगळं आराधना बघत होती. तिला खण्यापिण्याचे भान नव्हते. लाइट्स अरेंज झाल्या, सगळी
तयारी झाली. रात्री साडे नऊ ला शूटिंग सुरू झालं, 2-3 मिनिटांच्या फायनल टेक साठी जवळपास
3 तास शूटिंग चाललं.
माझी 7 वर्षांची मुलगी, अहिल्या ते सर्व लक्षपूर्वक बघत होती. सुरवातीला रुद्रा
पण तिथेच होता. एक टेक झाला की रुद्रा टाळ्या वाजवून वाव म्हणायचा. आराधना एखाद्या
टेक नंतर थांबली की अहिल्या तिला पाणी द्यायची, मला पण या दिदी सारखा डान्स करायचा
आहे, अहिल्याला आराधना कडून प्रेरणा मिळत होती. मी अहिल्याला काहीही न बोलता तिच्या
विश्वात मोकळे सोडले.
रात्री 12 वाजता शूटिंग संपले, तू जेवणार ना आता, मी आराधना ला विचारले, अजिबात
नाही. मला लवकर उठायचं आहे, उद्याची तयारी आहे परत. मी लवकर झोपते म्हणत आराधना न जेवताच
झोपायला गेली. ही पोरगी तहान भूक विसरली होती. तिचं डेडीकेशन आणि कमिटमेंट जबरदस्त
होती.
दुसऱ्या दिवशी पहाटेच आवरून , 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत, पराशरमधील
तसेच परिसरातील अनेक ठिकाणी वेगवगेळे डान्स फॉर्म्स निवडून शूटिंग झाले. आणि विशेष
म्हणजे तिच्या ऑफिसची ऑनलाइन मीटिंग अटेंड करून तिने हे सर्व जमवून आणले.
आराधना कलाकार जरी असली तरी व्यवहारात जगते. आपल्या नृत्याकडे ती कलेच्या, उपासनेच्या नजरेतून बघत असताना, कुठंतरी
जुन्या नव्याचा संगम करून, आपल्या कलेचे जतन करावे असे तिचे स्वप्न आहे. म्हणुन ती अशा वेगवेगळ्या थीम घेऊन डान्स परफॉर्म
करते. त्यासाठी थीम, लोकेशन, टीम, लागणारा वेळ, साहित्य, सामग्री, ड्रेपरी आणि बजेट
हे सगळं अरेंज करते आणि हे सगळं आपली नोकरी सांभाळत करते हे विशेष.
आराधनाच्या या नृत्याराधनेत विश्वा, एक समिधा बनून पडत असतो. कधी असिस्टंट, तर
कधी मेकअप मॅन, कधी साऊंड ट्रॅक प्लेयर तर कधी सारथी अशा वेगवेगळ्या भूमिका, तितक्याच
शांततेने विश्वा निभावत असतो, तिला खंबीर साथ देत असतो.
या स्वातंत्र्य दिनी, आराधना मुळे, आपल्या पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्राला एक अनोखी भेट मिळत आहे. तिच्या विविध डान्स फॉर्म्स च्या माध्यमातून भारतमातेला दिलेली ही मानवंदनाhttps://youtu.be/yqJAYRXn__Y?si=B34ynEsR_mTPZrgW
इथे पहायला मिळेल. तिच्या परफॉर्मन्स मुळे जी काही सकारात्मक ऊर्जा पराशरच्या परिसरात आलीय, ती पुढील काळात येणाऱ्या पाहुण्यांना जाणवत राहील.
भारत चिरायू होवो,
भारतीय कला चिरायू होवो, आराधना सारख्या प्रेरणादायी लोकांनी पराशरवर येत राहो आणि
आम्हाला प्रेरणा देत राहो.
जयहिंद जय महाराष्ट्र.
मनोज हाडवळे
9970515438
No comments:
Post a Comment