Saturday, 12 August 2023

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी  



फिरणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना, आपल्यासारख्याच इतर जातीच्या मानवाला नष्ट करून जेव्हा होमो सेपियन एकटाच उरला; तेव्हा दुसऱ्यावर कुरघोडी करणं हा त्याचा स्थायीभाव स्वतःच्याच मुळावर उठू लागला. सुरुवातीला एकट्याने राहणारा नंतर समूहात राहू लागला. त्याच्या बुद्धीचा विकास अफाट वेगाने होत असताना, त्याने समूहाचे काही कायदे कानून बनवायला सुरुवात केली. काळासोबत हे नियम कधी धर्माचं, कधी जातीचं रूप घेऊन समूहाला प्रभावित करण्यात; आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, ही अहंपणाची भावना विकसित करण्यात खतपाणी घालू लागले. 


आतापर्यंतच्या, मानवाच्या प्रवासात त्याच्या बुद्धीचा उपयोग हा त्याचं जगणं सुकर करण्यासाठी होत राहिला आहे. मग त्यामध्ये भौतिक सुविधांची निर्मिती, जगण्यातील मेहनत कमी करण्याचे वृत्ती, शारीरिक कष्टांना कमी करण्यासाठी माणसाने त्याची बुद्धी पणाला लावली. अगदी अलीकडच्या काळातील रोबोट संकल्पना आणि त्यानंतरची कृत्रिम बुद्धिमत्ता अशा गोष्टींना घेऊन माणूस विचार करू लागला. माणूस हा इतर सजीवांपेक्षा त्याच्या विचार करण्याच्या व लक्षात ठेवण्याच्या गुणांमुळे वेगळा ठरतो आणि म्हणूनच त्याचं हे वेगळेपण शारीरिक कुवत नसतानाही या पृथ्वीवर अधिराज्य गाजवण्यासाठी पुरेसं ठरतं.




बुद्धी ही दुधारी तलवार आहे या बुद्धीच्या जोरावर जेव्हा भौतिक सुविधांचा विकास करत असताना, जगणं सुसह्य होत असताना, बुद्धीला खाद्य म्हणून काय द्यावं म्हणून माणसाने स्वतःच जगणंच पणाला लावलेलं दिसतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जो विचार करतो तशाच प्रकारे विचार करणारी एक वेगळी यंत्रणा माणूस विकसित करून पाहत असताना; त्यातील भविष्यात होणारे परिणाम वाईट असतील असं माझं मत नाही पण ते प्रकृतीच्या नैसर्गिक विकास प्रक्रियेला आणि पर्यायाने मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवाहाला छेद देणारे नक्कीच असू शकतील. कदाचित मानवी उत्क्रांतीचा महत्वाचा टप्पा म्हणुन त्याकडे पाहता येईल. 


मानवाने त्याच्या जगण्याला सुसह्य करण्याची मजल याच बुद्धीच्या जोरावर मारली. याच जगण्याला प्रगल्भ करण्याची, बौद्धिक विकासाच्या कसरतीची यंत्रणा, जी या आसुरी वेगाचे का? कशासाठी? कुठपर्यंत? कोणासाठी? किती? हे प्रश्न बुद्धी आणि मन या दोघांना समन्वयित करून स्वतःलाच डोळसपणे विचारू शकेल अशी यंत्रणा याच मानवाने विकसित केली; ज्याला आपण अध्यात्म म्हणू शकतो. आजचा आधुनिक मानव अध्यात्म आणि धर्म यात गल्लत करताना दिसतो. 



अध्यात्माचा मार्ग मनन, चिंतन, स्वतःच्या शोधाकडे घेऊन जातो; तर धर्माचा मार्ग स्वतःच्या शोधापासून परावृत्त करत एका संमोहित दुनियेत जगायला प्रवृत्त करतो. अध्यात्म आपल्याला प्राकृतिक विकासाच्या नैसर्गिक वेगांसोबत टिकवून ठेवते तर धर्माच्या माध्यमातून इतरांपेक्षा आपल्याला वेगळे ठरवणारी मानसिकता विकसित होते, की ज्याचा दुरगामी परिणाम हा मनशांती पेक्षा मनाच्या उत्कटेकडे घेऊन जात असतो. 

मनशांती आणि मनाची उत्कटता हे दोन्ही स्वभाव एकाच मनाशी खेळ करत असतात. सध्या 5-G चा जमाना आहे. ग्रामीण भागातील एखाद्या खेड्यातील घरात बसून, कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण युट्युबवर; पाहिजे ते बघू शकतो. हा झाला मानवाच्या बुद्धीच्या जोरावर झालेला भौतिक विकास. पण याच युट्युबवर आपल्या आवडीचं काहीतरी बघत असताना, जो काही थोडासा बफरिंग अडथळा येतो; तेवढ्या काळात पेशंस न राहता चिडचिड होणं आणि युट्युबला काहीतरी बघितल्यानंतर आदळआपट होणं,  मनाची शांती हरवून मन चंचल व उत्कट होणं, हा झाला मानवाच्या बौद्धिक विकासातून साधला गेलेला, जगण्याच्या गुणवत्तेचा परिणाम.


माणूस जन्माला येतो गर्भातून, तो त्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस वयाने व  शरीराने वाढत जातो, ज्याला आपण भूमितीच्या भाषेत त्रिज्या म्हणू शकतो. जसं प्रत्येक ग्रह एका विशिष्ट ऊर्जेने स्वतःभोवती फिरत असताना, दुसऱ्या भोवतीही फिरतो. अगदी त्याचप्रमाणे जन्माला आलेला माणूस त्याच्या आत्मरुपी उर्जेने स्वतःभोवती जगणं गुंफत असताना, जगाचंही आकलन करत, जगातही तो फिरत असतो. त्याची फिरण्याची कक्षा वाढत्या वयासोबत वृंदावत जाते. सवयीने त्याचं फिरणं त्या परिघावर असतं, त्याच्या कक्षेत अनेक विचारधारा, अनेक लोक, अनेक प्रलोभनं, अनेक आव्हानं, प्रेम, लोभ, राग, मत्सर, इर्षा अशी अनेक भावनिक आंदोलनं ही सर्व त्याच्या परिघावर त्याला भेटत असतात. 

त्या कक्षेवर फिरत असताना, त्याला जसं आनंदी करतात तसं कधी विचलितही करतात. जगण्याच्या आनंदासोबत विरक्ती आणतात पण मानवाला त्याच्या केंद्रबिंदूकडे म्हणजेच स्वतःकडे परतण्याचा चिंतनुरूपी एक मार्ग नेहमीच मोकळा असतो ज्याला आपण अध्यात्म म्हणतो. माणूस विचार करू शकतो आणि त्याच बळावर तो जगरहाटीच्या परिघावरून पुन्हा भौमितिक सिद्धांतांना छेद देत, स्वतःच्या केंद्रबिंदूकडे प्रवास करू शकतो. अशावेळी जगरहाटीच्या परिघावरची गती सोडून, तो स्वतःच्या गतीने केंद्राकडे त्रयस्थपणे बघू शकतो, केंद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो, ही सुद्धा ताकद माणसाला त्याच्या बौद्धिक विकासाने दिलेली आहे.



दुर्दैव असं की या अंतर्गतशक्तीचा त्याला अंदाज येत नाही; कारण बाह्य जगातील प्रलोभनं, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सर्वांचा हव्यास त्याला परिघावरच फिरण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. अनादी कालापासून या सृष्टीचा विकास होत असताना आपण आपल्या 60-70 वर्षाच्या आयुष्यात या पृथ्वीवर येतो. आजमीतिला आपल्यासारखीच सुमारे 750 कोटी लोक या पृथ्वीतलावर राहत आहेत. आपण खूप प्रतिष्ठित आहोत, आपल्याला खूप लोक ओळखतात ह्या भ्रमात आपण आपल्या जगण्याचं एक छोटसं विश्व, ह्या विराट विश्वामध्ये तयार करून घेतो. कारण या विराट विश्वाला भिडण्याची हिंमत आपल्यात कधीच नसते. खरंतर आपण या विराट विश्वाच्या एका अणूपेक्षाही छोटा भाग आहोत. पण हे कळण्यासाठीची मनाची मशागत होण्यात अनेक अडथळे येत असतात. 

जर कधी कोणी आपल्याला आपली ओळख विचारली तर पटकन आपण आपलं नाव, गाव, हुद्दा, अमुक व्यक्तीचा नातेवाईक अशा गोष्टींचे रेफरन्स विचारणाऱ्याच्या अंगाने देत असतो. ही ओळख सांगत असताना एकमेकाच्या परिचयाची भावना असेल तर सांगत असताना काही ऐकलं पण जातं. परिचयाचा टप्पा पार केल्यानंतर जेव्हा नव्याने भेटलेल्या दोन व्यक्ती एकमेकाला जोखायला लागतात तेव्हा तात्पुरते अहंगंड शांत केले जातात. मग कोण किती पोहोचलेला आहे, कोण किती बडा असामी आहे त्यानुसार त्याच्याशी वर्तन ठरले जाते. कोण किती उपयोगी आहे त्यानुसार भविष्यातील भेटीगाठी ठरत असतात, कारण या भौतिक जगात मानवाला दोन प्रकारची मूल्य; उपयोगीता आणि उपद्रव मूल्य असली तरच तो या जगरहाटीच्या कामाचा ठरतो. यातील दोन्हीही मूल्य जर नसतील तर तो जगाच्या काही कामाचा ठरत नाही. 



या जगात प्रसिद्ध नसलेली अशी अनेक लोक आहेत की ज्यांना खरं तर कोणीच काही जबाबदारी दिलेली नसली, तरी कुठलाही हर्क्युलस चा भाव मनात न आणता; आपापल्या क्षेत्रात ही लोक स्वतःच्या उर्जेला, विचाराला आणि कृतीला न्याय देत; जगण्याचं जे माध्यम निवडलेलं  आहे, त्यात छान प्रकारे जगत असतात. मग कोणी छान शोध लावतो, कोणी छान शेती करतो, कोणी छान शिकवतो, कोणी छान घर बांधतो, कोणी छान चित्र काढतो, कथा लिहितो, सिनेमे बनवतो हे सर्व करत असताना ती व्यक्ती खरंतर स्वतःसाठी करत असते, स्वतःच्या क्षमतांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. 

त्या व्यक्तीच्या त्या कृतीने जगाला जे काही मिळतं ते खरंतर त्याच्यासाठीचं बायप्रॉडक्ट आहे. पण आजच्या या हायस्पीडच्या काळात जसं जगण्याच्या मुख्य केंद्रबिंदूकडे जाण्याऐवजी, जगराहाटीच्या परिघावर फिरण्यात धन्यता मानली जाते; तसंच मुख्य प्रॉडक्टकडे दुर्लक्ष करून बायप्रॉडक्टलाच सिरियसली घेण्याची वृत्ती बळावली आहे. आणि त्यामुळे सर्व सुखसोयी, भौतिक सुविधा पायाशी लोळण घेत असतानाही माणूस दुःखी असतो, चंचल असतो, मनशांती हरवलेल्या अवस्थेत सुख शांतीसाठी चाचपडत असतो. 


मानवाचं हे चाचपडणं आजच्या एका मोठ्या उद्योग व  व्यापाराचे भांडवल आहे. याच भांडवलाचा उपयोग करून धर्मगुरू, आध्यात्मिक गुरु, बिजनेस कोच, मेंटॉर अशी एक मोठी फळी तुम्हाला सेवा पुरवायला जगभरात उभी राहिलेली आहे. इथं खरं गंमत आहे.  सगळी माणसं सारखी, सारख्याच मेंदूची पण केवळ विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे आणि आपल्या विचारक्षमतांची जाण नसल्यामुळे संमोहित अवस्थेत जगत असतात. यातील काही जागरूक मेंदू या संमोहित मनांचा ताबा घेऊन त्याच्यावर आधीराज्य गाजवू पाहतात. तात्पुरते उपाय योजले जातात की ज्यांना आपण बिझनेस सेमिनार, मनशांतीचे सेमिनार अशा अनेक नावाने ओळखू शकतो. 

मला वाटतं ही सगळी फांद्यांवरची उपचार पद्धती आहे; जर आपल्याला रोग समूळ नष्ट करायचा असेल तर जी काही उपाययोजना करायची आहे ती मुळांवर व्हायला हवी, जी आपोआप फांद्यांवर फरक दाखवेल. आपल्याही जगण्यात जर आपल्याला सकारात्मक गोष्टींची गरज वाटत असेल, तर वरवरची उपायोजना तात्पुरता परिणाम देत जरी असली तरी शाश्वत बदलासाठी आंतरिक मनावर, आत्म्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आणि ह्या उपचार पद्धतीचा एकमेव नाव आहे अध्यात्म. 


अध्यात्म हे कुठल्याही विचारधारेची, धर्माची, देशाची, पंथाची व लोकांची मालकी नाही; अध्यात्म हे सचेतन मनाचं प्रतिबिंब आहे, जे प्रत्येकात असतच असतं. आपल्याला ते फक्त जागं करावं लागतं. अर्थात हे इतकं सोपं वाटत असलं तरी तितकं ही सहज नाही, कारण आपण अनेक गोष्टींनी आकर्षित असताना, प्रभावित असताना त्या जगण्याचा आणि आंतरिक जगण्याचा समतोल साधणं ही एक कला होऊन बसते. ज्याला ही कला साधता आली त्याचं जगणं समतोल झालं. 

माणूस जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत जो काही प्रवास करतो, तो प्रवास स्वतःच्या शोधाचा असतो. स्वतःचा शोध हा स्वतःच घ्यायचा असतो, त्याच्यासाठी भलेही कुठली यंत्रणा तुम्हाला एका पातळीपर्यंत मदत करू शकेल; पण त्या पुढचा प्रवास मात्र स्वतःचाच असतो. कधी कधी कोणाला स्वतःचा शोध लागतो तर कधी शोध घेण्याच्या प्रवासात जगण्याचा प्रवास संपतो; या सर्व प्रक्रियेत माणूस म्हणून आपण एक गोष्ट निश्चितपणे करू शकतो ती म्हणजे अंतर बाह्य प्रवास.
एक प्रवासी-मनोज हाडवळे
9970515438 
पराशर कृषि व संस्कृती पर्यटन  

No comments:

Post a Comment