Thursday, 9 May 2024

मन्या- बस नाम हि काफी है

 मन्या- बस नाम हि काफी है


तो घाटात आलाय हे कधीच कोणाला सांगावं लागलं नाही. बैलगाडा शर्यत असलेल्या यात्रेत बैलगाडा प्रेमी यायचे, तेच मन्याला पळताना बघायला. एरवी जिलेबी भजी, उसाचा रस, कलिंगड, शेव रेवडी अशा विविध दुकानांवर रेंगाळलेली यात्रेतील मंडळी,मन्याची अनाऊंन्समेंट झाली कि पटापट बैलगाडा शर्यतीच्या घाटावर जमा व्हायची. घाटाच्या कडेवर बसलेली लोकं पाय वर घेऊन बसायची. शक्य तेवढ्या दबक्या आवाजात बोलायची. इतरवेळचा कोलाहल मन्याच्या बारीला शांत व्हायचा. पंचकल्याणी राणी घोडी, शंभू सर्जाचं कांडं अन मन्याचा घरचा साथीदार काशी किंवा हरण्या तर कधी गुरु; अशी सगळी आपापल्या जागी जुपली गेली कि, मन्याला मोठ्या रुबाबात आणलं जायचं.
मी कल्पनेत मन्याच्या डोळ्यात जाऊन आलो. एक माणूस दोन्ही हातांनी मोरखी पकडून मन्याला जुपायला घेऊन चाललाय. मन्यात आणि शर्यतीच्या घाटात त्या माणसाचा पांढरा शर्ट आहे. चालताना हळूच, मन्याला ओझरतं असं घाटाचं दर्शन होतंय. एखाद्या झरोक्यातून बाहेर बघावं असं तुकड्या तुकड्यात घाटाच्या दुतर्फा बसलेली गर्दी, पळायचा ट्रॅक, सोबत जुंपलेला साथीदार दिसतोय. जुपणीसाठी जाडीखाली खांद देत असताना, काही सेकंद मन्याचा डोळा, सोबतच्या साथीदाराकडे वळतोय, फक्त डोळ्यांनीच दोघात काहीतरी बोलणं होतंय. तोपर्यंत तिकडं कानावर...भिर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज निघतोय... मन्याला पुढचा रिकामा ट्रॅक आणि दुतर्फा बसलेली माणसं हे सोडून काहीच दिसत नाही.
मी, मन्याच्या डोळ्याबाहेर येऊन पाहू लागतो. मागे धुळीचा भंडार आणि माणसांचा लोट उसळलेला असतो. टोप्या, फेटे आणि रुमाल त्या धुळीतून वर उडताना दिसतात, अनाउंसर दुप्पट आवेशात मन्याला साथ देतात, घाटाच्या तोंडाला निशाण पडतं, खाली इलेक्ट्रिक घड्याळात वेळ दाखवली जाते, याही वेळी मन्याने, त्याचा आधीचा रेकॉर्ड तोडलेला असतो.
मन्या कधीही न हरलेला बैल, प्रत्येक फायनल मारलेला बैल, घाटाचा राजा अशी ओळख कमावलेला पठ्ठया पण जुकाटात पळताना, साथीदार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. मन्या हा जवळेकरांचा बैल, पण त्यांच्या इतक्याच नामांकित बैलगाडा बाऱ्यांमधील मन्याला साथ देणाऱ्या आणि मन्या इतक्याच जिगरीच्या बैलांसोबत मन्याने बऱ्याचदा मैदान मारलंय. मग त्यात मांडेकरांचा हरण्या, संदिपशेठचा बलमा, अप्पासाहेबांचा बंटीशेठ , अनंतमामांचा हिरा, ब्रिजेशशेठचा झेंड्या, वाघचौरेंचा चिक्या आणि अधुरी राहिलेली वारंगे मामांच्या ओम्या सोबतची जुपणी..हि सगळी कहाणी आहे कृषक समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची.
काल एक दुर्दैवी योगायोग जुळून आला. घाटातली धूळ आणि चीठ्ठी घेऊन येणारे सूर, असं दोन्हीही एकाच दिवशी शांत झालं. बैलगाडा शर्यतीच्या घाटातील हिंदकेसरी हा 'किताब मिरवणारा, मन्या बैल, वयाच्या १८ व्या वर्षी अनंतात विलीन झाला तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (७२) यांनीसुद्धा कालच अखेरचा श्वास घेतला. मन्याचं जाणं अचानक झालं. घाटातील दुखापतीच्या निमित्ताने, मन्यावर उपचार सुरु होते पण तो असा अचानक जाईल अशी काही शक्यता नव्हती.
पंकजजी काही दिवसांपासून कर्करोगाच्या व्याधीने त्रस्त होते. उधास यांनी आपल्या गायकीला, "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है" असं म्हणत कायमचं अजरामर केलं. तर मन्या त्याच्या पळण्याने घाटाघाटावर आणि मनामनावर गारुड मिरवत राहिला. अध्यात्माच्या व्याख्येतून दोन जीव दोन योनीत जन्माला आले होते. पशु योनीचा कार्यभाग मन्याने पूर्ण केला तर मनुष्य योनीतील जन्माचा समारोप पंकज उधासजींनी केला. वैश्विक अर्थाने, या दोन्ही आत्म्यांनी आपापल्या जन्माचं पांग फेडलं, जगणं सार्थकी लावलं.
वैद्यकीय दृष्ट्या बैलाचं आयुष्य हे २०-२२ वर्षांचं असतं . पण अपवाद म्हणून, चांगली ठेप आणि जातवारपणामुळे यात वाढ झालेली सुद्धा दिसून येते. या पार्श्वभूमीवर मन्या, बैलगाडा शर्यतीच्या घाटात अजून काही वर्ष नक्की पळाला असता आणि स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्याचा युसेन बोल्ट चा स्वभाव पुरेपूर जगला असता.
मन्या जन्माने बैल जरी असला तरी कर्माने सेलिब्रेटी होता, हिरो होता. त्याने विविध घाटात मिळविलेल्या बक्षिसांवर नजर टाकली तर लक्षात येईल कि मन्या गेल्या नंतर त्याची अंतयात्रा का निघाली, त्याच्या अंत्ययात्रेला पाच हजाराहूनही अधिक लोकं का जमली? १५० पेक्षा जास्त टू व्हिलर्स, ७० पेक्षा जास्त बुलेट्स, ३ बोलेरो, १ स्कॉर्पिओ, १ थार, १ जे सी बी, २ पीक अप, ३ ट्रॅक्टर, १०० तोळं सोनं आणि १ कोटीपेक्षा जास्त रकमेची नगदी बक्षिसे. हि बक्षिसं मन्याचं असणं जेवढं अधोरेखित करतात तेवढंच त्याचं आता इथून पुढं नसणंहि जिव्हारी लावून जातात.
मी पुन्हा मन्याची काळजी घेणाऱ्या, त्याला चारापाणी करणाऱ्या त्या ४-५ लोकांमध्ये जातो. ज्याला जग सलाम करत असतं, ज्याला दुनिया डोक्यावर घेत असते, त्याची काळजी घेणारा, हवं नको ते बघणारा व्यक्ती हा त्या हिरोला हिरोपणाव्यतिरिक्त ओळखत असतो. मन्या जेव्हा शर्यत मारून येत असेल, गर्दीतून गाडीत आणि गाडीतून गोठयावर येत असेल तेव्हा त्याची ओवाळणी झाल्यावर त्याला चारापाणी करणाऱ्या व्यक्तीला तो काय सांगत असेल? एकमेकाला सवयीने लाभलेला सहवास आणि सहवासाची झालेली सवय आता सोडावी लागेल हे मन्याच्या "थापाला" स्वीकारावं लागेल.
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात, शेतीचा टप्पा हा उल्लेखनीय मानला जातो. जेव्हा हीच शेती, एक संस्कृती म्हणून विकसित होते तेव्हा त्यातील प्रत्येक घटक उत्क्रांत होत असताना वारसा निर्माण करत असतो. पाळीव प्राणी आणि शेतकरी यांचं नातं या सांस्कृतिक वारश्याची अतिशय हळवी बाजू आहे. आणि जेव्हा असं बैलगाडा शर्यतीच्या रूपाने, मन्या सारखी दंतकथा वाटावी अशी खरी गोष्ट घडते तेव्हा..कृषी संस्कृतीची हि परंपरा ओरडून ओरडून सांगावी असं वाटत राहतं. मागील १२ वर्षांच्या पराशर कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून आपण हे ऍग्री हेरिटेज, वेगवगेळ्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहे. आणि पुढेही या पालखीचे भोई होऊ हीच मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
मनोज हाडवळे

अरे संभालके..लग जायेगा उसको

 अरे संभालके..लग जायेगा उसको



“अरे संभालके..लग जायेगा उसको”, नारायण उस्फुर्तपणे बोलून गेला आणि मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एकदम निरागस भाव होते, बिगारींनी रिक्षातून खाली फेकलेल्या लाकडांकडे धावत जावून, त्यातील एक लाकूड उचलून, त्याला कुठं लागलं तर नाही हे हात फिरवून तो चेक करत होता. आज सकाळपासून तहान भूक विसरून नारायणचं साग साग..लाकूड लाकूड सुरु होतं. घराजवळ असलेली काही जुनी सागाची लाकडं आणि काही वाळलेली झाडं आरीवाल्याला बोलावून त्याच्या मनात असलेल्या मापात, नारायण कापून घेत होता. आरी मशीनने होणाऱ्या प्रत्येक ओंडक्याचा पोत कसा आहे यावरून नारायणची उत्सुकता वाढत होती. आरी मशीनने केलेले ओंडके रिक्षात घालून, ओंडके चिरून देणाऱ्या सॉमिल मध्ये पोहोचले, तिथल्या प्रत्येक चीरावटी सोबत उठून दिसणारी नक्षी पाहून नारायणची कळी खुलत होती. त्या प्रत्येक फळीवर प्रेमाने हात फिरवत, नारायण मनाशीच काहीतरी पुटपुटायचा. सागाच्या जुनाट ओंडक्यांचे ताज्यातवान्या नक्षीदार फळ्यांमध्ये झालेले रुपांतर घेऊन नारायण पराशरवर पोहोचला आणि बिगारींना सर्व लाकूड खाली घ्यायला सांगत होता. तेव्हा बिगारी, धरका फेक असं करत होते. त्या सागाच्या फळ्यांचा जन्म नारायणच्या समोर झाला होता. त्यांच्याशी तो तादात्म्य पावला होता. अशा नवती ल्यालेल्या फळ्या खाली मातीवर पडल्या आणि त्यांच्या वरून अजून फळ्या पडल्या तर त्यांना कोचे पडतील, त्यांची नक्षी खराब होईल, त्यांचा रुबाब कमी होईल म्हणून नारायणच्या तोंडून आपसूक भावना निघाल्या, “अरे संभालके..लग जायेगा उसको”

     

  २०११ साली, आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटनाच्या उभारणीसाठी, मोठा भाऊ, मंगेशच्या माध्यमातून, त्यांच्या शुटींगच्या, आर्ट डिपार्टमेंट मधील मुख्य सुतार, नारायण पहिल्यांदा पराशर वर आला होता. त्याच्या कल्पकतेतून साकारलेलं फर्निचर आतापर्यंत आलेल्या पाहुण्यांनी वापरले आहे. या वर्षी उन्हाळा मोठा कडक गेला, या काळात फर्निचरची डागडुजी आणि काही नवीन फर्निचर करावे म्हणून नारायण सोबत संपर्क केला. हे महाशय तेव्हा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंगच्या तयारीसाठी २ महिन्यांपासून जामनगरला तळ ठोकून होते. खूप मन्नतवाऱ्या केल्याबर अर्धा एप्रिल आणि मेचा पाहिला आठवडा, नारायणची टीम पराशरला अजुन भारी करण्यात तल्लीन होती.

      


नारायण आणि त्याची टीम रोज १२ तास काम करायची. नारायणला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा, त्यानेच बनवलेल्या सागाच्या बाकड्यावर जावून बसत असे. त्यानेच गुळगुळीत केलेला सागाच्या बाकड्यावर मोठ्या प्रेमाने हात फिरवत असे. लाकूड म्हणजे नारायणचा विक पॉइंट. नारायण मुळचा उत्तराखंडचा. वडील आर्मीत असल्याने दिल्लीत वास्तव्य. शिक्षण सुद्धा दिल्लीत झालं. वडील आर्मितून निवृत्त झाल्यावर आर्मीला लागणारे फर्निचर पुरवण्याचा व्यवसाय करत होते. कधीतरी गरजेनुसार फर्निचर मॉडीफाय करावे लागायचे, त्यामुळे एक छोटेसे वर्कशॉप सुद्धा होते. छोटा नारायण, लहानपणापासून हे सगळं पहात आला होता. त्याला लाकुड्कामात रस होता.  इतर चार भावांप्रमाणे नारायण, आर्मीत न जाता, कारपेंटरीचा आय टी आय करायला दिल्लीतच थांबला. शिक्षण संपवून, पुढचा काही काळ व्यवसायात लक्ष घातले. कामातील तोचतोचपणा त्याला कंटाळवाणा वाटायला लागला. नारायण ने मुंबईचा रस्ता धरला.

      


मुंबईत ओळखीपाळखीने काम मिळवायला सुरवात केली आणि फिल्म लाईनमधील आर्ट डिपार्टमेंट मध्ये सहभागी झाला. मागील ३५-३० वर्षांपासून शेकडो हिंदी आणि १० पेक्षा जास्त हॉलीवूड  प्रोजेक्ट वर नारायण ने काम केले आहे. त्यात लाईफ ऑफ पाय, स्लमडॉग मिलेनिअर असे काही सिनेमे आहेत. सध्याच्या वेबसिरीजच्या ट्रेंड मध्ये सुद्धा मोठे मोठे प्रोजेक्ट्स नारायणकडे आहेत.  नारायणचा एकुलता एक मुलगा. दिल्लीत क्यारीकेचर आर्टचे शिक्षण घेतोय. त्यासाठी नारायण, वर्षाला लाखो रुपये खर्च करतोय. नारायण ने मुंबईत २ घरं घेतली आहेत. पण त्याचं मन रमतं ते गावी उत्तराखंड मधेच, तिकडेही त्याने थोडी जमीन घेतलीय. मुलाची जबाबदारी संपली कि गावी जावून, आर्ट स्टुडीओ सुरु करण्याचा त्याचा विचार आहे. हो, कारण नारायण फ़क़्त सुतार नाही तर तो एक कलाकार आहे.  आणि उपलब्ध सामग्रीत आपली कला प्रत्यक्षात उतरविण्याचे कसब त्याच्याकडे आहे.

      


फर्निचरसाठी लागणारा कच्चा माल खरेदीला जेव्हा आम्ही दोघे जायचो, तेव्हा नारायणची नजर रस्त्याने जातानाही लाकडावरच असायची. त्याचा लाकडाचा चांगला अभ्यास पण होता. म्हणजे अगदी मिसळ खाऊन, बेसिनला हात धुवत असताना, समोर दिसणारे झाड बघून, “मनोज जी, ये  सिसम का पेड भी बहोत काम का है” अशी त्याची भिरभिरती नजर असायची.


सरपणाच्या वखारीत गेलो असताना, तिथे ३०-४० वर्ष जुन्या घराची लाकडं आणि फळ्या आल्या होत्या. इतके वर्ष पाणी, वारा, उन आणि धूर खाऊन काळ्या कुट्ट झालेल्या त्या फळ्या बघून, पक्का यही लेना है ना? हा हा आप उठावो तो सही.. मालाची रिक्षा पराशर वर आली. नारायण ने ग्रायंडरच्या मदतीने फळ्या घासल्या, काजळी निघाली, त्या सर्व सागाच्या फळ्या होत्या. त्याने तेव्हाच ओळखल्या होत्या.  त्या फळ्यांच्या मदतीने स्टूल बनवत असताना, नारायण सांगू लागला. मनोज जी, जिसने घर बनाया, उसने भी इस लकडी को कहीसे लाया होगा. इस लकडीने उसका घर बसाया, ३०-४० साल उसका साथ निभाया, नया बंगला बनाना है तो इस पुराने लकडी को जलानेके लिये बेच दिया...अब हम इसको उठाके यहा लाये...इसका स्टूल बना.. इस स्टूल मे लगी लकडीका नसीब उसे यहा लेके आया...आपके यहा तो देश विदेश से लोग आते है..न जानेकीस कीस के नसीब मे इस लकडी का साथ होगा...लाकडी का भी अपना अलग जर्नी होता हे... सगळं नारायण स्तुलाचे पॉलिश करताना बोलत होता.

साधा वेठबिगार आपला दिवस भरवायच्या मागे असतो. जो आकार बनवायला सांगितला आहे तो बनवत असतो. दिवस भरला कामाचा विचार आजपुरता थांबला. मग दुनियादारी करायला मोकळा. नारायण सारखी आपल्या आवडीशी व कामाशी असणारी कमीटमेंट त्याचा दिवस भरला तरी डोक्यातला विचार जात नाही. म्हणून तर जेवण झालं तरी नारायण कागदावर स्केचेस काढत बसतो...एखाद्या ओंडक्यात माणसाचा चेहरा रेखाटत असतो.


ज्या दिवशी त्यांना परत जायचे होते, त्या दिवशी कामं उरकून घ्यायचं सुरु होतं. तेवढ्यात एका ओंडक्यावर नारायणची नजर गेली, आणि मग पुढचे २-३ तास त्या ओंडक्याचा माणुस बनवण्यात गेले. अजून एक दिवस वाढला. जेव्हा मी टुरिझम कन्सल्टंट म्हणून काम करत असताना, लोकांच्या प्रक्षेत्र भेटीला गेल्यावर, तुमची जागा/जमीन तुम्हाला सांगते कि मला काय बनायचे आहे, माझ्या कुठल्या कोपऱ्यात काय छान होईल..हे ऐकता यायला हवं. सेम गोष्ट नारायण पण बोलला, मनोज जी. लकडी हमे बताती है के उसे क्या बनाना है..हमे बस वो सुनाई देना चाहिए.

नारायणचं काम सुरु असताना, अगदी सहज मोबाइलचा कॅमेरा सुरु करून आम्ही संभाषण सुरु केलं आणि नैसर्गिकरीत्या झालेल्या गप्पा रेकॉर्ड झाल्या. नारायणने आपल्या जादूने पुन्हा एकदा पराशरचं रुपडं बदललंय आणि मला नारायण सारखा अवलिया बऱ्याच दिवसांनी भेटल्याचे समाधान पण मिळालय.