Thursday, 9 May 2024

मन्या- बस नाम हि काफी है

 मन्या- बस नाम हि काफी है


तो घाटात आलाय हे कधीच कोणाला सांगावं लागलं नाही. बैलगाडा शर्यत असलेल्या यात्रेत बैलगाडा प्रेमी यायचे, तेच मन्याला पळताना बघायला. एरवी जिलेबी भजी, उसाचा रस, कलिंगड, शेव रेवडी अशा विविध दुकानांवर रेंगाळलेली यात्रेतील मंडळी,मन्याची अनाऊंन्समेंट झाली कि पटापट बैलगाडा शर्यतीच्या घाटावर जमा व्हायची. घाटाच्या कडेवर बसलेली लोकं पाय वर घेऊन बसायची. शक्य तेवढ्या दबक्या आवाजात बोलायची. इतरवेळचा कोलाहल मन्याच्या बारीला शांत व्हायचा. पंचकल्याणी राणी घोडी, शंभू सर्जाचं कांडं अन मन्याचा घरचा साथीदार काशी किंवा हरण्या तर कधी गुरु; अशी सगळी आपापल्या जागी जुपली गेली कि, मन्याला मोठ्या रुबाबात आणलं जायचं.
मी कल्पनेत मन्याच्या डोळ्यात जाऊन आलो. एक माणूस दोन्ही हातांनी मोरखी पकडून मन्याला जुपायला घेऊन चाललाय. मन्यात आणि शर्यतीच्या घाटात त्या माणसाचा पांढरा शर्ट आहे. चालताना हळूच, मन्याला ओझरतं असं घाटाचं दर्शन होतंय. एखाद्या झरोक्यातून बाहेर बघावं असं तुकड्या तुकड्यात घाटाच्या दुतर्फा बसलेली गर्दी, पळायचा ट्रॅक, सोबत जुंपलेला साथीदार दिसतोय. जुपणीसाठी जाडीखाली खांद देत असताना, काही सेकंद मन्याचा डोळा, सोबतच्या साथीदाराकडे वळतोय, फक्त डोळ्यांनीच दोघात काहीतरी बोलणं होतंय. तोपर्यंत तिकडं कानावर...भिर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज निघतोय... मन्याला पुढचा रिकामा ट्रॅक आणि दुतर्फा बसलेली माणसं हे सोडून काहीच दिसत नाही.
मी, मन्याच्या डोळ्याबाहेर येऊन पाहू लागतो. मागे धुळीचा भंडार आणि माणसांचा लोट उसळलेला असतो. टोप्या, फेटे आणि रुमाल त्या धुळीतून वर उडताना दिसतात, अनाउंसर दुप्पट आवेशात मन्याला साथ देतात, घाटाच्या तोंडाला निशाण पडतं, खाली इलेक्ट्रिक घड्याळात वेळ दाखवली जाते, याही वेळी मन्याने, त्याचा आधीचा रेकॉर्ड तोडलेला असतो.
मन्या कधीही न हरलेला बैल, प्रत्येक फायनल मारलेला बैल, घाटाचा राजा अशी ओळख कमावलेला पठ्ठया पण जुकाटात पळताना, साथीदार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. मन्या हा जवळेकरांचा बैल, पण त्यांच्या इतक्याच नामांकित बैलगाडा बाऱ्यांमधील मन्याला साथ देणाऱ्या आणि मन्या इतक्याच जिगरीच्या बैलांसोबत मन्याने बऱ्याचदा मैदान मारलंय. मग त्यात मांडेकरांचा हरण्या, संदिपशेठचा बलमा, अप्पासाहेबांचा बंटीशेठ , अनंतमामांचा हिरा, ब्रिजेशशेठचा झेंड्या, वाघचौरेंचा चिक्या आणि अधुरी राहिलेली वारंगे मामांच्या ओम्या सोबतची जुपणी..हि सगळी कहाणी आहे कृषक समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची.
काल एक दुर्दैवी योगायोग जुळून आला. घाटातली धूळ आणि चीठ्ठी घेऊन येणारे सूर, असं दोन्हीही एकाच दिवशी शांत झालं. बैलगाडा शर्यतीच्या घाटातील हिंदकेसरी हा 'किताब मिरवणारा, मन्या बैल, वयाच्या १८ व्या वर्षी अनंतात विलीन झाला तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (७२) यांनीसुद्धा कालच अखेरचा श्वास घेतला. मन्याचं जाणं अचानक झालं. घाटातील दुखापतीच्या निमित्ताने, मन्यावर उपचार सुरु होते पण तो असा अचानक जाईल अशी काही शक्यता नव्हती.
पंकजजी काही दिवसांपासून कर्करोगाच्या व्याधीने त्रस्त होते. उधास यांनी आपल्या गायकीला, "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है" असं म्हणत कायमचं अजरामर केलं. तर मन्या त्याच्या पळण्याने घाटाघाटावर आणि मनामनावर गारुड मिरवत राहिला. अध्यात्माच्या व्याख्येतून दोन जीव दोन योनीत जन्माला आले होते. पशु योनीचा कार्यभाग मन्याने पूर्ण केला तर मनुष्य योनीतील जन्माचा समारोप पंकज उधासजींनी केला. वैश्विक अर्थाने, या दोन्ही आत्म्यांनी आपापल्या जन्माचं पांग फेडलं, जगणं सार्थकी लावलं.
वैद्यकीय दृष्ट्या बैलाचं आयुष्य हे २०-२२ वर्षांचं असतं . पण अपवाद म्हणून, चांगली ठेप आणि जातवारपणामुळे यात वाढ झालेली सुद्धा दिसून येते. या पार्श्वभूमीवर मन्या, बैलगाडा शर्यतीच्या घाटात अजून काही वर्ष नक्की पळाला असता आणि स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्याचा युसेन बोल्ट चा स्वभाव पुरेपूर जगला असता.
मन्या जन्माने बैल जरी असला तरी कर्माने सेलिब्रेटी होता, हिरो होता. त्याने विविध घाटात मिळविलेल्या बक्षिसांवर नजर टाकली तर लक्षात येईल कि मन्या गेल्या नंतर त्याची अंतयात्रा का निघाली, त्याच्या अंत्ययात्रेला पाच हजाराहूनही अधिक लोकं का जमली? १५० पेक्षा जास्त टू व्हिलर्स, ७० पेक्षा जास्त बुलेट्स, ३ बोलेरो, १ स्कॉर्पिओ, १ थार, १ जे सी बी, २ पीक अप, ३ ट्रॅक्टर, १०० तोळं सोनं आणि १ कोटीपेक्षा जास्त रकमेची नगदी बक्षिसे. हि बक्षिसं मन्याचं असणं जेवढं अधोरेखित करतात तेवढंच त्याचं आता इथून पुढं नसणंहि जिव्हारी लावून जातात.
मी पुन्हा मन्याची काळजी घेणाऱ्या, त्याला चारापाणी करणाऱ्या त्या ४-५ लोकांमध्ये जातो. ज्याला जग सलाम करत असतं, ज्याला दुनिया डोक्यावर घेत असते, त्याची काळजी घेणारा, हवं नको ते बघणारा व्यक्ती हा त्या हिरोला हिरोपणाव्यतिरिक्त ओळखत असतो. मन्या जेव्हा शर्यत मारून येत असेल, गर्दीतून गाडीत आणि गाडीतून गोठयावर येत असेल तेव्हा त्याची ओवाळणी झाल्यावर त्याला चारापाणी करणाऱ्या व्यक्तीला तो काय सांगत असेल? एकमेकाला सवयीने लाभलेला सहवास आणि सहवासाची झालेली सवय आता सोडावी लागेल हे मन्याच्या "थापाला" स्वीकारावं लागेल.
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात, शेतीचा टप्पा हा उल्लेखनीय मानला जातो. जेव्हा हीच शेती, एक संस्कृती म्हणून विकसित होते तेव्हा त्यातील प्रत्येक घटक उत्क्रांत होत असताना वारसा निर्माण करत असतो. पाळीव प्राणी आणि शेतकरी यांचं नातं या सांस्कृतिक वारश्याची अतिशय हळवी बाजू आहे. आणि जेव्हा असं बैलगाडा शर्यतीच्या रूपाने, मन्या सारखी दंतकथा वाटावी अशी खरी गोष्ट घडते तेव्हा..कृषी संस्कृतीची हि परंपरा ओरडून ओरडून सांगावी असं वाटत राहतं. मागील १२ वर्षांच्या पराशर कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून आपण हे ऍग्री हेरिटेज, वेगवगेळ्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहे. आणि पुढेही या पालखीचे भोई होऊ हीच मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
मनोज हाडवळे

No comments:

Post a Comment