Tuesday, 18 June 2024

पाऊस, माती, गवत आणि जीव

 

पाऊस, माती, गवत आणि जीव

ओलावा, पाण्याचा असो कि मायेचा, त्याच्याशिवाय जगण्याला चाल मिळत नाही. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधात असणाऱ्या देशात हा ओलावा पावसाळ्यात पावसाने येतो तर हिवाळ्यात दवाने. आपल्याकडे पाऊस येतो त्याला मान्सून म्हणतात. भारतात हा मान्सून पोहोचायला जून जरी उजाडत असला तरी, वाऱ्याने हे काम खूप आधीपासून सुरु केलेलं असतं. एरवीचे ढगांचे पांढरे शुभ्र रांजण, पाण्याच्या वजनाने काळे पडतात, आणि या वजनदार रांजणांच्या उतरंडी लांबवरचा प्रवास करून भारतात पोहोचतात. या उतरंडीतून, एक एक रांजण रिता होत, उतरंड उत्तरेकडे सरकत जात घागरी बनतात. हिमालयाच्या पायावर अभिषेक करून; पुन्हा वाऱ्यासोबत उरलंसुरलं पाणी घेऊन या घागरी परतीला निघतात त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो.

मान्सूनच्या आगमनाच्या वेळी यत्र तत्र सर्वत्र पंचमहाभूतांचे तांडव बघायला मिळते. कवेत घेता येणार नाहीत आणि आकारही मोजता येणार नाही अशा अजस्र आकाराचे २ ढग जेव्हा एकमेकाला धडकतात तेव्हा उठणारा विजेचा लोळ, जमिनीपर्यंत येतो तेव्हा कानठळ्या बसवणारा आवाज येतो. आकाशाच्या पोकळीत; वाऱ्याच्या मदतीने झाडांच्या फाद्यांच्या  पताका उडवत, मोकळ्या मातीचा गुलाल उधळत, ढगांचे ढोल बडवत, विजांची आताषबाजी करत टपोऱ्या थेंबांचा तांडव नाच...हि पंचमहाभूतांची निसर्गाने काढलेली मिरवणूक, आपल्याला आपला आवाका आणि कुवत जाणवून देण्यासाठी पुरेशी असते.     


हा मान्सून बरसायच्या आधी, पूर्वमोसमी वळीव, अंगणात सडा टाकावा असा मनात येईल तिकडे पडत असतो. ऐन वैशाखातील तापलेल्या जमिनीवर पडणारे वळवाच्या पावसाचे थेंब, मातीची तहान भागवतात. मातीने सगळा उन्हाळा स्वतःला तावून सुलाखून काढलेले असते. मातीचा एक सेमी जाडीचा जिवंत थर  बनायला हजारो वर्ष लागतात. आणि पावसाच्या पाण्यासोबत अशीच थरच्या थर माती वाहून जाते. माती म्हणजे काय फ़क़्त उन वारा पावसाने झीज होऊन बनलेली दगडाची भुकटी नसते. या दगडाच्या भुकटीत जेव्हा जीवजंतू मिक्स होतात तेव्हा ती माती बनते. मृत गोष्टी एकत्र येऊन जिवंत होणारी माती बहुदा जगाच्या पाठीवरची एकमेव गोष्ट असावी. माती पांढरी, लाल तसेच काळी असते. माती जिवंत असते, पावसाची ओल मिळताच ती वयात येऊ पहाते. पाऊस पडून गेल्यावर, आलेल्या ओलीने माती लेकुरवाळी होते. डोळ्याला दिसणारे न दिसणारे सगळेच जीव, माती, मोठ्या मायेने सांभाळते. पावसाळ्यातील काळी माती होईल तेवढं पाणी पोटात साठवून घेते आणि उन्हाळ्यात तीच माती सुरकतून आणि भेगाडून जाते. पुढच्या पावसाची वाट बघत निपचित पडून रहाते आणि तिच्याच पोटात झोपी जातात सगळे जीव; कोणी बी बनून तर कोणी कोषात जावून.


पावसाची चाहूल लागताच, तीच्या पोटात जे जे कोणी आश्रयाला येऊन पहुडले आहेत, त्यांना ती जागं करते. उठा..उठा रे उठा आता...तो आलाय, त्याच्या स्वागताला सज्ज व्हा, धूळ झटका, त्याच्यासाठी हिरवा गालीचा घाला. माती सगळ्यांना साद घालत जागं करते. पहिल्या पावसाचा शिडकावा मातीला वास आणतो. वरकरणी तो मातीचा वास वाटत असला तरी, ती डोळ्याला न दिसणाऱ्या एका सुक्ष्मजीवाच्या झोप मोडीच्या आरोळी देताना बाहेर आलेल्या लाळेचा वास असतो. तो बिचारा डोळे चोळत उठत हळूच बघतो तर काय सगळेच उड्या मारत आहेत. जरी ते सूक्ष्मजीव असले तरी त्यांच्याही गोंगाट आणि पहिल्या पावसाचा जल्लोष जोरदार असतो. फ़क़्त त्यांचा आवाज ऐकणं हे आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. पहिल्या पावसात अनेक किड्यांना पंख फुटतात. त्यांची मिलनाची घाई सुरु असते. त्यांना माहित असतं कि आता विसाव्याचे क्षण...एकदा मिलन झालं कि आपला कार्यभाग संपला. रात्री लाईट जवळ जणू काय सगळे जमतात, एकमेकांचे निरोप घेतात, रात्र जागवतात. सकाळी उठून पाहिल्यावर, लाईट जवळ जो पंखांचा खच पडलेला दिसतो, तो त्या किड्यांच्या या जन्मीच्या समारोपाच्या खुणा असतात.


मृगाचा किडाही याच काळात आपल्या मिशा वाढवतो. याच मिशांनी मादीला आकर्षित करून, मिलन करून, मादी लाकडाच्या फटीत अंडी घालते. अंड्यातून आलेली बोटाच्या पेऱ्याएवढी असणारी याची पांढरी अळी, तोंडाला मात्र करवतीचा दात बसवून असते. लाकडाला येणारा कर कर आवाज, याच मृगाच्या किड्याच्या अळी बाईचं कुरतडणं सुरु असतं. हीच पुढे कोशात जावून पाऊस येण्याची वाट बघते. पाऊस आला कि पुन्हा मिशांवर ताव मारत साहेब हजर होतात. मासा पाण्याशिवाय रहात नाही हे खरय पण हेही तितकंचं खरय कि डोंगर माथ्यावर आणि कातळ पठारावर दगडाच्या तळहातावर पाणी जमा व्हावं तशी डबकी तयार होतात आणि त्यात छोटे मासे व पाण्यातील किडे वाढीस लागतात.


गवताचंही तसच आहे. एखाद-दुसरा पाऊस पडला कि, गवताचं, मातीत झोपलेलं बी अंगावर पाणी ओतावं आणि झोपेतून उठवावं अशा अविर्भावात डोळे चोळत, हळूच मातीचं पांघरून बाजूला सारून वर डोकावतं. अवतीभवती बघतं, त्याच्या सारखेच असंख्य अगणित वेगवेगळ्या जातीभातीचे भाऊबंद आपापले रीतीरिवाज सांभाळत, आळस झटकत जमिनीच्या वर आलेले असतात. मग पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत आणि सरत्या काळासोबत, हे गवती भाऊबंध, पाना पानाने वाढीस लागतात. निसर्ग अशा वेळी भेदभाव करत नाही. एकीकडे गवत वाढत असताना, त्याची प्राणी जगतातील इतर मुलंही, पुढची वाटचाल सुरु करतात.


"आपण" सगळेच आधी गवत खायचो. आताही आपण गवतच खातो. गवताची मुळं, खोड, पानं, फुलं, फळं असं सगळंच, आधीपासूनच आपलं अन्न राहिलंय. आपण म्हणजे सर्व प्राणी जगतातील जाती प्रजाती. या गवताची गंमत म्हणजे हे अमर असल्याचे वरदान घेऊन आलंय. कितीही पाऊस पडूद्या किवा भयंकर दुष्काळ असुद्या; गवताचं बी आपला जीव सांभाळून असतं. जीवसृष्टी कळत्या वयात आल्यापासून गवत खात आलीय. आपण याच गवतातून हवं ते गवत निवडत, काही ठराविक गवतावरच आपली गुजराण सुरु ठेवलीय. त्याला आपण तृणधान्य, कडधान्य, तेलबिया असं वर्गीकरण करतो.


पाऊस, माती, गवत, जीव या सगळ्या गोष्टींचं मला लहानपणापासून आकर्षण होतं.त्यामुळेच बारावीला बायोलॉजी घेतलं. शेतात काम करताना मातीतले, बियाण्यातले अंतरंग अनुभवले होते, ते तसे का आहेत? याच उत्तर पुढच्या शेतीच्या शिक्षणात मिळालं. या सर्वाचा, कृषक संस्कृतीशी सलग्न जगण्यावर काय काय परिणाम होतो याचा अनुभव वर्ध्यातील नोकरीत आला. कृषक संस्कृतीतील अर्थकारणाचा अर्थ दक्षिण भारतातील कांदा विक्रीच्या व्यवसायात आला आणि मानवाच्या एकदंर प्रवासात स्वतःचा शोध घेणं किती महत्वाचं आहे याची अनुभूती, मागील १०-१२ वर्षांच्या मातीशी निगडीत पर्यटनाच्या कामात मिळाली.

आयुष्याची गोष्टच न्यारी आहे...जी पाऊस, माती गवत आणि जीवाशी निगडीत आहे.

मनोज हाडवळे

No comments:

Post a Comment