Tuesday, 9 June 2026

महाराष्ट्र शासनाचे बीच Shack धोरण

 

महाराष्ट्र शासनाचे बीच Shack धोरण



दिनांक १७ ऑगस्ट २०२० शासन निर्णय-

राज्यातील समुद्र किनाऱ्यालगत शासकीय व खाजगी जमिनीवर आरामखुर्च्या आणि मोठ्या छत्रीसह तात्पुरत्या हंगामी चौपाटी कुट्या, सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र, उभारण्यासाठीचे पर्यटन धोरण

] शासकीय जमिनीवर सुविधा उभारण्यासाठीच्या अटी व शर्थी  

·       निश्चित केलेल्या चौपाटी क्षेत्रावर निर्देशित ठिकाणी चौपाटी कुटी उभारण्यासाठी परवाना देण्यात येईल.

·       महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (MCZMA) सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या चौपाटी क्षेत्रावर फ़क़्त चिन्हांकित ठिकाणीच तात्पुरती चौपाटी कुटी उभारण्यासाठी परवाना देण्यात येईल.

·       पहिल्या वर्षी महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (MCZMA) मंजूर केलेल्या योजनेनुसार रत्नागिरी (गुहाघर, अरेवारे), सिंधुदुर्ग (कुणकेश्वर, तारकर्ली), रायगड (वरसोली, दिवेआगार), प्ल्घर (केळवा, बोर्डी) या ८ किनारपट्टीवर (प्रत्येक जिल्ह्यातील २ किनारपट्ट्या याप्रमाणे) या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

·       समुद्र किनाऱ्यांची यादी आणि अर्जाचा नमुना हा http://www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल दुसर्या वर्षापासून, पर्यटन विभागाच्या पूर्व परवानगीने उतार योग्य चौपाट्यांवर या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल.  

·       समुद्र चौपाटी साठी परवानगी दिलेल्या चौपाटी कुटींपैकी (कमाल मर्यादा 10) चौपाटी कुटी वाटप करताना जिल्ह्यातील अनुभवी स्थानिक उद्योग धंदा करणाऱ्या संस्था/ व्यक्ती यांना प्राधान्य दिले जाईल.

·       सर्व कुटयांचे वाटप जाहिरातीद्वारे आणि पारदर्शक संगणक पद्धतीने करण्यात येईल.

·       प्रत्येक चौपाटीवर फक्त दहा कुटयांचे वाटप करण्यात येईल आणि दोन कुटयांमधील अंतर किमान 10 मीटर इतके असले पाहिजे.

·       सर्व चौपाटी कुटयांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. स्थानिक व्यक्ती म्हणजे त्या जिल्ह्यातील सर्वसाधारण वास्तव्य करणारी व्यक्ती असे समजण्यात येईल.

·       निश्चित करण्यात आलेल्या चौपाटी क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या चौपाटी कुटी नियत वाटपासाठी विहित नमुन्यातील अर्ज जनतेकडून मागविण्यात येतील. एका कुटुंबातील एकाच सदस्याला एक चौपाटी कुटी उभारण्यासाठी परवाना देण्यात येईल.

परवाना कालावधी चौपाटी कुटयांचे 3 वर्षाकरिता वाटप करण्यात येईल.

स्पष्टीकरण

या कलमाच्या प्रयोजनार्थ कुटुंब यामध्ये पती किंवा पत्नी त्यांच्यावर अवलंबून असणारे माता पिता आणि अविवाहित मुले यांचा समावेश असेल. परंतु अर्जदाराचे नाव ज्या शिधापत्रिकेत आहे त्याच शिधापत्रिकेत त्यांची नावे असली पाहिजे.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही विरुद्ध त्याने चौपाटी कुटी मिळविण्याकरता या धोरणाचे उल्लंघन केल्याची तक्रार कागदोपत्री पुराव्यानिशी पर्यटन संचालनालयाकडे प्राप्त झाल्यास तक्रारीची शहानिशा करून अशा वाटपग्राहिस देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात येईल आणि कोणतीही नोटीस न देता सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल अशा चौपाटी कुटीचे प्रतीक्षा यादीतील पुढील अर्जदारास पुनरवाटप करण्यात येईल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही कुटीमध्ये काम करण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी ठेवू शकेल.

·       चौपाटी कुटी फक्त परवान्या मध्ये निर्देशीलेल्या आणि पर्यटन संचालनालयाने तयार केलेल्या स्थळ नकाशात नेमून दिलेल्या आणि वाटपग्राहीला प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखविलेल्या निर्देशित ठिकाणावरच उभारण्यात येईल.

·       यशस्वी चौपाटी कुटी वाटपग्राही, पर्यटन संचालनालयाकडून परवाना मिळविल्या नंतरच चौपाटी कुटीची उभारणी करेल. मात्र इतर सर्व विभागांकडून परवानगी/ना हरकत प्रमाणपत्र/परवाना मिळविल्याखेरीज चौपाटी कुटीचा वापर सुरू करता येणार नाही या बाबतच्या अनुपालनात कसूर केल्यास देण्यात आलेल्या परवाना तात्काळ रद्द होण्यास पात्र असेल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही ग्राहकांना अन्न, अल्पोपहार आणि इतर कोणत्याही सेवेच्या आकारासाठी रीतसर छापील पावती देईल.

·       अयशस्वी अर्जदार कोणतीही अवैध चौपाटी कुटी उभारणार नाही. तसे केल्यास त्याच्या/ तिच्या जोखमीवर आणि स्वखर्चाने ते बांधकाम पाडण्यात येईल. तसेच पर्यटन संचालनालयाकडून यशस्वी अर्जदारांनाद्वारे भरण्यात आलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि त्याला/तिला काळ्या यादीत टाकून, 3 वर्षाकरिता अर्ज करण्यास प्रतिबंध करण्यात येईल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही संरचनेस अग्निसुरक्षा कवच आणि पर्यटकांना प्रथमोपचार पुरवण्याची तरतूद करेल आणि त्या संदर्भात मार्गदर्शन मिळविण्यासाठी अग्निशमन सेवा कार्यालयाशी संपर्क साधेल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही पक्षी व प्राणी यांच्या संरक्षणाची खातरजमा करेल. पर्यटकांना पक्षी, प्राणी आणि अन्य स्थानिक जनावरांना खाद्यपदार्थ घालण्याची मुभा असणार नाही. वाया गेलेल्या आणि खरकट्या अन्नपदार्थांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात आहे आणि ते वन्यजीवांना अन्य म्हणून देण्यात येणार नाही याची खबरदारी चौपाटी कुटी वाटपग्राही घेईल.

·       समुद्री कासव किंवा देवमासे यांसारखे कोणते सस्तन जलचर किंवा किनारी प्राणी चौपाटी कुटी वाटप ग्राही च्या दृष्टीस पडल्यास त्याची माहिती तो वनविभाग व पर्यटन विभागास देईल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही अन्नपदार्थ आणि पेय देण्यासाठी जैवविघटनशील ताटे, पेले, डबे यांचा वापर करेल. विशेष करून त्या त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या स्रोतांपासून बनवलेल्या जैवविघटनशील साहित्याच्या उदा. सुपारीच्या पानांपासून बनवलेली ताटे व वाट्या वापरास प्रोत्साहन देईल.

·       देण्यात आलेला परवाना नियत वाटपाच्या आदेशानुसार असलेल्या कालावधी पर्यंतच वैध असेल आणि त्या विशिष्ट पर्यटन हंगामापुरते 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत साठीच तात्पुरती संरचना उभारण्यास परवानगी देण्यात येईल. दिलेला परवाना हा अन्न व औषध प्रशासन, विद्युत अग्निशामक विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि लागू असतील अशी इतर संबंधित प्राधिकरणे यांसारख्या विभागांकडून वाटपग्राही मिळविण्याच्या आवश्यक परवान्यांच्या आधी असेल.

·       पर्यटन संचालनालयाकडून परवाना देण्यात आला आहे केवळ अशा चौपाटी कुटयांनाच संबंधित विभाग परवाना देतील. अशी कुटी वाटप केलेल्यांची यादी संबंधित विभागांना पाठवण्यात येईल.

·       अवैध चौपाटी कुट्या/अवैध आराम खुर्च्या भारणीस प्रतिबंध करण्यासाठी, स्थानिक पोलिस किनार्‍यांवर कडक निगराणी ठेवतील. त्यांच्या अधिकारीतेखाली असणाऱ्या किनाऱ्यांवर; फेरीवाले, मालिशवाले, भटके आणि अंमली पदार्थांचे विक्रेते यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येणार नाही.

 

 

 

सार्वजनिक किनाऱ्यांवरील चौपाटीकुटयांचा आकार व त्यांची संख्या

·       फक्त गाळ्यांसाठी (किचन सह) दुकान असणाऱ्या चौपाटी कुटीचा आकार 15 फूट (लांबी) x  15 फूट (रुंदी) तेवढा असेल आणि छतावर लावण्यात येणाऱ्या फलकाच्या उंची सह चौपाटी कुटीची उंची जास्तीत जास्त 12 फूट असेल.

·       गाळ्याच्या समोर खुर्च्यासह टेबले अशा बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद इतक्या क्षेत्रास वरून छत घालण्यास मान्यता देण्यात येईल.

·       विनिदृष्ट केलेल्या आकारापेक्षा अधिक आकाराच्या कोणत्याही चौपाटी कुटीस परवानगी देण्यात येणार नाही.

·       कोणत्याही चौपाटी कुटीस पोटमाळा किवा अतिरिक्त मजल्यास परवानगी देण्यात येणार नाही.

·       चौपाटी कुटीचा आकार प्रत्यक्ष बांधकामा एवढाच उदा. जमिनीवर प्रत्यक्ष (व्याप्त) असलेल्या क्षेत्रा एवढाच असेल आणि त्याची मोजणी चौपाटी कुटीच्या चारही कोपऱ्यात उभारण्यात आलेल्या खांबापासून करण्यात येईल.

·       दोन्ही बाजूंच्या जोत्यापासून एक मीटर आणि समोरील बाजू पासून दोन मीटर इतक्या छताच्या कमाल विस्तारास परवानगी देण्यात येईल. मात्र चौपाटी कुटिच्या मागच्या बाजूच्या छताचा कोणताही विस्तार असणार नाही.

·       अनुज्ञेय असणाऱ्या आकारापेक्षा अधिकार असणाऱ्या चौपाटी कुठे पाडण्यास पात्र असतील आणि त्यांची परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. पंचनामा झाल्यावर आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आल्यावर चौपाटी कुटी क्षेत्र अनाधिकृतपणे वाढवण्यात आले आहे/ चौपाटी कुटी पुन्हा बांधण्यात आली आहे असे सिद्ध झाल्यानंतर कोणतीही नोटीस न देता सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्यात येईल.

परवाना शुल्क वार्षिक परवाना फी व सुरक्षा अनामत

·       परवान्यासाठी अर्जाचे मूल्य रुपये 15000 वाटपग्राही साठी न-परतावा व इतरांना परतावा योग्य असेल.

·       अर्जदाराने प्रत्येक पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला फक्त एकच अर्जाचा नमुना (3 वर्षासाठी) अर्जाच्या शुल्कासह सादर करणे आवश्यक आहे. तथापि, वाटपग्राहीने दरवर्षी कुटीच्या वाटपाचे वार्षिक शुल्क भरणे गरजेचे असेल.

·       लॉटरी प्रमाणे नंबर लागल्यानंतर दुसरा धनाकर्ष द्यावा लागेल. धनाकर्ष संचालक पर्यटन संचालनालय यांच्या नावे काढण्यात यावेत धनाकर्ष शिवाय आलेला अर्ज तात्काळ फेटाळण्यात येईल. हंगामी कुटीसाठीची वार्षिक परवाना फी पुढील प्रमाणे असेल.

 पहिले वर्ष               रुपये 45000

 दुसरे वर्ष                रुपये 50000

 तिसरे वर्ष               रुपये 55000

 

·       वार्षिक चौपाटी कुटी शुल्क पहिल्या वर्षात लॉटरीप्रमाणे वाटप आदेश मिळाल्यानंतर आणि इतर 2 वर्षाकरिता उशिरात उशिरा 15 सप्टेंबर पर्यंत भरण्यात यावे.

·       चौपाटी कुटी वार्षिक शुल्क न भरल्यास वाटपग्राहीस वाटप करण्यात आलेल्या जागेवर चौपाटी कुटी उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

·       चौपाटी कुटीच्या वाटपग्राहीने संबंधित वर्षाच्या 15 सप्टेंबर या तारखेपर्यंत वार्षिक शुल्क न भरता चौपाटी कुटी उभारण्यात आल्याचे आढळून आल्यास चौपाटी कुटी कोणतीही नोटीस न देता पाडण्यात येईल आणि वाटप ग्राहीची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.

·       जर चौपाटी कुटी मिळण्यास यशस्वी झालेला वाटपग्राही इतर सर्व आवश्यक विभागांचा परवाना/परवानगी पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत चौपाटी कुटी उभारण्यास अपयशी ठरल्यास कोणत्याही नोटीशी शिवाय चौपाटी कुटी शुल्क जप्त करण्यात येईल.

सुरक्षा अनामत

·       प्रत्येक यशस्वी अर्जदार चलनाद्वारे भरण्यात यावयाची आणि पर्यटन संचालनालयाच्या नावे शासकीय कोषागारात जमा करावयाची रुपये 30000 (रुपये तीस हजार फक्त) इतकी परतावा योग्य सुरक्षा अनामत जमा करेल. परवान्याचा 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ही अनामत रक्कम परत केली जाईल. तथापि तत्पूर्वी ती जप्त केलेली असता कामा नये.

·       तात्पुरत्या हंगामी संरचनेच्या उभारणीसाठीच्या पर्यटन धोरणाच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये कसूर केल्यास किंवा त्याचे उल्लंघन केल्यास किंवा त्याचे अनुपालन न केल्यास किंवा प्रचलित कायद्याअंतर्गत प्रतिबंधित आहे अशा इतर कोणत्याही अटीचा भंग केल्यास; कोणत्याही नोटिशी शिवाय र्जदाराकडून जमा करण्यात आलेली सुरक्षा अनामत जप्त करण्यात येईल.

·       अशाप्रकारे वाटप करण्यात आलेली तात्पुरती चौपाटी कुटी उभारण्यासाठीचा परवाना पुढे चालू ठेवण्यासाठी वाटपग्राहीने तेवढ्याच रकमेची नवीन सुरक्षा अनामत 10 दिवसांच्या आत पुन्हा भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास अशा पद्धतीने देण्यात आलेला परवाना चौपाटी कुटी वाटपग्राहीला कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल.

·       वाटपग्राहीने परवाना कालावधीच्या प्रत्येक वर्षी अधिकतम 10 जून पर्यंत कुटी जागेवरून हलवली पाहिजे व जमीन आहे त्यामुळे स्थितीत परत केली पाहिजे. संबंधित पर्यटन उपसंचालकांकडून याबाबत उशिरात उशिरा 30 जून पर्यंत, कुटी निष्कासन झाल्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे.

·       वाटपग्राहीने कुटी काढून टाकण्यास व उपसंचालकांकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्यास कसूर केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने, अर्जदाराच्या खर्चाने व त्याच्या जोखमीवर स्थानिक पोलिसांच्या साह्याने महसूल विभागाच्या नायब तहसीलदार यांच्या पथकाद्वारे कुटी मोडण्यात येईल. आणि अशा प्रकारे पाडण्यासाठी झालेला खर्च र्जदाराकडून वसूल करण्यात येईल.

·       प्रत्येक वर्षीच्या निष्कासित प्रमाणपत्रासह 3 वर्षाच्या शेवटी वाटपग्राही सुरक्षा अनामत परत मिळण्यासाठी अर्ज करेल. प्रमाणपत्रासह अर्ज मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत सुरक्षा अनामत रक्कम परत दिली जाईल.

·       चौपाटी कुटी, बांबू, लाकडी खांब तसेच छतासाठी माडाच्या झावळ्या, बांबूची चटई यासारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून उभारण्यात येईल. वाटपग्राहिस कुटीसाठी पोर्टा केबिनचा वापर करता येईल किंवा पर्यावरण विभागाने सुचविलेल्या अन्य साहित्यापासून कुटी बनवता येईल तथापि कुटी बनवण्यासाठी काँक्रीटच्या साहित्याचा वापर पूर्ण मनाई असेल.

·       महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण द्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मळलेला चुना वापरण्यास गिलावा देण्यास, लादीवर/संरचनेवर, पीसीसी/आरसीसी लावण्यास मुरवण्यासाठी खड्डा खणणे, पाईपसाठी खड्डा खणणे व त्यात पाय बसवणे धातूचा जिना बसवणे, सिमेंट मध्ये चुना मिसळणे इत्यादी गोष्टींना परवानगी असणार नाही.

·       कुटी निर्मितीसाठी प्रमाणीकृत संकल्पचित्र निश्चित करणे आणि उपरोक्त पैकी एका साहित्याची निवड करणे याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा हक्क केवळ पर्यटन संचालनालया असेल. या प्रयोजनासाठी पर्यटन संचालनालय संकल्पचित्र व साहित्य यांची निवड करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेईल आणि संकल्पचित्र अनुसार कृटी उभारण्यासाठी नियुक्त प्रकल्प सल्लागार वास्तुविशारद यांची मान्यता घेईल.

·       जर कुटी वाटपग्राहीने परवानगी देण्यात आलेल्या वस्तू/साहित्य व्यतिरिक्त अन्य कोणत्याही अतिरिक्त वस्तू/साहित्य चौपाटी किनाऱ्यावर वापरल्याचे आढळून आल्यास त्या वस्तू साहित्य पर्यटन संचालनालयाद्वारे जप्त करण्यात येईल. त्याचा लिलाव करणे, त्याची विल्हेवाट लावणे हा पर्यटन संचालनालयाचा स्वेछा निर्णय असेल.  अशी कुटी परवाना रद्द करण्यास देखील पात्र असेल.

·       यशस्वी चौपाटी कुटी वाटपग्राहीची यादी खाली नमूद केलेल्या संबंधित अधिकारी विभागांना कळविण्यात येईल

तहसीलदार

स्थानिक पोलिस स्थानक

प्रमुख कार्यकारी अभियंता

महावितरण

ग्रामपंचायत/सरपंच/मुख्याधिकारी नगरपरिषद

निरीक्षक अन्न व औषध प्रशासन

अग्निशमन केंद्र

प्रमुख/सदस्य/सचिव महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

बंदर अधिकारी

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड

 

·       शस्वी चौपाटी कुटी ग्राहीची यादी पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल. संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचा उशीर न करता अर्जदारांची परवाना/ना हरकत प्रमाणपत्रे यांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात येईल. जे परवाने लोकसेवा तक्त्यामध्ये आधी सूचनांमध्ये नसतील, अशा करिता आवश्यक कागदपत्रांचे अनुपालन पूर्ण केल्यापासून, 30 दिवसांच्या आत संबंधित विभागाने परवाना/नाहरकत संबंधितांना देणे बंधनकारक असेल. विहित कालावधीत परवाना न दिल्यास तो परवाना दिला आहे असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबत उपसंचालक पर्यटन संचालनालय कोकण विभाग हे नोडल अधिकारी असतील व ते वाटपग्राहीस परवाना मिळविण्यासाठी विहित पद्धतीने सहाय्यक करतील.

·       एकदा का हंगाम संपला की कुटी काढून टाकण्यात येईल आणि परवानगी समाप्ती झाल्यापासून 10 दिवसांच्या आत (तात्पुरता वीजपुरवठा, पाणी जोडणी केलेली असल्यास खंडित करणे यासह इतर) स्वयंपाक घरातील वापरण्यात आलेले सर्व साहित्य काढून टाकण्यात येऊन ते क्षेत्र रिक्त करण्यात येईल आणि त्या ठिकाणी कोणतीही घाण, निरुपयोगी साहित्य न ठेवता ती जागा स्वच्छ करण्यात येईल.

·       जर वाटपग्राही 10 दिवसांच्या आत बांधकाम काढून टाकण्यास कसूर करील तर त्याचा/ तिचा चौपाटी कुटी करिताचा अर्ज, 3 वर्षाच्या कालावधीसाठी नाकारण्यात येईल.

·       जर कोणत्याही प्रतिकूल हवामान स्थितीमुळे किंवा चौपाटी किनार संरक्षणाच्या कारणामुळे अथवा जनहिताच्या असे कोणते काम/उपक्रम पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्यास; पर्यटन संचालनालयास विनीदृष्ट तारखेपूर्वी अशा कोणत्याही कुटीची दिलेली परवानगी काढून घेता येईल. आणि अशा प्रकरणात वाटप ग्राही परवानगी धारक कोणत्याही नुकसान भरपाई पात्र ठरणार नाही.

·       नेमून दिलेल्या कुटीच्या जागेच्या आत, अन्न तयार करण्यास व अन्नपदार्थांची विक्री करण्यास मुभा असेल, मात्र बाहेरील परिसरात तशी मुभा नसेल.  तसेच कॉफी चहा यांचे यंत्र, ओव्हन तसेच पेयांच्या साठवणीकरता शीतकपाट (फ्रिज) ठेवण्याची मुभा असेल.

·       चौपाटी कुटीमध्ये आणि तिच्या सभोवतालच्या परिसरात आरोग्यदायी व स्वच्छ वातावरण ठेवणे (कुटीच्या चहूबाजूंनी 5 मीटरपर्यंत) ही कुटी वाटपग्राहीची जबाबदारी असेल.

·       कुटी वाटपग्राही स्थानिक खाद्यपदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही असला पाहिजे. वाटपग्राहिस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (फॉर्म किंवा फॉर्म 2) हा परवाना घेऊन पर्यटकांना कुटीमध्ये सॉफ्ट बियर किंवा वाईन देता येईल.

·       वाटप झालेली कुटी कोणत्याही परिस्थितीत पोट भाड्याने देता येणार नाही. कुटी पोट भाड्याने दिल्याचे कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध झाले तर त्याच वेळी ती निष्कासित करण्यात येईल आणि प्रतीक्षा यादीतील पुढच्या अर्जदाराला तिचे वाटप करण्यात येईल व कोणतीही सूचना न देता सुरक्षा अनामत जप्त करण्यात येईल.

·       वाटप झालेली चौपाटी कुटी पर्यटन संचालनालयाच्या धिकार्‍यांकडून अनपेक्षित तपासणीच्या आधीन असेल आणि जर लागोपाठ 3 तपासणीदरम्यान वाटपग्राही अनुपस्थित असल्याचे आढळून आल्यास, असे गृहीत धरले जाईल की ती कुटी पोट भाड्याने देण्यात आली आहे; आणि कुटीचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच कुटी वाटपग्राहीस कुटीच्या वाटपासाठी अर्ज करण्यास मनाई करण्यात येईल.

·       सार्वजनिक चौपाटी कुटीच्या अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी किंवा एखाद्या अपराधासाठी त्यांच्यावर दोषारोप ठेवलेला नसावा आणि भारतातील कोणत्याही फौजदारी न्यायालयात त्याच्या विरोधात कोणतेही दोषारोपपत्र प्रलंबित नसावे. ज्यांच्याविरुद्ध भारतातील कोणत्याही न्यायालयात गुन्हेगारी दोषारोपपत्र प्रलंबित आहेत अशा व्यक्तींकडून तात्पुरती कुटी उभारण्यासाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज फेटाळण्यात येतील.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही, घाणेरडे पाणी, द्रवपदार्थ सांडपाणी, ओला कचरा किंवा कोणता सुका कचरा; समुद्र किनाऱ्यावर किंवा तेथील वाळू मध्ये टाकणार नाही.  कुटी वाटप ग्राहीने, विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा वेगळा ठेवण्यासाठी किमान चार कचराकुंड्या ठेवणे आवश्यक आहे.

·       प्रत्येक वाटपग्राही भांडी धुणे इत्यादी मुळे निर्माण झालेले सांडपाणी जमा करण्याकरिता स्वतंत्र भांडे (कंटेनर) ठेवीन संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका यांनी त्या ठिकाणचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट करावी. याकरिता संबंधित ग्रामपंचायती/नगरपालिकेने निश्चित केलेली योग्य रक्कम वाटपग्राही अदा करेल.

·       पर्यटन संचालनालय, बेकायदेशीररित्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार्‍यांवर दंड आकारेल. आणि )कचराकुंड्या न ठेवणे, ब)कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे, क) चौपाटी क्षेत्राच्या आसपासचा भाग किंवा कोणत्याही भागात ठिकाणी बेकायदेशीर कचरा टाकणे/पुरणे या बाबींसाठी वाटपग्राहिचा परवाना देखील रद्द करेल.

·       कचरा टाकण्यासाठी 50 लिटर आकाराचा (काळा) सुका कचरा, (हिरवा)ओला कचरा, (निळा) प्लास्टिक अशा रंगाच्या स्वतंत्र कचराकुंड्या निर्देशित क्षेत्रांमध्ये ठेवाव्यात.

·       सर्व चौपाटी कुटी वाटपग्राही समुद्रकिनार्‍यावर गरजेनुसार अतिरिक्त कचराकुंड्या ठेवू शकतील.

·       चौपाटी कुटी उभारण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिकेची परवानगी प्राप्त करण्यात येईल आणि वाटपग्राहीला नियमानुसार देय असलेला स्थानिक संस्था कर भरावा लागेल.

·       चौपाटी कुटी वाटप ग्राही कडून कुटी सभोवतालचे क्षेत्र स्वच्छ ठेवण्यात यावे कोणत्याही स्वरूपातील टाकाऊ वस्तू कचरा जाण्याची किंवा पुरण्याची मुभा असणार नाही. जर कोणतीही घाण/कचरा/जळाऊ लाकूड/कोळसा इत्यादी कुटीच्या मागे किंवा जवळपास आढळल्यास कुटीचा परवाना त्वरित रद्द होण्यास पात्र असेल. आणि चौपाटी कुटी वाटप ग्राहीच्या जोमीवर व त्याच्या स्वखर्चाने कुटी पाडण्यात येईल.

·       कोणत्याही प्रकारचा कचरा झुडपांमध्ये, वनस्पतींमध्ये, शेवाळ किंवा वाळूच्या टेकडीवर पुरला/जाळला जाणार नाही हे पाहण्याची जबाबदारी कुटी वाटग्राहीची असेल.

·       कुटी मालक संबंधित ग्रामपंचायतीने/नगरपालिकेने नियुक्त केलेल्या समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराकडे सफाई कर्मचाऱ्याकडे वेगवेगळा केलेला ओला व सुका कचरा देईन. आणि त्यासाठी एक उचित रोज वही ठेवील व त्यात दैनंदिन नोंदी करील.

·       स्थानिक संस्थांच्या या सेवांकरिता पर्यटन विभाग, प्राप्त झालेल्या परवाना शुल्काची 10 टक्के रक्कम त्यांना हस्तांतरित करील. याव्यतिरिक्त संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका यांना वाटप ग्राही कडून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वाजवी शुल्क आकारण्याचा हक्क असेल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राहीस अन्नपदार्थ यादी/दरांचा समावेश असलेले 4 फूट x 5 फूट आकाराचे 2 खाद्यपदार्थ दरपत्रक, कुटीच्या आत प्रदर्शित करण्याची मुभा असेल. कोणत्याही परिस्थितीत कुटीच्या बाहेर किंवा कुटीच्या छतावर कोणतेही दर पत्रक फलक/ जाहिरात फलक लावण्याची मुभा असणार नाही. याचे उल्लंघन केल्यास असा फलक सरकार जमा करण्यात येईल आणि सुरक्षा अनामत जप्त करण्यात येईल.

·       कोणत्याही कुटीवर कोणत्याही उत्पादनांच्या जाहिराती करण्याची परवानगी असणार नाही आणि याचे उल्लंघन झाल्यास सुरक्षा अनामत जप्त होईल आणि परवाना रद्द करण्यात येईल.

·       चौपाटी कुटी समोर केवळ 10 आराम खुर्च्या ठेवण्याची आणि 5 मोठ्या छत्र्या उभारण्याची मुभा असेल. आराम खुर्च्या भरती रेषेपासून 10 मीटरच्या क्षेत्राबाहेर काटेकोरपणे ठेवण्यात येतील आणि पर्यावरण मंत्रालय, वन व हवामान बदल मंत्रालयाने भारत सरकारने वेळोवेळी काढलेल्या आधी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. छत्र्या सहित आराम खुर्च्या ठेवण्यासाठी क्षेत्र निश्चित असेल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही कोणत्याही व्यक्तीला कुटी मध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रीयत्व, लिंग, जात, धर्म किंवा अशा इतर कोणत्याही घटकांच्या आधारे कोणताही भेदभाव करणार नाही. अशा प्रकारे भेदभाव केल्याची तक्रार आढळल्यास त्या प्रकरणी विहित पडताळणीनंतर वैध ठरल्यास कुटी वाटप रद्द होण्यास पात्र असेल.

·       विहित जागेची स्थिती/उपलब्धता या आधारे कुटीचे सीमांकन करण्यासंबंधात परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचा अधिकार पर्यटन संचालनालयाकडे राखून ठेवण्यात आला आहे.

·       कोणत्याही विदेशी व्यक्तीकडे कामा बाबतचा आवश्यक व्हिसा असला तरी तिला कोणत्याही कुटीत कामगार ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही.

·       प्रत्येक कुटी वाटप ग्राहिने धूम्रपान करू नका थुंकू नका, तंबाखूला नकार आरोग्याला होकार चौपाटी स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ठेवा असा मजकूर असलेला फलक कुटीच्या आत दिसेल असा अनिवार्यपणे लावावयाचा आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या संबंधित अधिनियम व इतर केंद्रीय अधिनियमांचे पालन करील.

·       चौपाटी कुटी सुरू ठेवण्याची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी असेल. संगीताचा आवाज केवळ कुटीच्या आतच ऐकू येईल आजूबाजूच्या कुटी धारकास त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही, अशा प्रकारे संगीत लावण्यात येईल. केवळ प्रत्येकी 12.5 वॉटस  आर एस क्षमतेच्या दोन ध्वनिक्षेपकास परवानगी असेल. 25 वॉटस आर एम एस पेक्षा अधिक क्षमतेच्या ध्वनिक्षेपक आस मनाई आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकाप्रमाणे शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. उपरोक्त मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचे ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक असलेले कोणतेही संगीत साहित्य सरकार जमा केले जाईल. जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक हे एकत्रितपणे नियम व विनियमानुसार त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे 31 डिसेंबर नाताळ किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम उत्सवानिमित्त मागणी केल्यास नियमित वेळ वाढवून देऊ शकतील.

·       चौपाटी कुटीतील घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक कुटी वाटपग्राही सीसीटीव्ही कॅमेरा असलेली टेहळणी यंत्रणा अनिवार्यपणे बसवून घेईल. अशा प्रकारे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये व्हिडिओ चित्रण केलेल्या चित्रणावर यथार्थ तारीख व वेळ प्रदर्शित झालेली असावी. कुटी वाटप ग्राही संपूर्ण हंगामाचे सीसीटीव्ही फुटेज परीरक्षित करील. सीसीटीव्ही चित्रण कुटीच्या संपूर्ण दैनंदिन कार्य वेळेपर्यंत चालू असले पाहिजे सीसीटीव्हीचे चित्रीकरण होताना पर्यटक आरामखुर्चीत असतानाचा त्याच्य/तिच्या खासगी जीवनाचा भाग चित्रित केला जाणार नाही याची दक्षता वाटप ग्राहीने घेतलेली असावी.

·       कुटीचा वाटप ग्राही वाळूच्या टेकड्या खारफुटी आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूच्या टेकड्या यांनी आच्छादलेल्या वनस्पती नष्ट होणार नाही याची यथोचित काळजी घेईल. आणि त्यांचे संरक्षण व संवर्धन करीन. त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास कसूर करणार्‍या कुटी वाटपग्राहीस चौपाटी विनियमन क्षेत्र अधिसूचना 1991 आणि त्यापुढील अधिसूचना व सुधारणांच्या उल्लंघन यासाठी जबाबदार धरण्यात येईल आणि परवानगी रद्द करून उल्लंघन करणार्‍याविरुद्ध विहित नियमानुसार कारवाई सुरू करण्यात येईल.

·       केंद्रीय पर्यावरण व वन व हवामान बदल मंत्रालय, पर्यावरण विभाग एम सी झेड एम ए यांनी निर्धारित केलेल्या प्रवाळे आणि प्रवाळ असलेले खडक, वाळूच्या टेकड्या, वाळूचे पट्टे, जीवशास्त्रीय दृष्ट्या सक्रिय समतल चिखल, खारेपाट, कासवांची घरटी असणाऱ्या जागा, खेकडे आवा जागा, समुद्री गवती पट्टे, पक्ष्यांची घरटी असणाऱ्या जागा आणि अशा कोणतीही परिस्थितीकियदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या ठिकाणी कुटी उभारण्याची परवानगी असणार नाही. कुटी वाटपग्राहि घरट्यांच्याबाबतीत निदर्शनास आलेली कोणतीही बाब संबंधित कर्मचाऱ्यांना कळविणे आणि कासवांची घरटी असणाऱ्या जागांचे कासवांची अंडी उबवणी क्षेत्र इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक कर्मचाऱ्यांना सक्रियपणे सहकार्य करील

·       शासनाला बेकायदेशीर कुट्या काढून टाकण्यासाठी तसेच उर्वरित हंगामाकरिता परवाना रद्द करून दंड लादण्याची शिफारस करण्यासाठी अधिकाऱ्यांचे/कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार असणारे स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष/भरारी पथक स्थापन करता येईल आणि या भरारी पथकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी (विस्तार अधिकारी/ ग्रामविकास अधिकारी/नगरपालिका मुख्य अधिकारी यांचा प्राधिकृत अधिकारी) स्थानिक पोलिस अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक/जमादार) यांचा समावेश असेल आणि तालुक्याचा नायब तहसीलदार (सामान्य) या पथकाचा प्रमुख असेल.

·       यशस्वी कुटी वाटपग्राही व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक यांची दोन नावे आणि आधार कार्ड सह कुटी मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांची नावे अनिवार्यपणे सादर करील. वाटप ग्राही निर्देशित व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक यांच्याखेरीज अन्य व्यक्ती कुटी चालवीत/व्यवस्थापन करीत असल्याचे आढळून आल्यास; सदर कुटीस देण्यात आलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल, आणि कुटीच्या वाटपग्राहीस पुढील 3 वर्षाच्या कालावधीकरिता, कुटीच्या वाटपासाठी अर्ज करण्यास मनाई करण्यात येईल.

·       चौपाटी कुटी ग्राही समुद्रकिनारा कचरा मुक्त ठेवण्यासाठी सर्वाधिक काळजी घेईल आणि ती जबाबदारी सर्वस्वी त्याचीच राहील. चौपाटीवरील एक निर्देशित कुटी आयुर्वेद पंचकर्म व निसर्ग उपचार केंद्रासाठी राखीव असेल. पर्यटन संचालनालयाच्या निर्देशानुसार अशा कुटीचे देखील पारदर्शक संगणक सोडततीने वाटप करण्यात येईल.

·       चौपाटी कुटी वाटपग्राही भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जारी केलेल्या सुरक्षित व जबाबदार पर्यटनाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासंबंधीची हमी सादर करील. चौपाटी कुटी वाटपग्राही समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांचे पाण्यात डुंबणे या व्यतिरिक्त इतर जल साहसी क्रीडा व्यवसायात सहभागी असणार नाही.

·       वाटपग्राहिने प्रचलित अधिनियम नियम व विनियम यानुसार आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घ्याव्यात. वाटपग्राहीस सर्व परवानग्या विहित मुदतीत मिळाव्यात यासाठी पर्यटन संचालनालयाकडून एक खिडकी पद्धत single  window  systemराबविण्यात येईल.

 

) समुद्रकिनाऱ्यावरील शासकीय जमिनीवर सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्र

   उभारणीसाठी परवानगी देण्याकरिता अटी व शर्ती

·       पर्यटन संचालनालय सार्वजनिक सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी विशेष निश्चित क्षेत्रे राखून ठेवील. सार्वजनिक सुविधा केंद्राचे स्थान हे प्राधान्याने समुद्रकिनाऱ्याच्या पोच मार्गालगत च्या प्रवेशद्वारा जवळ असेल.

·       प्रत्येक सार्वजनिक सुविधा केंद्रांमध्ये किमान पुढील सुविधांचा समावेश असेल

1.   4 प्रसाधनगृहे ( 2 पुरुषांसाठी व 2 महिलांसाठी)

2.   6 पाणी तुषारसंच ( 3 पुरुषांसाठी व 3 महिलांसाठी)

3.   कपडे बदलण्यासाठी 6 खोल्या (3 पुरुषांसाठी व 3 महिलांसाठी)

4.   लॉकरची सुविधा (किमान 50 कुलूपबंद पेट्या)

5.   पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र मुतारी व्यवस्था (प्रत्येकी 5)

·       पर्यटन संचालनालयाला सार्वजनिक चौपाटी सुविधा केंद्राचे प्रमाण संकल्प चित्र तयार करण्याचा व ते बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा तपशील ठरविण्याचा हक्क असेल. पर्यटन संचालनालय तज्ञांचा सल्ला घेऊन संकल्प चित्र व साहित्य अंतिम करील.

·       सार्वजनिक सुविधा केंद्राचे वाटप पर्यटन संचालनालयाकडून पारदर्शक संगणक लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. त्याचा कालावधी 3 वर्षे इतका असेल. अशी सुविधा केंद्रे चालविण्याचा अनुभव असणाऱ्या अशासकीय संघटना/व्यावसायिक संस्थांकडून सुविधा केंद्रे चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येतील.

·       अर्जाचा विहित नमुना आणि शपथपत्र पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

·       सुविधा केंद्र वाटपग्राहीनी, ग्रामपंचायत/नगरपालिका यांच्या साह्याने सांडपाणी व मलनिस्सारणाचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि कोणतेही मलजल किंवा सांडपाणी चौपाटीवर किंवा समुद्रात सोडण्यात येऊ नये.

·       संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका यांना सार्वजनिक सुविधा केंद्रांकडून सांडपाणी व मलजल यांचा निचरा करण्यासाठी वाजवी शुल्क आकारण्याचा अधिकार असेल.

·       अर्जदारास आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करतेवेळी रुपये 5000 इतके अर्जाचे शुल्क (नापरतावा) योग्य भरावे लागेल. अर्जदारास रुपये 10000  इतकी रक्कम (परतावा योग्य) सुरक्षा अनामत ठेव म्हणून भरावी लागेल. तथापि विहित नियम निकषांचे उल्लंघन केल्यास सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. वाटपग्राहीस वार्षिक परवाना शुल्क म्हणून रुपये 15000 एवढी रक्कम दरवर्षी हंगाम सुरू होण्यापूर्वी पर्यटन संचालनालयाकडे जमा करावी लागेल.

·       वाटप ग्राहीस सार्वजनिक सुविधा केंद्रात (सीबीएफसी) विविध सोयी सुविधांचा वापर करणाऱ्यांकडून पर्यटन संचालनालयाने वेळोवेळी निश्चित केलेले आणि सुधारित केलेल्या अटीनुसार काही कमाल मर्यादेच्या अधीन राहून शुल्क आकारता येईल.

·       सार्वजनिक सुविधा केंद्रात पर्यटकांच्या सुरक्षेकरिता माफक दरात जीवरक्षक जाकीट, जीवरक्षक पट्टा, दोरखंड यांसारखे आवश्यक जीवरक्षक साधन सामुग्रीची तरतूद असेल.

·       एका संबंधित चालकास सार्वजनिक सुविधा केंद्र आणि चौपाटी कुटी वाटप करण्यात येणार नाही. कोणत्याही बाबतीत वाटपग्राहिकडून/वाटपग्राहिच्या कुटुंबातील सदस्यांकडून असा अर्ज प्राप्त झाल्यास तो रद्द होईल आणि शुल्क जप्त होईल.

·       निवड झालेला वाटपग्राही, पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारे सुरक्षित व जबाबदार पर्यटनासाठी काढलेल्या आचारसंहितेची वचनबद्ध असल्याबाबतचे एक हमी पत्र सादर करील.

·       वाटपग्राहिने समुद्रकिनाऱ्याजवळील कोणत्याही साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊ नये.

·       प्रचलित अधिनियम, नियम आणि वीनियमानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व त्या परवानग्या वाटपग्राही ने संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून मिळवाव्यात. वाटपग्राहीस सर्व परवानग्या विहित मुदतीत मिळाव्यात यासाठी पर्यटन संचालनालयाकडून एक खिडकी पद्धत राबविण्यात येईल.

] खासगी मालमत्ता मध्ये तात्पुरत्या चौपाटी कुट्या आणि तात्पुरत्या राहुटया  उभारण्यासाठीच्या अटी व शर्ती

खाजगी मालमत्तेवर कुट्या/तंबू/ राहुटी उभारण्यासाठी तात्पुरत्या बांधकामांना लागू असणाऱ्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या विविध परवानग्या/ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहेत या अटींच्या आधिन राहून पुढील अटी व शर्तीनुसार परवाना देण्यात येईल.

·       सर्व कुट्या/राहुटया या केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आधी सूचनांवर असाव्यात.

·       अर्जदाराने यथोचित रित्या भरलेल्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत

1.   निर्वेध मालकीहक्कासह मालमत्तेच्या मालकीचे दस्तऐवज. नगरपालिका व ग्रामपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जोडपत्र- नुसार विहित नमुन्यातील वैध परवानगी.

2.   जागेचा नकाशा

3.   पारपत्र आकारातील अलीकडील तीन रंगीत छायाचित्रे दोन प्रतींवर मागील बाजूस नाव लिहिलेले आणि एक अर्जासोबत.

4.   अर्जाचे शुल्क, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमधून मुंबईत देय असलेल्या पर्यटन संचालनालयाच्या नावे काढलेल्या धनाकर्ष स्वरूपातील रुपये 3000 एवढी नापरतावा रक्कम असेल.

5.   फी आणि सुरक्षा अनामत पुढीलप्रमाणे असेल

कुटी  उभारण्याचे क्षेत्र

खाजगी क्षेत्रातील कुटीसाठी फी व सुरक्षा अनामत

राहुटयांसाठी फी

वातानुकूलित राहुटया/तंबू

बिगर वातानुकूलित राहुटया/तंबू

सर्व खाजगी मालमत्ता

रु. 15000 प्रती चौपाटी कुटी

(प्रत्येक पर्यटन हंगामासाठी)

प्रत्येक कुटी करता रु 20000 एवढी रक्कम सुरक्षा अनामत असेल

प्रत्येक राहुटीस प्रत्येक हंगामा नुसार रु 1500 तसेच प्रती राहुटी मागे रु 1500 एवढी रक्कम सुरक्षा अनामत असेल.

प्रत्येक राहुटीस प्रत्येक हंगामा नुसार रु 750  तसेच प्रती राहुटी मागे रु 750 एवढी रक्कम सुरक्षा अनामत असेल.

 

6.   कुटी/राहुटी ची फी ना-परतावा असून तिचा भरणा धनाकर्षाद्वारे करावा.

7.   वर नमूद केलेली परतावा योग्य सुरक्षा अनामत अर्जाच्या नमुन्यासोबत पर्यटन संचालनालया मध्ये धनाकर्ष द्वारे भरण्यात येईल या धोरणाच्या कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्यास सुरक्षा अनामत जप्त करण्यात येईल.

·       निवड केलेला वाटपग्राही पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांच्या द्वारे निर्गमित केलेल्या सुरक्षित व जबाबदार पर्यटन धोरणाच्या आचारसंहितेची वचनबद्ध असल्याबाबतचे हमी पत्र सादर करील.

·       वाटपग्राहिने समुद्रकिनाऱ्यावरील कोणत्याही साहसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊ नये.

·       वाटपग्राहिने संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून प्रचलित अधिनियम नियम सर्वसाधारण बाबी आणि त्यांच्याशी संबंधित उपक्रमासाठी योग्य जागा राखून ठेवावी. पर्यटन संचालनालयास मासेमारी करावयाच्या परिसरात तत्संबंधित प्राधिकरणाकडून यथोचित ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच केवळ त्या क्षेत्रातील उपक्रमांना परवानगी देता येईल. प्रत्यक्ष मासेमारी केली जाते अशा समुद्रकिनाऱ्यावरील जागांच्या ठिकाणी हे धोरण राबवले जाणार नाही याची दक्षता पर्यटन संचालनालय घेईल.

अडचणी दूर करणे:

तात्पुरत्या हंगामी संचनांच्या उभारणीबाबत धोरणाच्या अंमलबजावणी संबंधात कोणतीही अडचण उद्भवल्यास पर्यटन विभागाचा निर्णय अंतिम असेल. वाटपग्राही कडून वरील कोणत्याही अटींचे पालन करण्यात कसूर झाल्यास आणि त्याने चुकीची माहिती सादर केल्यास परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल आणि त्याच्या स्वतःच्या जोमीवर व स्वखर्चाने कुट्टी पाडून टाकण्यात येईल. कुट्टी वाटपग्राहीवर 3 वर्षे एवढा कालावधी साठी बंदी घालण्यात येईल. आणि त्यांनी फी/अनामत रक्कम म्हणून जमा केली पर्यटन संचालनालयाकडून जप्त करण्यात येईल. या धोरणात संबंधित शासकीय विभाग, अभिकरणे आणि कोणत्याही अन्य संबंधित व्यक्ती यांनी केलेल्या योग्य शिफारशीवरून या धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाकडे राहतील. वाटपग्राही सुधारित मंजुरी दिलेल्या अटी व शर्ती अनुसरील.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक वित्त विभाग/ साधन संपत्ती 12 6 2020 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 2020 0817 1514 190523  असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment