पर्यटन-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासातील महत्वाचा घटक
प्रस्तावना
भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक भागाची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये असतात, काही भागात निसर्गाचे दान जास्त पडलेलं असतं तर काही भागात त्याची वानवा असते. त्या त्या ठिकाणची सामाजिक व्यवस्था ही तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर उभारली गेलेली असते. मग त्याच भौगोलिक परिस्थितीवर तिथलं अर्थकारण,तिथलं समाजकारण, तिथली सांस्कृतिक जडणघडण, शैक्षणिक व्यवस्था, रोजगाराचे माध्यम या सर्व गोष्टी आपसूक उभ्या राहतात. आपल्या महाराष्ट्रात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र असे विविध भाग आपल्याला बघायला मिळतात. या भूभागात वर्गीकरण करताना आपण मुख्यत्वे भौगोलिक परिस्थितीचा विचार करत असतो. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा मराठवाड्याचा विचार करतो, मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, भविष्यातील वाटचालीसाठी काही धोरण ठरवण्याची तयारी करतो, त्यावेळेस आपल्याला मराठवाड्याचा विविधांगाने अभ्यास करून उपलब्ध परिस्थितीतून, वर्तमानात असणाऱ्या अडचणींवर मात करत; भविष्यात कशा प्रकारे रोजगारनिर्मिती तयार करून, रोजगार निर्मितीची माध्यमे निर्माण करून इथलं अर्थकारण व समाजकारण कसं शाश्वत करता येईल याचा अभ्यास केला गेला पाहिजे.
मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे येतात, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड. या प्रत्येक जिल्ह्याचं स्वतःचं वेगळं असं ऐतिहासिक स्थान आहे, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व आहे आणि अर्थकारणात एक वेगळी जागा आहे. वरकरणी बघता मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही शेती आधारित आहे, येथील शेती ही कोरडवाहू असल्या कारणाने त्याच्या अडचणी खूप आहेत. सततची नापिकी, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये एक नैराश्याची भावना येणे सहाजिक आहे. तरीसुद्धा इथले शेतकरी, इथला तरुण, इथल्या महिला आपलं मनोबल उंचावत निसर्गाशी चार हात करत याठिकाणी ठामपणे उभे आहेत याचं खरंच मनापासून कौतुक आहे. मराठवाड्याच्या विकासाची परिभाषा ठरवताना ती जितकी शाश्वत असेल तितकीच ती मूल्यवर्धित असणारी असावी म्हणजे एखाद्या समस्येवर उपचार करताना ती वरवरचा असून उपयोग नाही तर त्याच्या खोलवर जाऊन त्याच्या मुळावर उपचार केले तर काळासोबत त्याच्यातून बाहेर पडणं सहज शक्य होईल.
मराठवाड्यात, शेती, उद्योग, शिक्षण व पर्यटन हे अर्थकारणाचे मुख्य स्रोत आहेत, मराठवाड्यात जे काही रोजगार आजमितीला उपलब्ध आहेत ती वरती नमूद केलेल्या चार घटकामधूनच मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. यात भर म्हणजे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक अशासकीय संस्था त्यांचे स्वयंसेवक मराठवाडाभर चालणारी जलसंधारणाची, सामाजिक माध्यमातली काम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. ज्यांना यात काम करणे शक्य नाही ते शेतीकामासाठी स्थलांतरित होत आहेत. शेती, शिक्षण, उद्योग या क्षेत्राविषयी आपण सगळे जाणकार आहात, यांच्यातल्या खाचाखोचा, त्याच्यातली आव्हानं, समस्या आणि भविष्यातील संधी याविषयी आपणा सर्वांना ज्ञात आहे. या पार्श्वभूमीवर मी माझ्या गेल्या १० वर्षांच्या पर्यटनाच्या कामातील अनुभवाच्या अनुषंगाने, मराठवाड्यातील पर्यटनाची वाटचाल, पर्यटनातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, त्या रोजगारातून चालणारे अर्थकारण, पर्यटनाचा होणारा शेतीला फायदा, पर्यटनाचा स्थानिक तरुण, महिला बचत गट यांना होणारा फायदा आणि शेतमाल व प्रक्रिया मालाची चालती फिरती बाजारपेठ याची कशाप्रकारे सांगड घालता येऊ शकते याविषयी मी नक्कीच काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो.
माझ्या विषयी थोडक्यात
माझं नाव मनोज भिमाजी हाडवळे मुक्काम पोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझं शिक्षण एमएससी अग्री. बीएससी माझं बदनापूर कॉलेजला झालं एम एस सी परभणी विद्यापीठात झालं शेतकरी आत्महत्या प्रश्नावर काम करण्यासाठी मी वर्ध्याला आधी खाजगी संस्थेत आणि नंतर बँकेत एकूण पाच वर्ष काम केलं आणि 2011 पासून कृषी आधारित पर्यटन ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राबवत आहे. जुन्नरची अर्थव्यवस्थाही शेती आधारित अर्थव्यवस्था आणि शेती आधारित अर्थव्यवस्थेला पूरक असं पर्यटनाच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती होतेय का यासाठी आम्ही एक लोकचळवळ उभारली आणि जुन्नर पर्यटन मॉडेल त्याच्यातून उभ राहिलं. या लोकं चळवळीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याने २१ मार्च 2018 साली जुन्नरला शासनाने विशेष पर्यटनाचा दर्जा दिला.
जुन्नरमध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांना देश-विदेशातील पर्यटक भेट देत असताना इथली स्थानिक कृषिसंस्कृती, स्थानिक वारसा स्थळे, मंदिरे, दर्गे यांना भेटी देतातच पण त्यासोबत इथल्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या स्थानिक शेतमाल त्या शेतमालावर केलेले प्रक्रिया इत्यादी पदार्थ सुद्धा ते विकत घेऊन जात असतात. याचाच एक भाग म्हणून पर्यटन विभागाच्या सहकार्याने जुन्नर तालुका स्तरावर आम्ही द्राक्ष महोत्सव आंबा महोत्सव यासारखे उपक्रम पण राबवले आहेत.
या अनुभवावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्थेने मला आंबेजोगाई चा पर्यटन आराखडा तयार करण्यासाठी निमंत्रित केले होते आणि आपण आंबेजोगाई पर्यटनातील संधी ओळखून एक आराखडा पण त्यांना सादर केलेला आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक मंडळींना जागरूक बनवण्यात यश आले. मग स्थानिक मंडळींनी पुढाकार घेऊन अंबेजोगाईची पर्यटन पुस्तिका तयार केली, तिचे प्रकाशन १६ फेब्रुवारी २०२१ रोजी, पर्यटन मंत्री ना आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले.
माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एकूण सहा वर्षाचा काळ मराठवाड्यात राहिला आहे. या सहा वर्षाच्या काळात माझी वैचारिक, तात्विक जडण-घडण झाली आहे. मला शेती व शेतकरी खऱ्या अर्थाने कळण्यास मदत झाली, त्यांच्या समस्या कळण्यास मदत झाली. मी या सर्व गोष्टींना एका पर्यटनाच्या नजरेतून पाहतो. कृषी ग्रामीण व संस्कृती पर्यटन या थीम वर काम करत आपण एका तालुक्याचं पर्यटन मॉडेल तयार केलं. या कामाचा अनुभव सांगण्यासाठी आपल्याला विविध व्यासपीठांवरून बोलवण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी कृषी व ग्रामीण पर्यटनाचा प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.
१० वर्षांच्या कामाचा अनुभवातून आपण कृषी पर्यटन एक शेतीपूरक व्यवसाय हे पुस्तक लिहिलं, जे २०१८ मध्ये सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलं. ज्याचा उपयोग करून अनेक शेतकरी आपल्या शेतात कृषी पर्यटन केंद्र उभारत आहेत आणि छान प्रकारे चालवत आहेत. जसं एक जुन्नर पर्यटन मॉडेल उभे राहिलं आहे त्यामाध्यमातून इथला शेतकरी उभा राहिला आहे, शेती पूरक व्यवसाय म्हणून पर्यटनाकडे बघत आहे, एक चालती फिरती बाजारपेठ पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या गावात आपल्या परिसरात येत आहे. आमचं स्वप्न आहे जुन्नर पर्यटन मॉडेल राज्यातल्या अनेक ठिकाणी अवलंबलं जावो, स्थानिक शेतकऱ्यांनी, स्थानिक तरुणांनी पुढाकार घ्यावा आणि पर्यटकांना फक्त पर्यटक न समजता आपल्या ताज्या/प्याकिंग केलेल्या व प्रक्रिया केलेल्या शेतमालाचा ग्राहक समजावे असं मला वाटतं.
मराठवाड्यातील रोजगाराच्या संधी व पर्यटन
मराठवाड्याच्या शेती ,उद्योग व शिक्षण आधारित अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा खूप मोलाचा घटक आहे की ज्यातून फक्त थेट रोजगारनिर्मिती होणार नाही तर त्या अनुषंगाने शेतीसाठी, शेतीच्या, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी,शेतमालाच्या निर्यातीसाठी खूप मदत होऊ शकणार आहे. मराठवाड्यामध्ये, औरंगाबादला जागतिक वारसा स्थळांचा लेणीसमूह आहे, धार्मिक पर्यटनाच्या नजरेतून, सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, अंबेजोगाईची योगेश्वरी, पैठण इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्याचसोबत तेर जे जुन्नर सारखेच सातवाहन कालीन व्यापारी केंद्र आहे ज्याला २००० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तगर लक्ष्मी कि ज्याला इंडियन dol म्हणतात अशी युनिक गोष्ट तेर मध्ये आहे, त्रिविक्रमाचे मंदिर आहे. उस्मानाबाद, तुळजापूर व तेर या भागात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, वारसा पर्यटन, कृषी व ग्रामीण पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत.
मी आंबेजोगाईचा पर्यटन आराखडा बनवत असताना, तिथले कोरीव मंदिर, लेणीसमूह, दासोपंतांची पासोडी, मुकुंदराज यांची विवेकसिंधु इत्यादी गोष्टी फार जवळून बघितल्या. फक्त एकटे आंबेजोगाईत एवढ्या गोष्टी असतील तर संपूर्ण मराठवाड्यात किती आणि काय काय बघण्यासाठी असेल? पर्यटन विभागाला प्रत्येक दुर्गम ठिकाणांच्या पर्यटन स्थळापर्यंत पायाभूत सुविधा उभारणे शक्य नाही. जर या पायाभूत सुविधा स्थानिक, पर्यटन विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून, स्थानिक गावकऱ्यांनी उभारल्या, युवकांनी गाईडचं काम केलं, महिला बचतगटांनी स्थानिक खाद्यसंस्कृतीची बाजू सांभाळली तसेच स्थानिक चवीचे विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आणि या सर्वाचं आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सादरीकरण करत मार्केटिंग केलं तर मला वाटतं की मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात, राज्यातले, देशातले आणि परदेशातील पर्यटक नक्कीच पोहोचतील. आणि या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे माध्यम उपलब्ध होईल.
या येणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांना आपण,आपल्या जवळचा शेतमाल विक्रीसाठीची संधी निर्माण करू शकतो. यातुन अनेक प्रकारे चालती फिरती बाजारपेठ आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला उभी राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फक्त अर्थकारणात हलत नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाण-घेवाण होते, वैचारिक दृष्टिकोन विकसित होतो, समाजकारण वाढीस लागतं. जगाच्या कानाकोपऱ्यात नेमके चाललय काय हे कळायला मदत होते. महिलांचं सबलीकरण होतं, त्यांच्यात आत्मविश्वास दुणावतो, तरुणांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भर पडते आणि आपल्या मनातील मागासलेपणाचा न्यूनगंड निघून जाण्यास मोलाची मदत होते, हे मी माझ्या १० वर्षाच्या अनुभवातून निश्चितपणे सांगू इच्छितो.
ज्यावेळेस आपण मराठवाड्याचा विकास व्हावा किंवा मराठवाड्याचा विकास करायचा आहे या उद्देशाने एकत्र येतो, त्यावेळेस आपण विकासाची व्याख्या अतिशय व्यापक प्रमाणात करायला हवी. इथल्या अर्थकारणाचे स्रोत, आपण वेगवेगळ्या अंगाने शोधायला हवेत आणि शक्य त्या गोष्टीचा वापर करून समस्यांचे, अडचणींचे, संधीत रूपांतरण करायला हवे. जेव्हा काहीतरी कमी असतं तेव्हा ती एकप्रकारे संधी असते. हे सर्व, दहा-पंधरा वर्षांपूर्वी अशक्य होतं, पण आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये, आपल्या समस्या, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येतात, आपले उद्योग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवता येतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, हेही मला माझ्या अनुभवातून सांगावसं वाटतं. पर्यटनातून ग्रामविकास, पर्यटनातून रोजगाराच्या संधी, कृषी व ग्रामीण पर्यटनातून शेतीचा शाश्वत विकास, संस्कृती व वारसास्थळाचे संवर्धन या माझ्या कामाच्या, आवडीच्या व अनुभवाच्या गोष्टी आहेत. यासाठी राज्यात, देशात मी सल्लागार म्हणून गेली पाच वर्षे काम करत आहे. माझ्या आयुष्यातील सहा वर्ष, मराठवाड्यात राहिल्यामुळे, मराठवाड्याशी माझी नाळ जोडली गेलेली आहे आणि मला मनापासून वाटतं की मराठवाड्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माझा खारीचा वाटा असावा. म्हणून मराठवाड्याच्या पर्यटन विकासासाठी, पर्यटनातून शाश्वत समाजाच्या विकासासाठी, मला नक्कीच काही जबाबदारी स्वीकारायला आवडेल. तरी पर्यटनातील संधींचा मराठवाड्याच्या सर्वांनी विकासामध्ये सकारात्मकतेने विचार व्हावा ही मनापासूनची इच्छा.
कळावे
आपलाच
मनोज हाडवळे
पर्यटन प्रशिक्षक व पर्यटन सल्लागार
9970515438/७०३८८९०५००
No comments:
Post a Comment