Thursday, 4 July 2024

Clarkson's Farm- Amazon prime वर प्रसिद्ध असलेली शेतीची वेबसिरीज

Clarkson's Farm- Amazon prime वर प्रसिद्ध असलेली शेतीची वेबसिरीज

त्याच्या शेतावर वहितीची मजुरी करणारा तरुण शेतकरी आज ब्रिटनमधील मोठा सेलिब्रेटी बनलाय. त्याची ३-४ पुस्तके आज बेस्ट सेलर आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी शोनक यांनी त्याला तरुणांनी शेतीकडे कसे वळावे याविषयी चर्चा करायला आमंत्रित केले होते. एवढंच नाही तर त्याच्या शेतावर बांध बंधीस्ती करणारा मजूर कर्करोग ग्रस्त झाल्यावर पूर्ण देशाने त्याच्या तब्येतीची चौकशी करून, तो बरा होण्यासाठी प्रार्थना केली. तिथल्या शेतीला सबसिडी मिळायला फार्म ऑडीट होतं, त्या ऑडीट मध्ये त्या शेतकऱ्याने शेती करताना, लागणारी औजारे, औषधे, खते, अडगळ यांना व्यवस्थित ठेवलंय का याची तपासणी केली जाते. इथल्या शेतीवर स्थानिक प्रशासनाचे लक्ष असते. शेतातील उभी असणारी विविध शेड्स हि ज्या कामासाठी उभारली आहेत त्याच कामासाठी वापरली जावी यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला जातो. जर का वेगळ्या कामासाठी उपयोग केला तर स्थानिक प्रशासन त्यावर कारवाई करू ते बंद करू शकते. शेतमालाची प्रतवारी ठरवायला अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. जशी आपल्याकडच्या उन्हाळी बाजरीला महत्व आहे, तसेच महत्व तिथल्या उन्हाळी गव्हाला आहे. पास्ता बनवायला लागणाऱ्या गव्हाला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो. पशुखाद्य, ब्रेड, पास्ता अशा तीनही गोष्टींसाठी गव्हाचा दर्जा फिक्स असतो. या आणि अशा अनेक गमतीशीर, माहितीपूर्ण आणि मनोरंजक गोष्टी आपल्याला कळतात ते क्लर्क्सन फार्म हि वेबसिरीज पाहताना.


क्लार्क्सन फार्म या वेबसिरीज आतापर्यंत ३ सीजन आले. Amazon prime असणाऱ्या या वेबसिरीज चे IMDb रेटिंग हे ९/१० आहे. जगभर लोकप्रिय झालेल्या या वेबसिरीजचा बाज हा डोक्युमेंट्रीचा आहे. कुठलीही स्क्रिप्ट नाही कोणी कलाकार नाही, खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांनी, वर्षभर शेतावर चालणाऱ्या गोष्टींना शूट करून रिलीज केले. पण हे तेवढेही सोपे नव्हते. कारण हा शेतकरी साधासुधा माणुस नव्हता. इंग्लंड मधील जेरेमी क्लर्क्सन हा साठीतील सेलिब्रेटी जो बीबीसीचा पत्रकार, ब्रिटनच्या टीव्ही प्रोग्रामचा प्रसिद्ध निवेदक, कार रेसिंगचा ड्रायव्हर, मुलाखतकार, आणि विविध रियालिटी शोजचा सेलिब्रेटी. त्याने ब्रिटनच्या उत्तरेकडील ग्रामीण भागात १००० एकर शेती घेऊन त्यावर शेती करायला सुरवात केली. त्याला शेतीची काहीच माहिती नव्हती. स्थानिक मंडळींच्या मदतीने त्याने शेतीला सुरवात केली. ज्या वर्षी सुरवात केली त्याच वर्षी कोरोना आला.


शेतीची सुरवात tractor घेण्यापासून झाली, पुढं जावून गरजेची औजारे घेतली. शेतीचे नियम, कायदेकानून समजून घेतले. स्थानिक मजूर, शेती प्रशासन, शहर प्रशासन यांच्याशी जुळवून घेतलं. त्यांच्याकडून शिकू लागला. एक वर्ष, १००० एकर शेतीत काम केल्यावर त्याची शिल्लक होती फ़क़्त १५० डॉलर. आणि तरीही मी शेती करत राहणार असा चंग बांधून तो काम करू लागला. २०२१ पासून सुरु केलेली शेती तो आजही करत आहे. पण मुळचा टीव्ही क्षेत्राशी कार्यरत असल्याने त्याला एक भन्नाट आयडिया आली. त्याच्यासाठी हे शेती करणं म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होतं. त्याचे डॉक्युमेंटेशन करावे असे त्याला वाटले. क्लर्क्सनने शुटींगच्या टीमला बोलावले आणि जे काही सुरु आहे त्याचे शुटींग घ्यायला सांगितले. शेतीत घडणाऱ्या गमतीजमती, मजा, फजिती, काही आनंदाचे तर काही भावनिक क्षण असं सगळंच शूट झालं. मग त्यात स्वतः क्लर्क्सन निवेदक बनला, त्याची आयरिश मैत्रीण कि जी अभिनेत्री आणि पटकथा लेखक आहे, ती त्याला शेतात मदत करायला आली. स्थानिक tractor ड्रायव्हर कलीब कुपर कि जो त्याला शेतकामाला मदत करायचा तो, त्याचा जिगरी बनला. बांध बंधीस्ती करण्यात माहीर असेलला, गेराल्ड त्यांच्या गटात सामील झाला, स्थानिक land एजंट कि जो त्याचा सल्लागार पण होता असा चार्ली त्यांच्याशी जोडला गेला.

      


२०२१ मध्ये क्लर्क्सन फार्म या वेबसिरीज चा पाहिला सीजन रिलीज झाला आणि लोकांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतला. क्लर्क्सन, त्याची शेती आणि त्याचे मदतनीस सगळे रातोरात सेलिब्रेटी बनले. क्लर्क्सन आणि लिसा आधीपासूनच सेलिब्रेटी होते. खरा बदल झाला तो कलीब, गेराल्ड आणि चार्ली च्या आयुष्यात. त्यातल्या त्यात कलीबच्या. कारण कलीबचा कामाच्या निमित्ताने जास्त संपर्क यायचा, त्यामुळे वेबसिरीज मध्ये तो दिसलाही जास्त आणि त्याहीपेक्षा त्यांची तू तू मै मै बघायला मजा येते. क्लर्क्सनचा ह्युमर अफलातून आहेच पण कलीब सुद्धा त्याला पुरून उरतो. त्या दोघांमधील बंध बघायला छान वाटतात. कलीब ने तर ३-४ पुस्तकं लिहिली कि जी बेस्ट सेलर झाली. क्लर्क्सन ने सुद्धा त्याचा शेतीचा अनुभव शब्दबद्ध केलाय.

      


त्यांनतर आलेल्या २ सीजन मध्ये अजून मजा वाढत गेलीय. मी या वेबसिरीज चे तीनही सीजन पाहिले आहेत. त्यातील सर्वच गोष्टी इथं सांगून तुमची उत्सुकता कमी करणार नाही. एकदा तुम्ही बघायला सुरवात केली तर अपोआप त्यांच्या सोबत आपण प्रवास करू लागतो. आपले मनोरंजन जरी होत असले तरी या निमित्ताने युरोपातील शेतीचे चित्र बघायला मिळते. शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. शेतीचे सौंदर्य, स्थानिक जागरूकता आणि शेतीच्या वैश्विक आव्हानांची प्रचीती सारखी येत राहते.

Clarkson’s Farm Season-1 link - https://www.primevideo.com/detail/Clarksons-Farm/0SHGKA0J8D4G01ZGD647627NEJ

Clarkson’s Farm Season-2 link - https://www.primevideo.com/detail/Clarksons-Farm/0HXBV30J672YHO5G6L7TPEO44R

Clarkson’s Farm Season-3 link - https://www.primevideo.com/detail/Clarksons-Farm/0HO8ENK0AIDHSLMA7DJV43S6YS

 

मनोज हाडवळे

पराशर कृषी व संस्कृती पर्यटन     


Tuesday, 18 June 2024

पाऊस, माती, गवत आणि जीव

 

पाऊस, माती, गवत आणि जीव

ओलावा, पाण्याचा असो कि मायेचा, त्याच्याशिवाय जगण्याला चाल मिळत नाही. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधात असणाऱ्या देशात हा ओलावा पावसाळ्यात पावसाने येतो तर हिवाळ्यात दवाने. आपल्याकडे पाऊस येतो त्याला मान्सून म्हणतात. भारतात हा मान्सून पोहोचायला जून जरी उजाडत असला तरी, वाऱ्याने हे काम खूप आधीपासून सुरु केलेलं असतं. एरवीचे ढगांचे पांढरे शुभ्र रांजण, पाण्याच्या वजनाने काळे पडतात, आणि या वजनदार रांजणांच्या उतरंडी लांबवरचा प्रवास करून भारतात पोहोचतात. या उतरंडीतून, एक एक रांजण रिता होत, उतरंड उत्तरेकडे सरकत जात घागरी बनतात. हिमालयाच्या पायावर अभिषेक करून; पुन्हा वाऱ्यासोबत उरलंसुरलं पाणी घेऊन या घागरी परतीला निघतात त्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो.

मान्सूनच्या आगमनाच्या वेळी यत्र तत्र सर्वत्र पंचमहाभूतांचे तांडव बघायला मिळते. कवेत घेता येणार नाहीत आणि आकारही मोजता येणार नाही अशा अजस्र आकाराचे २ ढग जेव्हा एकमेकाला धडकतात तेव्हा उठणारा विजेचा लोळ, जमिनीपर्यंत येतो तेव्हा कानठळ्या बसवणारा आवाज येतो. आकाशाच्या पोकळीत; वाऱ्याच्या मदतीने झाडांच्या फाद्यांच्या  पताका उडवत, मोकळ्या मातीचा गुलाल उधळत, ढगांचे ढोल बडवत, विजांची आताषबाजी करत टपोऱ्या थेंबांचा तांडव नाच...हि पंचमहाभूतांची निसर्गाने काढलेली मिरवणूक, आपल्याला आपला आवाका आणि कुवत जाणवून देण्यासाठी पुरेशी असते.     


हा मान्सून बरसायच्या आधी, पूर्वमोसमी वळीव, अंगणात सडा टाकावा असा मनात येईल तिकडे पडत असतो. ऐन वैशाखातील तापलेल्या जमिनीवर पडणारे वळवाच्या पावसाचे थेंब, मातीची तहान भागवतात. मातीने सगळा उन्हाळा स्वतःला तावून सुलाखून काढलेले असते. मातीचा एक सेमी जाडीचा जिवंत थर  बनायला हजारो वर्ष लागतात. आणि पावसाच्या पाण्यासोबत अशीच थरच्या थर माती वाहून जाते. माती म्हणजे काय फ़क़्त उन वारा पावसाने झीज होऊन बनलेली दगडाची भुकटी नसते. या दगडाच्या भुकटीत जेव्हा जीवजंतू मिक्स होतात तेव्हा ती माती बनते. मृत गोष्टी एकत्र येऊन जिवंत होणारी माती बहुदा जगाच्या पाठीवरची एकमेव गोष्ट असावी. माती पांढरी, लाल तसेच काळी असते. माती जिवंत असते, पावसाची ओल मिळताच ती वयात येऊ पहाते. पाऊस पडून गेल्यावर, आलेल्या ओलीने माती लेकुरवाळी होते. डोळ्याला दिसणारे न दिसणारे सगळेच जीव, माती, मोठ्या मायेने सांभाळते. पावसाळ्यातील काळी माती होईल तेवढं पाणी पोटात साठवून घेते आणि उन्हाळ्यात तीच माती सुरकतून आणि भेगाडून जाते. पुढच्या पावसाची वाट बघत निपचित पडून रहाते आणि तिच्याच पोटात झोपी जातात सगळे जीव; कोणी बी बनून तर कोणी कोषात जावून.


पावसाची चाहूल लागताच, तीच्या पोटात जे जे कोणी आश्रयाला येऊन पहुडले आहेत, त्यांना ती जागं करते. उठा..उठा रे उठा आता...तो आलाय, त्याच्या स्वागताला सज्ज व्हा, धूळ झटका, त्याच्यासाठी हिरवा गालीचा घाला. माती सगळ्यांना साद घालत जागं करते. पहिल्या पावसाचा शिडकावा मातीला वास आणतो. वरकरणी तो मातीचा वास वाटत असला तरी, ती डोळ्याला न दिसणाऱ्या एका सुक्ष्मजीवाच्या झोप मोडीच्या आरोळी देताना बाहेर आलेल्या लाळेचा वास असतो. तो बिचारा डोळे चोळत उठत हळूच बघतो तर काय सगळेच उड्या मारत आहेत. जरी ते सूक्ष्मजीव असले तरी त्यांच्याही गोंगाट आणि पहिल्या पावसाचा जल्लोष जोरदार असतो. फ़क़्त त्यांचा आवाज ऐकणं हे आपल्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. पहिल्या पावसात अनेक किड्यांना पंख फुटतात. त्यांची मिलनाची घाई सुरु असते. त्यांना माहित असतं कि आता विसाव्याचे क्षण...एकदा मिलन झालं कि आपला कार्यभाग संपला. रात्री लाईट जवळ जणू काय सगळे जमतात, एकमेकांचे निरोप घेतात, रात्र जागवतात. सकाळी उठून पाहिल्यावर, लाईट जवळ जो पंखांचा खच पडलेला दिसतो, तो त्या किड्यांच्या या जन्मीच्या समारोपाच्या खुणा असतात.


मृगाचा किडाही याच काळात आपल्या मिशा वाढवतो. याच मिशांनी मादीला आकर्षित करून, मिलन करून, मादी लाकडाच्या फटीत अंडी घालते. अंड्यातून आलेली बोटाच्या पेऱ्याएवढी असणारी याची पांढरी अळी, तोंडाला मात्र करवतीचा दात बसवून असते. लाकडाला येणारा कर कर आवाज, याच मृगाच्या किड्याच्या अळी बाईचं कुरतडणं सुरु असतं. हीच पुढे कोशात जावून पाऊस येण्याची वाट बघते. पाऊस आला कि पुन्हा मिशांवर ताव मारत साहेब हजर होतात. मासा पाण्याशिवाय रहात नाही हे खरय पण हेही तितकंचं खरय कि डोंगर माथ्यावर आणि कातळ पठारावर दगडाच्या तळहातावर पाणी जमा व्हावं तशी डबकी तयार होतात आणि त्यात छोटे मासे व पाण्यातील किडे वाढीस लागतात.


गवताचंही तसच आहे. एखाद-दुसरा पाऊस पडला कि, गवताचं, मातीत झोपलेलं बी अंगावर पाणी ओतावं आणि झोपेतून उठवावं अशा अविर्भावात डोळे चोळत, हळूच मातीचं पांघरून बाजूला सारून वर डोकावतं. अवतीभवती बघतं, त्याच्या सारखेच असंख्य अगणित वेगवेगळ्या जातीभातीचे भाऊबंद आपापले रीतीरिवाज सांभाळत, आळस झटकत जमिनीच्या वर आलेले असतात. मग पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत आणि सरत्या काळासोबत, हे गवती भाऊबंध, पाना पानाने वाढीस लागतात. निसर्ग अशा वेळी भेदभाव करत नाही. एकीकडे गवत वाढत असताना, त्याची प्राणी जगतातील इतर मुलंही, पुढची वाटचाल सुरु करतात.


"आपण" सगळेच आधी गवत खायचो. आताही आपण गवतच खातो. गवताची मुळं, खोड, पानं, फुलं, फळं असं सगळंच, आधीपासूनच आपलं अन्न राहिलंय. आपण म्हणजे सर्व प्राणी जगतातील जाती प्रजाती. या गवताची गंमत म्हणजे हे अमर असल्याचे वरदान घेऊन आलंय. कितीही पाऊस पडूद्या किवा भयंकर दुष्काळ असुद्या; गवताचं बी आपला जीव सांभाळून असतं. जीवसृष्टी कळत्या वयात आल्यापासून गवत खात आलीय. आपण याच गवतातून हवं ते गवत निवडत, काही ठराविक गवतावरच आपली गुजराण सुरु ठेवलीय. त्याला आपण तृणधान्य, कडधान्य, तेलबिया असं वर्गीकरण करतो.


पाऊस, माती, गवत, जीव या सगळ्या गोष्टींचं मला लहानपणापासून आकर्षण होतं.त्यामुळेच बारावीला बायोलॉजी घेतलं. शेतात काम करताना मातीतले, बियाण्यातले अंतरंग अनुभवले होते, ते तसे का आहेत? याच उत्तर पुढच्या शेतीच्या शिक्षणात मिळालं. या सर्वाचा, कृषक संस्कृतीशी सलग्न जगण्यावर काय काय परिणाम होतो याचा अनुभव वर्ध्यातील नोकरीत आला. कृषक संस्कृतीतील अर्थकारणाचा अर्थ दक्षिण भारतातील कांदा विक्रीच्या व्यवसायात आला आणि मानवाच्या एकदंर प्रवासात स्वतःचा शोध घेणं किती महत्वाचं आहे याची अनुभूती, मागील १०-१२ वर्षांच्या मातीशी निगडीत पर्यटनाच्या कामात मिळाली.

आयुष्याची गोष्टच न्यारी आहे...जी पाऊस, माती गवत आणि जीवाशी निगडीत आहे.

मनोज हाडवळे

Thursday, 9 May 2024

मन्या- बस नाम हि काफी है

 मन्या- बस नाम हि काफी है


तो घाटात आलाय हे कधीच कोणाला सांगावं लागलं नाही. बैलगाडा शर्यत असलेल्या यात्रेत बैलगाडा प्रेमी यायचे, तेच मन्याला पळताना बघायला. एरवी जिलेबी भजी, उसाचा रस, कलिंगड, शेव रेवडी अशा विविध दुकानांवर रेंगाळलेली यात्रेतील मंडळी,मन्याची अनाऊंन्समेंट झाली कि पटापट बैलगाडा शर्यतीच्या घाटावर जमा व्हायची. घाटाच्या कडेवर बसलेली लोकं पाय वर घेऊन बसायची. शक्य तेवढ्या दबक्या आवाजात बोलायची. इतरवेळचा कोलाहल मन्याच्या बारीला शांत व्हायचा. पंचकल्याणी राणी घोडी, शंभू सर्जाचं कांडं अन मन्याचा घरचा साथीदार काशी किंवा हरण्या तर कधी गुरु; अशी सगळी आपापल्या जागी जुपली गेली कि, मन्याला मोठ्या रुबाबात आणलं जायचं.
मी कल्पनेत मन्याच्या डोळ्यात जाऊन आलो. एक माणूस दोन्ही हातांनी मोरखी पकडून मन्याला जुपायला घेऊन चाललाय. मन्यात आणि शर्यतीच्या घाटात त्या माणसाचा पांढरा शर्ट आहे. चालताना हळूच, मन्याला ओझरतं असं घाटाचं दर्शन होतंय. एखाद्या झरोक्यातून बाहेर बघावं असं तुकड्या तुकड्यात घाटाच्या दुतर्फा बसलेली गर्दी, पळायचा ट्रॅक, सोबत जुंपलेला साथीदार दिसतोय. जुपणीसाठी जाडीखाली खांद देत असताना, काही सेकंद मन्याचा डोळा, सोबतच्या साथीदाराकडे वळतोय, फक्त डोळ्यांनीच दोघात काहीतरी बोलणं होतंय. तोपर्यंत तिकडं कानावर...भिर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज निघतोय... मन्याला पुढचा रिकामा ट्रॅक आणि दुतर्फा बसलेली माणसं हे सोडून काहीच दिसत नाही.
मी, मन्याच्या डोळ्याबाहेर येऊन पाहू लागतो. मागे धुळीचा भंडार आणि माणसांचा लोट उसळलेला असतो. टोप्या, फेटे आणि रुमाल त्या धुळीतून वर उडताना दिसतात, अनाउंसर दुप्पट आवेशात मन्याला साथ देतात, घाटाच्या तोंडाला निशाण पडतं, खाली इलेक्ट्रिक घड्याळात वेळ दाखवली जाते, याही वेळी मन्याने, त्याचा आधीचा रेकॉर्ड तोडलेला असतो.
मन्या कधीही न हरलेला बैल, प्रत्येक फायनल मारलेला बैल, घाटाचा राजा अशी ओळख कमावलेला पठ्ठया पण जुकाटात पळताना, साथीदार सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. मन्या हा जवळेकरांचा बैल, पण त्यांच्या इतक्याच नामांकित बैलगाडा बाऱ्यांमधील मन्याला साथ देणाऱ्या आणि मन्या इतक्याच जिगरीच्या बैलांसोबत मन्याने बऱ्याचदा मैदान मारलंय. मग त्यात मांडेकरांचा हरण्या, संदिपशेठचा बलमा, अप्पासाहेबांचा बंटीशेठ , अनंतमामांचा हिरा, ब्रिजेशशेठचा झेंड्या, वाघचौरेंचा चिक्या आणि अधुरी राहिलेली वारंगे मामांच्या ओम्या सोबतची जुपणी..हि सगळी कहाणी आहे कृषक समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची.
काल एक दुर्दैवी योगायोग जुळून आला. घाटातली धूळ आणि चीठ्ठी घेऊन येणारे सूर, असं दोन्हीही एकाच दिवशी शांत झालं. बैलगाडा शर्यतीच्या घाटातील हिंदकेसरी हा 'किताब मिरवणारा, मन्या बैल, वयाच्या १८ व्या वर्षी अनंतात विलीन झाला तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (७२) यांनीसुद्धा कालच अखेरचा श्वास घेतला. मन्याचं जाणं अचानक झालं. घाटातील दुखापतीच्या निमित्ताने, मन्यावर उपचार सुरु होते पण तो असा अचानक जाईल अशी काही शक्यता नव्हती.
पंकजजी काही दिवसांपासून कर्करोगाच्या व्याधीने त्रस्त होते. उधास यांनी आपल्या गायकीला, "चिठ्ठी आयी है, आयी है, चिठ्ठी आयी है" असं म्हणत कायमचं अजरामर केलं. तर मन्या त्याच्या पळण्याने घाटाघाटावर आणि मनामनावर गारुड मिरवत राहिला. अध्यात्माच्या व्याख्येतून दोन जीव दोन योनीत जन्माला आले होते. पशु योनीचा कार्यभाग मन्याने पूर्ण केला तर मनुष्य योनीतील जन्माचा समारोप पंकज उधासजींनी केला. वैश्विक अर्थाने, या दोन्ही आत्म्यांनी आपापल्या जन्माचं पांग फेडलं, जगणं सार्थकी लावलं.
वैद्यकीय दृष्ट्या बैलाचं आयुष्य हे २०-२२ वर्षांचं असतं . पण अपवाद म्हणून, चांगली ठेप आणि जातवारपणामुळे यात वाढ झालेली सुद्धा दिसून येते. या पार्श्वभूमीवर मन्या, बैलगाडा शर्यतीच्या घाटात अजून काही वर्ष नक्की पळाला असता आणि स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्याचा युसेन बोल्ट चा स्वभाव पुरेपूर जगला असता.
मन्या जन्माने बैल जरी असला तरी कर्माने सेलिब्रेटी होता, हिरो होता. त्याने विविध घाटात मिळविलेल्या बक्षिसांवर नजर टाकली तर लक्षात येईल कि मन्या गेल्या नंतर त्याची अंतयात्रा का निघाली, त्याच्या अंत्ययात्रेला पाच हजाराहूनही अधिक लोकं का जमली? १५० पेक्षा जास्त टू व्हिलर्स, ७० पेक्षा जास्त बुलेट्स, ३ बोलेरो, १ स्कॉर्पिओ, १ थार, १ जे सी बी, २ पीक अप, ३ ट्रॅक्टर, १०० तोळं सोनं आणि १ कोटीपेक्षा जास्त रकमेची नगदी बक्षिसे. हि बक्षिसं मन्याचं असणं जेवढं अधोरेखित करतात तेवढंच त्याचं आता इथून पुढं नसणंहि जिव्हारी लावून जातात.
मी पुन्हा मन्याची काळजी घेणाऱ्या, त्याला चारापाणी करणाऱ्या त्या ४-५ लोकांमध्ये जातो. ज्याला जग सलाम करत असतं, ज्याला दुनिया डोक्यावर घेत असते, त्याची काळजी घेणारा, हवं नको ते बघणारा व्यक्ती हा त्या हिरोला हिरोपणाव्यतिरिक्त ओळखत असतो. मन्या जेव्हा शर्यत मारून येत असेल, गर्दीतून गाडीत आणि गाडीतून गोठयावर येत असेल तेव्हा त्याची ओवाळणी झाल्यावर त्याला चारापाणी करणाऱ्या व्यक्तीला तो काय सांगत असेल? एकमेकाला सवयीने लाभलेला सहवास आणि सहवासाची झालेली सवय आता सोडावी लागेल हे मन्याच्या "थापाला" स्वीकारावं लागेल.
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात, शेतीचा टप्पा हा उल्लेखनीय मानला जातो. जेव्हा हीच शेती, एक संस्कृती म्हणून विकसित होते तेव्हा त्यातील प्रत्येक घटक उत्क्रांत होत असताना वारसा निर्माण करत असतो. पाळीव प्राणी आणि शेतकरी यांचं नातं या सांस्कृतिक वारश्याची अतिशय हळवी बाजू आहे. आणि जेव्हा असं बैलगाडा शर्यतीच्या रूपाने, मन्या सारखी दंतकथा वाटावी अशी खरी गोष्ट घडते तेव्हा..कृषी संस्कृतीची हि परंपरा ओरडून ओरडून सांगावी असं वाटत राहतं. मागील १२ वर्षांच्या पराशर कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून आपण हे ऍग्री हेरिटेज, वेगवगेळ्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचवत आलो आहे. आणि पुढेही या पालखीचे भोई होऊ हीच मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली.
मनोज हाडवळे

अरे संभालके..लग जायेगा उसको

 अरे संभालके..लग जायेगा उसको



“अरे संभालके..लग जायेगा उसको”, नारायण उस्फुर्तपणे बोलून गेला आणि मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एकदम निरागस भाव होते, बिगारींनी रिक्षातून खाली फेकलेल्या लाकडांकडे धावत जावून, त्यातील एक लाकूड उचलून, त्याला कुठं लागलं तर नाही हे हात फिरवून तो चेक करत होता. आज सकाळपासून तहान भूक विसरून नारायणचं साग साग..लाकूड लाकूड सुरु होतं. घराजवळ असलेली काही जुनी सागाची लाकडं आणि काही वाळलेली झाडं आरीवाल्याला बोलावून त्याच्या मनात असलेल्या मापात, नारायण कापून घेत होता. आरी मशीनने होणाऱ्या प्रत्येक ओंडक्याचा पोत कसा आहे यावरून नारायणची उत्सुकता वाढत होती. आरी मशीनने केलेले ओंडके रिक्षात घालून, ओंडके चिरून देणाऱ्या सॉमिल मध्ये पोहोचले, तिथल्या प्रत्येक चीरावटी सोबत उठून दिसणारी नक्षी पाहून नारायणची कळी खुलत होती. त्या प्रत्येक फळीवर प्रेमाने हात फिरवत, नारायण मनाशीच काहीतरी पुटपुटायचा. सागाच्या जुनाट ओंडक्यांचे ताज्यातवान्या नक्षीदार फळ्यांमध्ये झालेले रुपांतर घेऊन नारायण पराशरवर पोहोचला आणि बिगारींना सर्व लाकूड खाली घ्यायला सांगत होता. तेव्हा बिगारी, धरका फेक असं करत होते. त्या सागाच्या फळ्यांचा जन्म नारायणच्या समोर झाला होता. त्यांच्याशी तो तादात्म्य पावला होता. अशा नवती ल्यालेल्या फळ्या खाली मातीवर पडल्या आणि त्यांच्या वरून अजून फळ्या पडल्या तर त्यांना कोचे पडतील, त्यांची नक्षी खराब होईल, त्यांचा रुबाब कमी होईल म्हणून नारायणच्या तोंडून आपसूक भावना निघाल्या, “अरे संभालके..लग जायेगा उसको”

     

  २०११ साली, आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटनाच्या उभारणीसाठी, मोठा भाऊ, मंगेशच्या माध्यमातून, त्यांच्या शुटींगच्या, आर्ट डिपार्टमेंट मधील मुख्य सुतार, नारायण पहिल्यांदा पराशर वर आला होता. त्याच्या कल्पकतेतून साकारलेलं फर्निचर आतापर्यंत आलेल्या पाहुण्यांनी वापरले आहे. या वर्षी उन्हाळा मोठा कडक गेला, या काळात फर्निचरची डागडुजी आणि काही नवीन फर्निचर करावे म्हणून नारायण सोबत संपर्क केला. हे महाशय तेव्हा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंगच्या तयारीसाठी २ महिन्यांपासून जामनगरला तळ ठोकून होते. खूप मन्नतवाऱ्या केल्याबर अर्धा एप्रिल आणि मेचा पाहिला आठवडा, नारायणची टीम पराशरला अजुन भारी करण्यात तल्लीन होती.

      


नारायण आणि त्याची टीम रोज १२ तास काम करायची. नारायणला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा, त्यानेच बनवलेल्या सागाच्या बाकड्यावर जावून बसत असे. त्यानेच गुळगुळीत केलेला सागाच्या बाकड्यावर मोठ्या प्रेमाने हात फिरवत असे. लाकूड म्हणजे नारायणचा विक पॉइंट. नारायण मुळचा उत्तराखंडचा. वडील आर्मीत असल्याने दिल्लीत वास्तव्य. शिक्षण सुद्धा दिल्लीत झालं. वडील आर्मितून निवृत्त झाल्यावर आर्मीला लागणारे फर्निचर पुरवण्याचा व्यवसाय करत होते. कधीतरी गरजेनुसार फर्निचर मॉडीफाय करावे लागायचे, त्यामुळे एक छोटेसे वर्कशॉप सुद्धा होते. छोटा नारायण, लहानपणापासून हे सगळं पहात आला होता. त्याला लाकुड्कामात रस होता.  इतर चार भावांप्रमाणे नारायण, आर्मीत न जाता, कारपेंटरीचा आय टी आय करायला दिल्लीतच थांबला. शिक्षण संपवून, पुढचा काही काळ व्यवसायात लक्ष घातले. कामातील तोचतोचपणा त्याला कंटाळवाणा वाटायला लागला. नारायण ने मुंबईचा रस्ता धरला.

      


मुंबईत ओळखीपाळखीने काम मिळवायला सुरवात केली आणि फिल्म लाईनमधील आर्ट डिपार्टमेंट मध्ये सहभागी झाला. मागील ३५-३० वर्षांपासून शेकडो हिंदी आणि १० पेक्षा जास्त हॉलीवूड  प्रोजेक्ट वर नारायण ने काम केले आहे. त्यात लाईफ ऑफ पाय, स्लमडॉग मिलेनिअर असे काही सिनेमे आहेत. सध्याच्या वेबसिरीजच्या ट्रेंड मध्ये सुद्धा मोठे मोठे प्रोजेक्ट्स नारायणकडे आहेत.  नारायणचा एकुलता एक मुलगा. दिल्लीत क्यारीकेचर आर्टचे शिक्षण घेतोय. त्यासाठी नारायण, वर्षाला लाखो रुपये खर्च करतोय. नारायण ने मुंबईत २ घरं घेतली आहेत. पण त्याचं मन रमतं ते गावी उत्तराखंड मधेच, तिकडेही त्याने थोडी जमीन घेतलीय. मुलाची जबाबदारी संपली कि गावी जावून, आर्ट स्टुडीओ सुरु करण्याचा त्याचा विचार आहे. हो, कारण नारायण फ़क़्त सुतार नाही तर तो एक कलाकार आहे.  आणि उपलब्ध सामग्रीत आपली कला प्रत्यक्षात उतरविण्याचे कसब त्याच्याकडे आहे.

      


फर्निचरसाठी लागणारा कच्चा माल खरेदीला जेव्हा आम्ही दोघे जायचो, तेव्हा नारायणची नजर रस्त्याने जातानाही लाकडावरच असायची. त्याचा लाकडाचा चांगला अभ्यास पण होता. म्हणजे अगदी मिसळ खाऊन, बेसिनला हात धुवत असताना, समोर दिसणारे झाड बघून, “मनोज जी, ये  सिसम का पेड भी बहोत काम का है” अशी त्याची भिरभिरती नजर असायची.


सरपणाच्या वखारीत गेलो असताना, तिथे ३०-४० वर्ष जुन्या घराची लाकडं आणि फळ्या आल्या होत्या. इतके वर्ष पाणी, वारा, उन आणि धूर खाऊन काळ्या कुट्ट झालेल्या त्या फळ्या बघून, पक्का यही लेना है ना? हा हा आप उठावो तो सही.. मालाची रिक्षा पराशर वर आली. नारायण ने ग्रायंडरच्या मदतीने फळ्या घासल्या, काजळी निघाली, त्या सर्व सागाच्या फळ्या होत्या. त्याने तेव्हाच ओळखल्या होत्या.  त्या फळ्यांच्या मदतीने स्टूल बनवत असताना, नारायण सांगू लागला. मनोज जी, जिसने घर बनाया, उसने भी इस लकडी को कहीसे लाया होगा. इस लकडीने उसका घर बसाया, ३०-४० साल उसका साथ निभाया, नया बंगला बनाना है तो इस पुराने लकडी को जलानेके लिये बेच दिया...अब हम इसको उठाके यहा लाये...इसका स्टूल बना.. इस स्टूल मे लगी लकडीका नसीब उसे यहा लेके आया...आपके यहा तो देश विदेश से लोग आते है..न जानेकीस कीस के नसीब मे इस लकडी का साथ होगा...लाकडी का भी अपना अलग जर्नी होता हे... सगळं नारायण स्तुलाचे पॉलिश करताना बोलत होता.

साधा वेठबिगार आपला दिवस भरवायच्या मागे असतो. जो आकार बनवायला सांगितला आहे तो बनवत असतो. दिवस भरला कामाचा विचार आजपुरता थांबला. मग दुनियादारी करायला मोकळा. नारायण सारखी आपल्या आवडीशी व कामाशी असणारी कमीटमेंट त्याचा दिवस भरला तरी डोक्यातला विचार जात नाही. म्हणून तर जेवण झालं तरी नारायण कागदावर स्केचेस काढत बसतो...एखाद्या ओंडक्यात माणसाचा चेहरा रेखाटत असतो.


ज्या दिवशी त्यांना परत जायचे होते, त्या दिवशी कामं उरकून घ्यायचं सुरु होतं. तेवढ्यात एका ओंडक्यावर नारायणची नजर गेली, आणि मग पुढचे २-३ तास त्या ओंडक्याचा माणुस बनवण्यात गेले. अजून एक दिवस वाढला. जेव्हा मी टुरिझम कन्सल्टंट म्हणून काम करत असताना, लोकांच्या प्रक्षेत्र भेटीला गेल्यावर, तुमची जागा/जमीन तुम्हाला सांगते कि मला काय बनायचे आहे, माझ्या कुठल्या कोपऱ्यात काय छान होईल..हे ऐकता यायला हवं. सेम गोष्ट नारायण पण बोलला, मनोज जी. लकडी हमे बताती है के उसे क्या बनाना है..हमे बस वो सुनाई देना चाहिए.

नारायणचं काम सुरु असताना, अगदी सहज मोबाइलचा कॅमेरा सुरु करून आम्ही संभाषण सुरु केलं आणि नैसर्गिकरीत्या झालेल्या गप्पा रेकॉर्ड झाल्या. नारायणने आपल्या जादूने पुन्हा एकदा पराशरचं रुपडं बदललंय आणि मला नारायण सारखा अवलिया बऱ्याच दिवसांनी भेटल्याचे समाधान पण मिळालय.