Monday, 14 August 2023

आराधनाची नृत्याराधना

 

आराधनाची नृत्याराधना



आराधना... तिच्या नावातच पूजा आहे, समर्पित भाव आहे. तिच्याविषयी लिहिण्यासारखं बरंच काही आहे. आणि ते सुद्धा फक्त यासाठी नाही की ती आतापर्यंत 3 वेळा पराशर वर येऊन गेलीय, किवा तिने माझं बंद असलेलं Instagram सुरू करून दिलंय किवा तिला छान डान्स येतो किवा तिचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे... तिच्या विषयी लिहावं वाटलं कारण ती एक प्रेरणादायी ऊर्जा आहे.

आराधना व माझी ओळख फक्त वर्षभरा पूर्वीची आहे. 2022 च्या ऑगस्ट महिन्यात आराधना, तिचा नवरा विश्वजित आणि तिचे सासू सासरे असे चौघे जण पराशरवर एका मुक्कामासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी उठून बाहेर आलो तेव्हा आराधना, भल्या पहाटे आवरून , छान साडी घालून, वडाच्या पारावर, ओडिसी नृत्य करत होती आणि तिचा नवरा विश्वा, तिचे शूटिंग करत होता. आराधनाच्या नृत्यविष्कारासोबतची माझी ती पहिली ओळख.  त्यांना लवकर घरी परतायचे होते म्हणुन जास्त गप्पा मारता आल्या नाहीत पण ते दोघं पुण्यात राहतात, नुकतंच लग्न झालंय, आई वडील ओरिसाहून आले आहेत म्हणुन त्यांना ग्रामीण महाराष्ट्र दाखवायचा होता, त्यासाठी आलो होतो...इथपर्यंत कळलं.

आम्ही पुण्यात 5 वर्षांपासून राहतोय आणि महाराष्ट्रियन जेवण म्हणजे पुण्यात मिळतं तेच आणि तसंच असाच काहीसा असणारा त्यांचा समज, पराशरच्या मुक्कामात दूर झाला. इथलं जेवण त्यांना फार आवडलं. तेव्हा मी मोबाइल बदलला होता, माझं पराशर Instagram बंद झालं होतं. आराधनाने 2 मिनिटांत ते सुरू करून दिलं.... ही आमची पहिली भेट.



साधारण 3 महिन्यांनी, ऑक्टोबर महिन्यात, पुन्हा एकदा, विश्वा, आराधना आणि तिचे आई वडील असे चौघेजण एका मुक्कामासाठी पराशर वर आले. आराधनाची आई फार बोलकी होती, उत्साही होती. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी हौसेने करायची असायची. डांगर भोपळ्याच्या पानांची भाजी खूप छान होते, तसेच अनेक ओडिसी खाद्यपदार्थांमध्ये ही पाने वापरली जातात म्हणुन शक्य होतील तितकी डांगराची पाने त्यांनी जमा केली होती.

आराधनाचे आई वडील दोघंही संस्कृत विषयातील डॉक्टरेट मिळविलेले, दोघंही प्रोफेसर आणि सध्या निवृत्त झालेले. आराधनाच्या आईने स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्या स्वतःच गाणं लिहितात, कंपोज करतात, स्टुडिओ घेऊन ते रेकॉर्ड करतात आणि युट्यूबवर आपलोड करतात. त्यांना  संत ज्ञानेश्वरांचे काही अभंग माहीत होते, आम्ही जेव्हा ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिराकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी खूप छान अभंग गायले होते. त्यांची पराशर वारी खूप आठवणीत राहील अशी होती. तर ही आमची दुसरी भेट.

आम्ही संपर्कात होतो. विश्वा आणि आराधना कुठे ट्रेक ला जावून आले की फोटोज पाठवायचे. आम्ही instragram एकमेकांना फॉलो करत होतो, त्यामुळे सगळे अपडेट रेग्युलर मिळायचे. त्यांना रुद्रा चं लळा लागला होता. दिवाळीत जेव्हा रुद्रा आजारी पडला होता तेव्हा विश्वा, आराधना आणि त्यांचे आईवडील अशी सर्वांनीच चौकशी केली होती. आराधना चे,  नृत्याराधना नावाचे Instagram अकाऊंट आहे, तिथं ती वेगवेगळे डान्स फॉर्म्स, योग करतानाचे व्हीडिओज पोस्ट करत असायची. तिची लवचिकता, डान्स करतानाच्या स्टेप्स, तिचं डेडीकेशन बघता माझी उत्सुकता चाळवली. आराधनाच्या नृत्याराधनेविषयी जाणून घ्यावसं वाटलं आणि अर्थात ती सुद्धा तेवढीच मोकळी ढाकळी असल्याने तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या.



आराधना सध्या पुण्यात आय टी क्षेत्रात नोकरी करते. तिचं इंजिनिअरिंग भुवनेश्वरला झालं, कॉलेज पूर्ण व्हायच्या आधी कॅम्पस इंटरव्हीवच्या माध्यमातून तिला पुण्यात नोकरी मिळाली. ती आणि तीचा नवरा विश्वजित दोघंही ओरीसाचेच. त्यांची 5 वर्षांची मैत्री पुढे प्रेमात आणि मग लग्नात बदलली. आराधनाला एक भाऊ, तो लंडनला असतो. तिच्या आईवडीलांना जगण्याच्या धावपळीत एकच अपत्य पुरेसं होतं. पण आईला नृत्याची असणारी आवड अस्वस्थ करत होती. आपण नृत्याची आराधना करावी, संगीताची पूजा करावी. हे सांस्कृतिक संस्कार पुढच्या पिढीत झिरपायला हवेत, त्यासाठी त्या मनोमन प्रार्थना करायच्या, मला मुलगी होऊदे म्हणजे हे सगळं मी तिला देवू शकेल.

जेव्हा “आराधना” ची चाहूल लागली तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, हे अपत्य एकतर खेळाडू होईल किवा  डान्सर होईल. एवढ्या लाथा आराधना पोटात असताना मारत होती. मुलगी झाली, आईने नाव ठेवले, “आराधना”. तिचं नृत्याचं ट्रेनिंग सुरू झालं. तिने आयुष्यात पहिली चप्पल घालण्याआधी पायात घुंगरू बांधले होते.  वयाच्या 3 ऱ्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता.  



वाढत्या वयासोबत ती नृत्याचे धडे गिरवू लागली. ती प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना बनली. भरतनाट्यम नंतर सर्वात जुना नृत्य प्रकार म्हणुन तिला ओडिसी नृत्य फार जवळचे आहे. पुढे 10-12 वीच्या  व्यापात डान्स प्रॅक्टिस सुटली, त्यामुळे व्यायाम थांबला, आजारपण वाढलं... तशातच कॉलेज पूर्ण झालं, पुढं नोकरी लागली.

कोरोनाकाळात बराच काळ एकटीला रहायला मिळालं तेव्हा तिने योग सुरू केला. योग आणि नृत्य यात बरच साम्य असल्यासारखं तिला जाणवलं. मधल्या काळात तिची आध्यात्मिक बैठक पण जमून आली होती. या सर्वाचा परिपाक असा झाला की ती, आदियोगी शिव, योग आणि नृत्य या तिघांच्या फ्यूजन मधून तिने काही डान्स फॉर्म्स डिझाईन करायला घेतले. त्या फ्यूजनचे अनेक व्हिडीओज ती नृत्याराधना युट्यूब चॅनल वर पोस्ट करत असतेच.



भीमाशंकरच्या अनुषंगाने आणि शिवाच्या अंगाने, नृत्याच्या माध्यमातून काही करता येईल का याची चाचपणी आम्ही करून पाहिली, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत. एकदा असंच बोलताना मी तिला म्हणालो की एखादी डान्स थीम घेऊन तू पराशरवर शूट का करत नाहीस? माझ्या डोक्यात आहे ते, करूया लवकरच तिने आश्वासक उत्तर दिले. मे महिन्यात तिने आपण पराशरवर शूट करूया असं सांगितलं. आम्ही सगळी तयारी केली. तिने सांगितलेल्या गोष्टी अरेंज करून ठेवल्या. शूटचा दिवस अवघा 3 दिवसांवर आला असताना, आराधनाचा मेसेज आला, प्रॅक्टिस करत असताना, पाय लचकला, पुढील 3 महीने डान्स करता येणार नाही असं डॉक्टर म्हणाले.

पण हार मानेल ती आराधना कसली. जशी पायाची दुखापत जरा बरी झाली, तिने पुनः प्रॅक्टिस सुरू केली. मध्यंतरी काशी विश्वेश्वराला जावून आली. या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने तिने एकूण 6 डान्स फॉर्म्सचे फ्यूजन करून एक थीम बनवली, “भारत“ नावाची. त्याच्या शूटिंग साठी तिने 9 ऑगस्ट ही तारीख फायनल केली. पायाची दुखापत जवळपास बरी झालीय, मी आता परफॉर्म करू शकते, तेव्हा आपण आता प्लॅनिंग करूच, तिचा मेसेज आला. आमची तयारी झालेलीच होती.



9 ऑगस्ट ला आराधना, विश्वा आणि तिची टीम रात्री 8 वाजता पोहोचले. टीम, शूटिंगच्या तयारीला लागली. आराधना ड्रेसिंग व मेकअप साठी गेली. नम्रताने तिला साडी नेसवायला थोडी मदत केली. ती स्वतःच सगळं करत होती. सगळं म्हणजे अगदी सगळंच. मग व्हिडिओची भारत थीम, त्यातील डान्स फॉर्म्स, लोकेशन्स, ड्रेसिंग हे सगळं आराधना बघत होती. तिला खण्यापिण्याचे भान नव्हते. लाइट्स अरेंज झाल्या, सगळी तयारी झाली. रात्री साडे नऊ ला शूटिंग सुरू झालं, 2-3 मिनिटांच्या फायनल टेक साठी जवळपास 3 तास शूटिंग चाललं.

माझी 7 वर्षांची मुलगी, अहिल्या ते सर्व लक्षपूर्वक बघत होती. सुरवातीला रुद्रा पण तिथेच होता. एक टेक झाला की रुद्रा टाळ्या वाजवून वाव म्हणायचा. आराधना एखाद्या टेक नंतर थांबली की अहिल्या तिला पाणी द्यायची, मला पण या दिदी सारखा डान्स करायचा आहे, अहिल्याला आराधना कडून प्रेरणा मिळत होती. मी अहिल्याला काहीही न बोलता तिच्या विश्वात मोकळे सोडले.



रात्री 12 वाजता शूटिंग संपले, तू जेवणार ना आता, मी आराधना ला विचारले, अजिबात नाही. मला लवकर उठायचं आहे, उद्याची तयारी आहे परत. मी लवकर झोपते म्हणत आराधना न जेवताच झोपायला गेली. ही पोरगी तहान भूक विसरली होती. तिचं डेडीकेशन आणि कमिटमेंट जबरदस्त होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेच आवरून , 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत, पराशरमधील तसेच परिसरातील अनेक ठिकाणी वेगवगेळे डान्स फॉर्म्स निवडून शूटिंग झाले. आणि विशेष म्हणजे तिच्या ऑफिसची ऑनलाइन मीटिंग अटेंड करून तिने हे सर्व जमवून आणले.

आराधना कलाकार जरी असली तरी व्यवहारात जगते. आपल्या नृत्याकडे ती  कलेच्या, उपासनेच्या नजरेतून बघत असताना, कुठंतरी जुन्या नव्याचा संगम करून, आपल्या कलेचे जतन करावे असे तिचे स्वप्न आहे.  म्हणुन ती अशा वेगवेगळ्या थीम घेऊन डान्स परफॉर्म करते. त्यासाठी थीम, लोकेशन, टीम, लागणारा वेळ, साहित्य, सामग्री, ड्रेपरी आणि बजेट हे सगळं अरेंज करते आणि हे सगळं आपली नोकरी सांभाळत करते हे विशेष.



आराधनाच्या या नृत्याराधनेत विश्वा, एक समिधा बनून पडत असतो. कधी असिस्टंट, तर कधी मेकअप मॅन, कधी साऊंड ट्रॅक प्लेयर तर कधी सारथी अशा वेगवेगळ्या भूमिका, तितक्याच शांततेने विश्वा निभावत असतो, तिला खंबीर साथ देत असतो.

या स्वातंत्र्य दिनी, आराधना मुळे, आपल्या पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्राला एक अनोखी भेट मिळत आहे. तिच्या विविध डान्स फॉर्म्स च्या माध्यमातून भारतमातेला दिलेली ही मानवंदनाhttps://youtu.be/yqJAYRXn__Y?si=B34ynEsR_mTPZrgW

इथे पहायला मिळेल. तिच्या परफॉर्मन्स मुळे जी काही सकारात्मक ऊर्जा पराशरच्या परिसरात आलीय, ती पुढील काळात येणाऱ्या पाहुण्यांना जाणवत राहील.

भारत चिरायू होवो, भारतीय कला चिरायू होवो, आराधना सारख्या प्रेरणादायी लोकांनी पराशरवर येत राहो आणि आम्हाला प्रेरणा देत राहो. 

जयहिंद जय महाराष्ट्र.     

मनोज हाडवळे

9970515438

     

 

  

 

Saturday, 12 August 2023

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी  



फिरणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना, आपल्यासारख्याच इतर जातीच्या मानवाला नष्ट करून जेव्हा होमो सेपियन एकटाच उरला; तेव्हा दुसऱ्यावर कुरघोडी करणं हा त्याचा स्थायीभाव स्वतःच्याच मुळावर उठू लागला. सुरुवातीला एकट्याने राहणारा नंतर समूहात राहू लागला. त्याच्या बुद्धीचा विकास अफाट वेगाने होत असताना, त्याने समूहाचे काही कायदे कानून बनवायला सुरुवात केली. काळासोबत हे नियम कधी धर्माचं, कधी जातीचं रूप घेऊन समूहाला प्रभावित करण्यात; आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, ही अहंपणाची भावना विकसित करण्यात खतपाणी घालू लागले. 


आतापर्यंतच्या, मानवाच्या प्रवासात त्याच्या बुद्धीचा उपयोग हा त्याचं जगणं सुकर करण्यासाठी होत राहिला आहे. मग त्यामध्ये भौतिक सुविधांची निर्मिती, जगण्यातील मेहनत कमी करण्याचे वृत्ती, शारीरिक कष्टांना कमी करण्यासाठी माणसाने त्याची बुद्धी पणाला लावली. अगदी अलीकडच्या काळातील रोबोट संकल्पना आणि त्यानंतरची कृत्रिम बुद्धिमत्ता अशा गोष्टींना घेऊन माणूस विचार करू लागला. माणूस हा इतर सजीवांपेक्षा त्याच्या विचार करण्याच्या व लक्षात ठेवण्याच्या गुणांमुळे वेगळा ठरतो आणि म्हणूनच त्याचं हे वेगळेपण शारीरिक कुवत नसतानाही या पृथ्वीवर अधिराज्य गाजवण्यासाठी पुरेसं ठरतं.




बुद्धी ही दुधारी तलवार आहे या बुद्धीच्या जोरावर जेव्हा भौतिक सुविधांचा विकास करत असताना, जगणं सुसह्य होत असताना, बुद्धीला खाद्य म्हणून काय द्यावं म्हणून माणसाने स्वतःच जगणंच पणाला लावलेलं दिसतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जो विचार करतो तशाच प्रकारे विचार करणारी एक वेगळी यंत्रणा माणूस विकसित करून पाहत असताना; त्यातील भविष्यात होणारे परिणाम वाईट असतील असं माझं मत नाही पण ते प्रकृतीच्या नैसर्गिक विकास प्रक्रियेला आणि पर्यायाने मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवाहाला छेद देणारे नक्कीच असू शकतील. कदाचित मानवी उत्क्रांतीचा महत्वाचा टप्पा म्हणुन त्याकडे पाहता येईल. 


मानवाने त्याच्या जगण्याला सुसह्य करण्याची मजल याच बुद्धीच्या जोरावर मारली. याच जगण्याला प्रगल्भ करण्याची, बौद्धिक विकासाच्या कसरतीची यंत्रणा, जी या आसुरी वेगाचे का? कशासाठी? कुठपर्यंत? कोणासाठी? किती? हे प्रश्न बुद्धी आणि मन या दोघांना समन्वयित करून स्वतःलाच डोळसपणे विचारू शकेल अशी यंत्रणा याच मानवाने विकसित केली; ज्याला आपण अध्यात्म म्हणू शकतो. आजचा आधुनिक मानव अध्यात्म आणि धर्म यात गल्लत करताना दिसतो. 



अध्यात्माचा मार्ग मनन, चिंतन, स्वतःच्या शोधाकडे घेऊन जातो; तर धर्माचा मार्ग स्वतःच्या शोधापासून परावृत्त करत एका संमोहित दुनियेत जगायला प्रवृत्त करतो. अध्यात्म आपल्याला प्राकृतिक विकासाच्या नैसर्गिक वेगांसोबत टिकवून ठेवते तर धर्माच्या माध्यमातून इतरांपेक्षा आपल्याला वेगळे ठरवणारी मानसिकता विकसित होते, की ज्याचा दुरगामी परिणाम हा मनशांती पेक्षा मनाच्या उत्कटेकडे घेऊन जात असतो. 

मनशांती आणि मनाची उत्कटता हे दोन्ही स्वभाव एकाच मनाशी खेळ करत असतात. सध्या 5-G चा जमाना आहे. ग्रामीण भागातील एखाद्या खेड्यातील घरात बसून, कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण युट्युबवर; पाहिजे ते बघू शकतो. हा झाला मानवाच्या बुद्धीच्या जोरावर झालेला भौतिक विकास. पण याच युट्युबवर आपल्या आवडीचं काहीतरी बघत असताना, जो काही थोडासा बफरिंग अडथळा येतो; तेवढ्या काळात पेशंस न राहता चिडचिड होणं आणि युट्युबला काहीतरी बघितल्यानंतर आदळआपट होणं,  मनाची शांती हरवून मन चंचल व उत्कट होणं, हा झाला मानवाच्या बौद्धिक विकासातून साधला गेलेला, जगण्याच्या गुणवत्तेचा परिणाम.


माणूस जन्माला येतो गर्भातून, तो त्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस वयाने व  शरीराने वाढत जातो, ज्याला आपण भूमितीच्या भाषेत त्रिज्या म्हणू शकतो. जसं प्रत्येक ग्रह एका विशिष्ट ऊर्जेने स्वतःभोवती फिरत असताना, दुसऱ्या भोवतीही फिरतो. अगदी त्याचप्रमाणे जन्माला आलेला माणूस त्याच्या आत्मरुपी उर्जेने स्वतःभोवती जगणं गुंफत असताना, जगाचंही आकलन करत, जगातही तो फिरत असतो. त्याची फिरण्याची कक्षा वाढत्या वयासोबत वृंदावत जाते. सवयीने त्याचं फिरणं त्या परिघावर असतं, त्याच्या कक्षेत अनेक विचारधारा, अनेक लोक, अनेक प्रलोभनं, अनेक आव्हानं, प्रेम, लोभ, राग, मत्सर, इर्षा अशी अनेक भावनिक आंदोलनं ही सर्व त्याच्या परिघावर त्याला भेटत असतात. 

त्या कक्षेवर फिरत असताना, त्याला जसं आनंदी करतात तसं कधी विचलितही करतात. जगण्याच्या आनंदासोबत विरक्ती आणतात पण मानवाला त्याच्या केंद्रबिंदूकडे म्हणजेच स्वतःकडे परतण्याचा चिंतनुरूपी एक मार्ग नेहमीच मोकळा असतो ज्याला आपण अध्यात्म म्हणतो. माणूस विचार करू शकतो आणि त्याच बळावर तो जगरहाटीच्या परिघावरून पुन्हा भौमितिक सिद्धांतांना छेद देत, स्वतःच्या केंद्रबिंदूकडे प्रवास करू शकतो. अशावेळी जगरहाटीच्या परिघावरची गती सोडून, तो स्वतःच्या गतीने केंद्राकडे त्रयस्थपणे बघू शकतो, केंद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो, ही सुद्धा ताकद माणसाला त्याच्या बौद्धिक विकासाने दिलेली आहे.



दुर्दैव असं की या अंतर्गतशक्तीचा त्याला अंदाज येत नाही; कारण बाह्य जगातील प्रलोभनं, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सर्वांचा हव्यास त्याला परिघावरच फिरण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. अनादी कालापासून या सृष्टीचा विकास होत असताना आपण आपल्या 60-70 वर्षाच्या आयुष्यात या पृथ्वीवर येतो. आजमीतिला आपल्यासारखीच सुमारे 750 कोटी लोक या पृथ्वीतलावर राहत आहेत. आपण खूप प्रतिष्ठित आहोत, आपल्याला खूप लोक ओळखतात ह्या भ्रमात आपण आपल्या जगण्याचं एक छोटसं विश्व, ह्या विराट विश्वामध्ये तयार करून घेतो. कारण या विराट विश्वाला भिडण्याची हिंमत आपल्यात कधीच नसते. खरंतर आपण या विराट विश्वाच्या एका अणूपेक्षाही छोटा भाग आहोत. पण हे कळण्यासाठीची मनाची मशागत होण्यात अनेक अडथळे येत असतात. 

जर कधी कोणी आपल्याला आपली ओळख विचारली तर पटकन आपण आपलं नाव, गाव, हुद्दा, अमुक व्यक्तीचा नातेवाईक अशा गोष्टींचे रेफरन्स विचारणाऱ्याच्या अंगाने देत असतो. ही ओळख सांगत असताना एकमेकाच्या परिचयाची भावना असेल तर सांगत असताना काही ऐकलं पण जातं. परिचयाचा टप्पा पार केल्यानंतर जेव्हा नव्याने भेटलेल्या दोन व्यक्ती एकमेकाला जोखायला लागतात तेव्हा तात्पुरते अहंगंड शांत केले जातात. मग कोण किती पोहोचलेला आहे, कोण किती बडा असामी आहे त्यानुसार त्याच्याशी वर्तन ठरले जाते. कोण किती उपयोगी आहे त्यानुसार भविष्यातील भेटीगाठी ठरत असतात, कारण या भौतिक जगात मानवाला दोन प्रकारची मूल्य; उपयोगीता आणि उपद्रव मूल्य असली तरच तो या जगरहाटीच्या कामाचा ठरतो. यातील दोन्हीही मूल्य जर नसतील तर तो जगाच्या काही कामाचा ठरत नाही. 



या जगात प्रसिद्ध नसलेली अशी अनेक लोक आहेत की ज्यांना खरं तर कोणीच काही जबाबदारी दिलेली नसली, तरी कुठलाही हर्क्युलस चा भाव मनात न आणता; आपापल्या क्षेत्रात ही लोक स्वतःच्या उर्जेला, विचाराला आणि कृतीला न्याय देत; जगण्याचं जे माध्यम निवडलेलं  आहे, त्यात छान प्रकारे जगत असतात. मग कोणी छान शोध लावतो, कोणी छान शेती करतो, कोणी छान शिकवतो, कोणी छान घर बांधतो, कोणी छान चित्र काढतो, कथा लिहितो, सिनेमे बनवतो हे सर्व करत असताना ती व्यक्ती खरंतर स्वतःसाठी करत असते, स्वतःच्या क्षमतांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. 

त्या व्यक्तीच्या त्या कृतीने जगाला जे काही मिळतं ते खरंतर त्याच्यासाठीचं बायप्रॉडक्ट आहे. पण आजच्या या हायस्पीडच्या काळात जसं जगण्याच्या मुख्य केंद्रबिंदूकडे जाण्याऐवजी, जगराहाटीच्या परिघावर फिरण्यात धन्यता मानली जाते; तसंच मुख्य प्रॉडक्टकडे दुर्लक्ष करून बायप्रॉडक्टलाच सिरियसली घेण्याची वृत्ती बळावली आहे. आणि त्यामुळे सर्व सुखसोयी, भौतिक सुविधा पायाशी लोळण घेत असतानाही माणूस दुःखी असतो, चंचल असतो, मनशांती हरवलेल्या अवस्थेत सुख शांतीसाठी चाचपडत असतो. 


मानवाचं हे चाचपडणं आजच्या एका मोठ्या उद्योग व  व्यापाराचे भांडवल आहे. याच भांडवलाचा उपयोग करून धर्मगुरू, आध्यात्मिक गुरु, बिजनेस कोच, मेंटॉर अशी एक मोठी फळी तुम्हाला सेवा पुरवायला जगभरात उभी राहिलेली आहे. इथं खरं गंमत आहे.  सगळी माणसं सारखी, सारख्याच मेंदूची पण केवळ विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे आणि आपल्या विचारक्षमतांची जाण नसल्यामुळे संमोहित अवस्थेत जगत असतात. यातील काही जागरूक मेंदू या संमोहित मनांचा ताबा घेऊन त्याच्यावर आधीराज्य गाजवू पाहतात. तात्पुरते उपाय योजले जातात की ज्यांना आपण बिझनेस सेमिनार, मनशांतीचे सेमिनार अशा अनेक नावाने ओळखू शकतो. 

मला वाटतं ही सगळी फांद्यांवरची उपचार पद्धती आहे; जर आपल्याला रोग समूळ नष्ट करायचा असेल तर जी काही उपाययोजना करायची आहे ती मुळांवर व्हायला हवी, जी आपोआप फांद्यांवर फरक दाखवेल. आपल्याही जगण्यात जर आपल्याला सकारात्मक गोष्टींची गरज वाटत असेल, तर वरवरची उपायोजना तात्पुरता परिणाम देत जरी असली तरी शाश्वत बदलासाठी आंतरिक मनावर, आत्म्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आणि ह्या उपचार पद्धतीचा एकमेव नाव आहे अध्यात्म. 


अध्यात्म हे कुठल्याही विचारधारेची, धर्माची, देशाची, पंथाची व लोकांची मालकी नाही; अध्यात्म हे सचेतन मनाचं प्रतिबिंब आहे, जे प्रत्येकात असतच असतं. आपल्याला ते फक्त जागं करावं लागतं. अर्थात हे इतकं सोपं वाटत असलं तरी तितकं ही सहज नाही, कारण आपण अनेक गोष्टींनी आकर्षित असताना, प्रभावित असताना त्या जगण्याचा आणि आंतरिक जगण्याचा समतोल साधणं ही एक कला होऊन बसते. ज्याला ही कला साधता आली त्याचं जगणं समतोल झालं. 

माणूस जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत जो काही प्रवास करतो, तो प्रवास स्वतःच्या शोधाचा असतो. स्वतःचा शोध हा स्वतःच घ्यायचा असतो, त्याच्यासाठी भलेही कुठली यंत्रणा तुम्हाला एका पातळीपर्यंत मदत करू शकेल; पण त्या पुढचा प्रवास मात्र स्वतःचाच असतो. कधी कधी कोणाला स्वतःचा शोध लागतो तर कधी शोध घेण्याच्या प्रवासात जगण्याचा प्रवास संपतो; या सर्व प्रक्रियेत माणूस म्हणून आपण एक गोष्ट निश्चितपणे करू शकतो ती म्हणजे अंतर बाह्य प्रवास.
एक प्रवासी-मनोज हाडवळे
9970515438 
पराशर कृषि व संस्कृती पर्यटन  

जेवण बनवणं आणि प्रोफेशनल करिअरच्या सवयी यांचं फार जवळचं नातं आहे


 

जेवण बनवणं ही संपूर्ण प्रक्रिया, तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीचं, कॉन्सन्ट्रेशनचं आणि कन्वेक्शनचं उत्तम उदाहरण आहे.

जेवण बनवण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून भाज्या कापणं, मसाले काढणं, गॅस किंवा चूल थोडक्यात आग पेटवल्यानंतर तिची इंटेनसिटी, मसाल्याचा कुठला जिन्नस आधी टाकायचा, किती प्रमाणात टाकायचा, तेल पाणी कधी व किती, तसेच भाजी कधी टाकायची, किती शिजवायची, किती लोकांसाठी जेवण बनवायचे? त्याची क्वांटिटी किती असली पाहिजे? त्याची चव व रुचकरपणा आणि त्या जेवणाचं शेवटचं आउटपुट म्हणून आठवण राहील अशी मेजवानी;
आणि हो सर्वात महत्त्वाचं, ही सगळी मैफिल झाल्यानंतर त्या ठिकाणची खरकटी भांडी आणि पसारा आवरून, किचन होतं तसं करून ठेवणं ही संपूर्ण प्रक्रिया, ज्याला करता आली तो कुठल्याही व्यवसायात किंवा कामात रिझल्ट ओरिएंटेड परफॉर्मन्स देऊ शकतो. (कदाचित त्यामुळेच, जिथं जिथं, महिलांनी नोकरी व व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे तिथं लॉसेस कमी आहेत).


मला फक्त भाजी कापून देता येते, कुकरच्या किती शिट्ट्या झाल्यात एवढं मोजण्याचे काम करतो, कालवणाला उकळी आली की नाही यावर लक्ष ठेवतो, पाहुण्यांना किती वेळ आहे याची चौकशी करतो, डायनिंग कसा बसवायचा आहे ते बघतो, जेवण झाल्यानंतर मुखवास आणण्याची जबाबदारी माझी किंवा सर्व झाल्यानंतर मी फक्त भांडी घासतो.... अशा कप्प्या कप्प्यातल्या आणि तुकड्या तुकड्यातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेणारी व्यक्ती स्वतः म्हणून स्टार्ट टू एन्ड एखादं काम व्यवसाय किंवा जबाबदारी पूर्णपणे हाताळण्यास अपयशी ठरते.
दृश्य स्वरूपात हे जरी मटेरिलीस्टिक वाटत असलं तरी त्यातला कोर पार्ट तुमच्या लक्षात येईल तो असा आहे; आपलं काम, आपली जबाबदारी, आपला व्यवसाय हा Own करण्यात आला आहे.
सुरुवातीला ज्या उत्साहात सुरू केलेलं काम, शेवटच्या पायरी पर्यंत आणि टार्गेट अचिव्ह होईपर्यंत, तेवढ्याच सिन्सिअरली करण्यासाठी, त्या कामाची ओनरशिप घ्यावी लागते.


तुकड्या तुकड्यात घेतलेली जबाबदारी, संपूर्ण ओनरशिप फिलिंगच्या अभावी अपुरी ठरते. एक टीम मेंबर म्हणून फायनल आउटपुटच्या एनालिसिसच्या वेळी, आपलं काम जरी झाकून गेलं तरी जेव्हा, "किती दिवस दुसऱ्याचं करायचं? आता मी माझं स्वतःचं काहीतरी करेल ही भूमिका घेऊन; जेव्हा कामाला सुरुवात केली जाते, तेव्हा जर ओनरशिप घेण्याची, संपूर्ण जबाबदारी घेण्याची सवय आणि मानसिकता नसेल, तर अडचणी मोठ्या बिकट असतात.
आज सकाळी अहिल्याच्या डब्याची तयारी करत असताना, भाजी कापताना डोक्यात हा विचार आला. मला काही बेसिक गोष्टी सोडल्या तर संपूर्ण जेवण बनवता येत नाही, याची अलीकडेच प्रकर्षाने जाणीव झालीय.

मनोज हाडवळे
9970515438

Friday, 4 August 2023

जुन्नरची पूर्वाई

 

जुन्नरची पूर्वाई

 


जुन्नर, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आणि पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडचा तालुका. जुन्नर तालुक्याला आंबेगाव (पुणे), मुरबाड(ठाणे), अकोले, संगमनेर, पारनेर (अहमदनगर) या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत. म्हणजेच जुन्नरमध्ये; ठाणे (कोकण) पुणे आणि नगर या तिन्ही जिल्ह्यांच्या शेजारातुन एकत्रित फ्यूजन होऊन, जुन्नरची “जुंदरी संस्कृती” उभी राहिलेली आहे.

 

जुन्नर, समुद्रसपाटीपासून 2300 फूट उंचीवर आहे. जुन्नरच्या, उत्तर दक्षिण विस्ताराच्या तुलनेत; पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त आहे. जुन्नर मध्ये एकूण 187 गावं, त्यापैकी जवळपास 65 गाव ही आदिवासी लोकवस्तीची. भौगोलिक दृष्ट्या जुन्नरचा पश्चिम भाग म्हणजे मावळ पट्टा हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. 

 

हरिश्चंद्रगड उतरल्यानंतर माळशेज घाट, भोरांड्याचे दार, नाणेघाट, दाऱ्या घाट, आंबे हातवीज पठार ही कोकणकड्यावरील अतिवृष्टीची ठिकाणे येतात. जुन्नरच्या पूर्व पश्चिम विस्तारात, कोकणकड्यावर पडणारा 2000-2500 मिमी पाऊस, पूर्वेकडील आणे पठारावर पोहोचता पोहोचता 500 मिमी होतो, आणि हे सगळं 70 किमी अंतरात घडतं. याच भौगोलिक विविधतेमुळे, जुन्नरमध्ये सांस्कृतिक विविधता अनुभवायला मिळते जी अनुभवसिद्ध पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त बाब आहे.

 


जुन्नर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. नाशिक महामार्ग (NH-60) आणि नगर कल्याण महामार्ग NH-61) हे दोन्ही महामार्ग ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात तिथे आळेफाटा गाव आहे. जेव्हा आपण पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं जुन्नर अशी ढोबळमानाने विभागणी करतो तेव्हा असं लक्षात येतं की जुन्नरच्या पश्चिम भागात जुन्नरचं बरचसं पर्यटन वैभव उभं आहे. 

 

जुन्नरच्या पश्चिम भागात जुन्नरच्या एकूण 7 किल्ल्यांपैकी 6 (जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिंदोळा, शिवनेरी) किल्ले आहेत, प्राचीन व्यापारी मार्ग, नाणे घाट आहे,  300 पेक्षा जास्त लेणी ( नाणेघाट, चावंड, तुळजा, अंबा-अंबिका, भूतलिंग, भीमाशंकर, लेण्याद्री, सुलेमान) आहेत, काही प्राचीन मंदिरं (कुकडेश्वर, खिरेश्वर) आहेत, मिना, कुकडी, पुष्पवती, कृष्णावती या नद्यांचे उगम आहेत, 5 धरणं आहेत, दऱ्याखोऱ्यातील निसर्ग रम्य पर्यटन स्थळे आहेत, 2 अष्टविनायक (गिरीजात्मज आणि विघ्नहर) आहेत. 

 

असं जरी असलं तरी जुन्नरच्या पूर्व भागात, जे काही मोजकं पर्यटन वैभव आहे; त्याची ख्याती, कालखंड आणि महत्त्व हे जुन्नरच्या पश्चिम भागातील पर्यटन वैभवाइतकच समतोल आहे.

 


आपल्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राला केंद्रबिंदू मानून, त्या ठिकाणाहून 20 किमी अंतराच्या आतील आणि 30 मिनिटांच्या प्रवासाच्या दरम्यान कोणकोणतं पर्यटन वैभव आहे हे आपण “जुन्नरची पूर्वाई" या लेखाच्या माध्यमातून पाहूया.

 

राजुरी गावातील पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र

 

पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्र हे आळेफाटाच्या पूर्वेला 7 किमी अंतरावरील, राजुरी गावांमध्ये उभारलेलं आहे. 2011 साली, महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव आयोजित करत पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राची सुरुवात झाली होती. मागील 12 वर्षात जवळपास 23 देशातील पाहुण्यांनी ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवासाठी या ठिकाणी भेट दिलेली आहे. 

 


श्री मनोज हाडवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रामध्ये ग्रामीण वस्तुसंग्रहालय, सृजन आर्ट गॅलरी, 1500 पुस्तकांचे वाचनालय, पराशर ऋषींची पर्णकुटी, ग्रामीण पद्धतीची कुडाच्या भिंती आणि शेणाने सारवलेली जमीन असलेली घरांची रचना आणि सोबतीला तितक्याच तन्मयतेने, मातीशी नातं सांगणाऱ्या चविष्ट व रुचकर जेवणाची मेजवानी... असा सगळा बेत असतो. www.hachikotourism.in या संकेतस्थळावर आपल्याला पराशर संदर्भातील अधिकची माहिती आणि बुकिंगसाठीची माहिती मिळेल.

 

इथं येणारे पै पाहुणे, ग्रामीण संस्कृतीचा कार्यानुभव घेत असताना, कधी जुन्नरच्या प्रेमात पडतात हे कळतही नाही. येणारे पाहुणे, आजूबाजूचा शेत शिवार, त्यातलं फळ फळावळ, भाजीपाला, गायीपालन, बकरीपालन, कुक्कुटपालन, मशरूम यांसारखे प्रयोग अनुभवतातच पण त्यासोबत आठवडी बाजार, गावाची रचना, गावातील शिक्षणपद्धती, आरोग्यव्यवस्था, प्रशासनव्यवस्था, सहकार चळवळ, 49 वर्ष जुनी दुग्धसंस्था याही गोष्टींचा कार्यानुभव घेत असतात. 

 


तसेच जुन्नरच्या पूर्व भागातील आणे पठार, आणे घाटातील नैसर्गिक पूल, बेल्हे गावचा आठवडी बाजार, बोरी गावातील टेफ्रा, जीएमआरटी, खोडद आणि जीएमआरटीचे अँटेना, नारायण गड, ज्ञानेश्वरांचे रेडा समाधी मंदिर, कळमजाईचं पठारयाही ठिकाणी पर्यटक; निसर्गाचा, विज्ञानाचा, भौगोलिक चमत्काराचा, कृषक संस्कृतीचा, प्रागैतिहासिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येत असतात.

 

आदर्श गाव-राजुरी

पराशर कृषि पर्यटन केंद्र राजुरी गावातच आहे. राजुरी गावाची रचना सुद्धा ऐतिहासिक आहे. गावात मुख्य बाजारपेठ, मधोमध असणारी चावडी आणि ग्रामपंचायत, तसेच बारा बलुतेदार आळी , रामवंशीआळी अशी सगळी, टिपिकल गावाची रचना अजूनही तशीच आहे. गुगल मॅप वर जर राजुरी गावचा नकाशा पाहिला तर अंडाकृती रचना आपल्याला बघायला मिळते.



राजुरी गावाचं वेगळेपण तसं अनेक अर्थाने सांगता येईल, इथं अल्पभूधारक असले तरी मेहनती, कष्टाळू शेतकरी आहेत. ते आपला शेतमाल निर्यात करत असतात. शेती क्षेत्रात, महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. गावातील मुले शिकून सवरून देश विदेशात कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार, उद्योग, शेती आदि क्षेत्रात आपलं नाव कमवत आहेत. गावात भावकीची बैठक आणि गावकीचा एकोपा आहे. गावात 49 वर्ष जुनी; गणेश सहकारी दूध संस्था नावाची सहकारी संस्था आहे, जिथे अनेक अभिनव उपक्रम चालतात. राजुरी नावानेच इथला दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा ब्रॅंड आहे.

राजुरी गावात 23000 पुस्तकांचे समृद्ध वाचनालय आहे. गावातील क्रेडिट सिस्टिम, हेल्थ सिस्टिम, शाळा, प्रशासन 400 वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सोहळे, होळी  ते रंगपंचमी होणारा शिमग्याचा तमाशा, श्रावण महिन्यातील मारुती मंदिरातील ग्रामउत्सव, गावातील पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली प्रसिद्ध पेढ्याची सातासमुद्रपार पोहोच, गावात मिळणारी प्रसिद्ध मिसळ आणि भेळ, शनिवारचा आठवडी बाजार... अशा अनेक गोष्टी पराशरवर येणारे देश विदेशातील पर्यटक अनुभवत असतात.



राजुरी गावाला जवळपास 2000 एकरचे वनक्षेत्र लाभले आहे. या वनक्षेत्राचा विस्तार पूर्व, ईशान्य आणि उत्तरेकडे पसरलेला आहे. पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्रापासून चालत गेलं तर, 15 व्या मिनिटाला आपण वनक्षेत्रात प्रवेश करतो. या ठिकाणी सामाजिक वाणिकरणाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले आहे. कमी पाण्यात वाढणाऱ्या झाडाझुडपांच्या या जंगलात अनेक पशू पक्षांचा अधिवास आहे. आजूबाजूच्या बागायती शेतीच्या आसऱ्याने राहणाऱ्या बिबट्या, तरस, उदमांजर, रानडुक्कर यांचा वावर असलेल्या पाऊलखुणा आपल्याला जंगलातून चालताना दिसून येतात.

 

आनंदवन तलाव, उंचखंडक

राजुरी गावाची वाडी म्हणता येईल असे आनंदवन/उंचखंडकवाडी या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. भैरवनाथांची यात्रा होळीच्या वेळी 2 दिवस असते. यात्रेला काठी पालखी, बैलगाड्यांच्या शर्यती, रंगीबेरंगी मजामस्तीची यात्रा, रात्री मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा असा पारंपरिक बाज असतो. उंचखंडक वाडीचा बैलगाडा शर्यतीचा घाट हा, जुन्नर तालुक्यातील मानाच्या बैलगाडा शर्यतीचा घाट मानला जातो.




बद्रीनाथ, गाढया डोंगर, खबडी, पालथा मारुती, दावल मलिक डोंगर ही काही ठिकाणे आहेत की जिथं छान डोंगर चढाई, नेचर वॉक, जंगल वाचन करता येते. उंचखंडक वाडीत बैलगाडा घाटाजवळ एक छोटासा तलाव आहे, या छोट्या तलावाच्या उत्तरेकडे जंगल आहे, जंगलात निलगिरीच्या झाडांमध्ये मातीच्या बंधाऱ्याचा जलाशय आहे. जेव्हा छान पाऊस पडतो तेव्हा हा जलाशय पूर्ण भरून, सांडव्यातून पाणी वाहू लागते. जलाशयाच्या पाण्यात निलगिरीच्या झाडांचे प्रतिबिंब मोठं लोभस वाटतं. निसर्गाची आवड असणारा माणूस तिथं इतका रमून जातो की वेळेचं भान रहात नाही.         

आठवडी बाजार, बेल्हे –

 

बेल्हे गाव, पराशर कृषि व संस्कृती पर्यटन पासून 9 किमी आणि 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला, दर सोमवारी बेल्हे गावात भरणारा बैल बाजार हा महाराष्ट्रात प्रसिद्ध असा आठवडी बाजार आहे. पण त्यासोबत एक दिवस आधी म्हणजे रविवारी त्या ठिकाणी मिळणारं, चुलीवरचं चिकन व मटन भाकरी तसेच मासवडी हे बैलबाजाराइतकंच प्रसिद्ध आहे. रविवारी दिवसभर खवय्ये लोकांची गर्दी या ठिकाणी होत असते. सोमवारी सुद्धा चिकन आणि मटन भाकरी उपलब्ध असते पण बाजाराच्या गर्दीमुळे तो निवांतपणे, जेवणाचा आस्वाद येत नाही, म्हणून रविवार हा योग्य दिवस आहे.

 



सोमवारी, सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला असतो, छान सजवलेले बैल, पाठीवर गुलाल, तुकतुकीत कातडी, काजळ घातलेले वाटावेत असे बोलके डोळे..बैलबाजारातील सगळा परिसर रंगीबेरंगी दिसत असतो. बैलांचा, हातांच्या बोटावर व्यवहार कसा केला जातो? दात बघून बैलांचे वय कसे काढले जाते? या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवण्यासारख्या असतात. साधारणपणे, बारा वाजेपर्यंत बैल बाजार संपलेला असतो.

 

दहा वाजल्यापासून इतर शेती संस्कृती आधारित आणि शेती अर्थव्यवस्थेला पूरक अशी बी बियाणे, कडधान्य, शेती अवजारे व मशागतीची अवजारे, बैलांसाठीचे कासरे, मोरख्या, वादी , चाबूक, आसूड, वेसण, बैलपोळा जवळ आला असेल तर बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज, सोबतीला मसाल्याच्या पदार्थांची दुकाने, भाजीपाला, फळं, मिठाया, कपडे, चामड्याच्या चपला शिवणारे, पान , कात चुना व तंबाखू विकणारे, भांडीकुंडी, पुस्तके, गृह्पोयोगी वस्तूंची दुकाने, बोंबील, तंबू मधील किराणा दुकाने...अशी एक ना अनेक गोष्टींची रेलचेल या आठवडी बाजारात अनुभवास मिळते. चित्रकाराने कॅनव्हास वर विविध रंग सांडून छान चित्र काढावे असं रंगीबेरंगी माणसांचा, दुकानांचा मिलाफ या आठवडी बाजारात बघायला मिळतो.

 



बेल्हे गावातील आठवडी बाजाराला आजूबाजूच्या पंचवीस तीस गावांचे अटॅचमेंट आहे. हा मुक्त आभाळाखालचा मॉल; विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणारे यांच्या पुरताच मर्यादित न राहता, पाहुण्यारावळ्यांच्या भेटीगाठीचं  आणि ख्यालीखुशाली विचारण्याचे सुद्धा एक व्यासपीठ बनत असतो. या आठवडी बाजाराची परंपरा काही शेकडो वर्षापासूनची जुनी आहे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी असणारा हा आठवडी बाजार आवर्जून सुट्टी काढून दिवस घालवावा असा समृद्ध अनुभव आहे.

 

भारतातील सर्वात मोठा नैसर्गिक पूल-आणे घाट

 

आणे घाट हा पराशर कृषि व संस्कृती पर्यटन पासून 14  किमी आणि 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. आळेफाट्याहुन आपण महामार्गाने आणे गावाकडे जात असताना, गुळंचवाडी सोडल्यानंतर नागमोडी वळणाचा एक छोटीखाणी घाट लागतो, तोच आणे घाट. घाटातील गणपती मंदिराजवळ; मंदिराच्या विरुद्ध बाजूला, मळगंगा देवीची कमान दिसू लागते कमानीतून दरीत उतरणाऱ्या पायऱ्यांनी 5-10 मिनिटाच्या उतरणीला उतरून गेलं की आपण खाली पोहोचतो. तिथं मळगंगा मातेचे मंदिर आहे आणि सोबतीला आहे निसर्गाचा चमत्कार, नैसर्गिक पूल.

 


डोंगराची एक नाळ दरीत उतरलेली आहे, तिला चार महिने पडणाऱ्या फक्त पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने दगड कापला जाऊन, हजारो वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेतून, एक मोठं भगदाड पडलेलं आहे. त्या भगदाडाचा आकार 9 मीटर रुंद आणि 21 मीटर उंच एवढा असून, पश्चिमेच्या बाजूला छोटीशी गुहा कोरलेली आहे.

 

निसर्गाचा हा चमत्कार बनण्यासाठी हजारो वर्षे लागलेली आहेत, 1984 साली, "डेक्कन जिओग्राफर" नावाच्या जर्नलमध्ये, नैसर्गिक पूल गुळंचवाडी, आणे घाट संदर्भात; डॉक्टर क्षीरसागर आणि डॉक्टर फडके या भुवैज्ञानिकांनी एक संशोधन पेपर सादर केला. अग्निजन्य खडकाच्या खालच्या स्तरातपावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेला, भारतातील हा सर्वात मोठा पूल असून त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून का जतन केले जाऊ नये अशा आशयाचा मजकूर त्यांच्या संशोधन पत्रात त्यांनी दिलेला आहे. 

 


नैसर्गिक पुलाच्या नाळीवाटे वाहणाऱ्या झऱ्यामुळे, चांगला पाऊस जर झाला असेल तर छान धबधबा त्या ठिकाणी वाहत असतो. त्या ठिकाणचे दोन धबधबे पर्यटकांना वर्षासहलीचा आनंद देतात. परिसरातील गिरीपुष्पाचे जंगल मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पुलाच्या सौंदर्यात भर घालत असते. आजूबाजूचा डोंगर दरीचा परिसर तुडवत असताना, पाण्याचे जीवंत झरे, बैलवाटा, नागमोडी घाटवाट असा सगळा नयनरम्य परिसर वेळेचं भान हरवून जायला लावतो.  

 

निसर्गरम्य आणे पठार

आणे पठार हे पराशर कृषि व संस्कृती पर्यटन पासून 20 किमी आणि 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. जुन्नर तालुक्याच्या एकदम पूर्वेकडे आणे घाट चढून गेलं की विस्तीर्ण पठार दिसू लागतं. या डोंगर चढउताराच्या टेकड्यांवर पवनचक्क्या स्थिरावलेल्या आहेत. आणे घाट चढून गेल्यानंतर गाडी जरा सावकाश चालवावी, आपण जरी महामार्गावरून जात असलो तरी, कधी एखादं काळवीट किंवा चिंकारा रस्ता क्रॉस करत असेल हे आपल्याला कळणारही नाही. 

 


जराशी वाट वाकडी करून, महामार्ग सोडून, आपण आणे पठारावर थोडंस आतमध्ये गेलात, तर आपल्याला अगदी 5 ते 25 च्या समूहाने काळवीट दिसू शकतील. हे कुठलंही आरक्षित क्षेत्र नाही किंवा पार्क नाही. हे सर्व चिंकारा, काळवीट, कोल्हे, ससे असे प्राणी आपल्या नैसर्गिक अधिवासात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 

 

पक्षी निरीक्षणासाठी तर पंढरी समजता येईल असा सगळा परिसर आणे पठाराचा आहे. अनेक दुर्मिळ पक्षी या पठारावर आपल्याला बघायला मिळू शकतात. मग त्यामध्ये शृंगी घुबड, काटेरी झाडांना घरटी केलेली सुगरणीची खोपी, खाटीक, कोतवाल, चिरक, बुलबुल, सातभाई, टिटवी, कापशी घार, चंडोल, मुनिया अशी एक ना अनेक पक्षांची मांदियाळी आपल्याला या पठारावर बघायला मिळते.

 


आणे पठारावर चुनखडीचे दगड मोठ्या प्रमाणात दिसून येतात, वेगवेगळ्या रंगाचे दगड, गारगोटी, आपल्याला सिन्नरच्या गारगोटी म्युझियम ची आठवण करून देतात 

 


मुख्य म्हणजे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूत हे पठार विविध रंगांनी नटलेलं असतं. इथे क्षितिजापर्यंत दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त हा नजरे सोबत मनातही भरून, कायमचा आठवणीत ठेवावा असा असतो.

 

8 लाख वर्ष जुनी टेफ्रा असणारं प्रागैतीहासिक बोरी गाव

 

बोरी गाव हे पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्रापासून 13 किमी अंतरावर असून तिथं पोहोचायला 25 मिनिट लागतात. कुकडी नदीच्या काठावर वसलेलं बोरी हे प्राचीन व्यापारी मार्गावरचं गाव आहे. डेक्कन कॉलेज पुणे यांनी केलेल्या उत्खननातून इथं मॅमोथ हत्तीचा हस्तिदंत, अश्मयुगीन हत्यारं, हजारो वर्षांच्या लोकवस्तीचे पुरावे सांगणारे खापराचे तुकडे इत्यादि गोष्टी समोर आल्या आहेत. बोरी गावचा कालखंड त्याही मागे जावून 8 लाख वर्षापूर्वीचा  भौगोलिक वारसा सांगत असतो. 8 लाख वर्षापूर्वी 5000 किमी अंतरावरील इंडोनेशिया देशातील ज्वालामुखीचा उद्रेक होऊन, बोलीभाषेतील राख आणि वैज्ञानिक भाषेतील टेफ्रा आकाशात भिरकावली गेली. जेव्हा ती पृथ्वीवर पडली तेव्हा बोरी आणि परिसरातील गावांमध्ये विखुरली गेली.

 



बोरी गावातील नदीच्या पात्रात, टेफ्राचे खडक रूपी प्रारूप बनले. पुणे विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज यांनी या टेफ्रा वर मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे. बोरी गावाचे गावकरी सजग होऊन, शासनाकडे पाठपुरावा करत, गावामध्ये या पर्यटन वारशाला घेऊन जनजागृती करत आहेत. पर्यटन समिति स्थापन करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सापडलेल्या इतिहासाच्या खुणांचे जतन केले आहे. एका जुन्या वाड्यात छोटेखानी संग्रहालय बघायला मिळते. बोरी गावात छान बांधणी असलेले वाडे आहेत, 12 बलुतेदारी आहे, 1200 वर्ष जून स्फटिकाचे शिवलिंग असलेले मंदिर आहे. ज्याला भूगोलाची आवड आहे असा पर्यटक संपूर्ण 1 दिवस जरी बोरी परिसरात फिरला तरी मन भरणार नाही एवढ्या गोष्टी या गावात आहेत.  

 

जीएमआरटी खोडद आणि नारायणगड

जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह् रेडिओ टेलिस्कोप) ही आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण आहे. जीएमआरटीचं मुख्यालय खोडद या गावी आहे. 1995 साली डॉ गोविंद स्वरूप यांच्या संकल्पनेतून साकारलेली जीएमआरटी भारतातील इस्रो नंतरची महत्वाची संस्था आहे. जी एम आर टी च्या एकूण 30 एनटेना आहेत, ज्या इंग्रजी “Y” आकाराच्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आहेत. “Y” मधील 3 रेषा म्हणजे पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला या 30 एनटेनांची उभारणी करण्यात आलेली आहे. जी एम आर टी ला भेट देण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी खोडद या ठिकाणी जाता येते, पण त्यासाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.  



पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्रापासून, जीएमआरटी ची पूर्वेच्या रेषेवरील E-05 क्रमांकाची एण्टेना, अवघ्या 6 किमी अंतरावर आहे, जिथे 15 मिनिटांत पोहोचता येते. जीएमआरटी विषयी सामान्य माणसाला गरेजची आहे तेवढी माहिती त्या ठिकाणी आपला गाईड सांगतो. आणे घाट, आणे पठार, बेल्हे गाव याच मार्गावर असलेली ही एण्टेना सहज बघता येते.

विज्ञान दिन, 28 फेब्रुवारीला, जीएमआरटी च्या मुख्यालय खोडद या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे विज्ञान प्रदर्शन भरत असते. त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोकं जीएमआरटी ला भेट देत असतात.



खोडदजवळच गडाचीवाडी गावात, जुन्नरमधील पूर्वेकडचा एकमेव किल्ला आहे, नारायणगड. हस्ता मातेच्या आशीर्वादाने उभा असलेला हा किल्ला इतिहासाच्या काही खुणा अंगाखांद्यावर वागवत असतो. चढाईला सोपा असणारा नारायणगड, त्याच्या काही कोरीव पायऱ्या, खोदिव टाक्या आणि काही मोजक्या शिल्पाकृतींमुळे किल्ले चढाईचं समाधान देतो. नारायणगडावरुन आजूबाजूचा विहंगम परिसर नजरेत भरतो.      

ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिर

ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिर हे पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्रापासून 9 किमी अंतरावर आहे व इथं पोहोचायला 15 मिनटे लागतात. संत ज्ञानेश्वरांनी, पैठण येथे, रेडयाच्या मुखी वेद वदवून, नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगून, सगळी भावंडं आणि रेडा आळंदीकडे जात असताना, डोंगर दऱ्यातून वाट काढत होते. लांबची पायपीठ आणि प्रवास करून रेडा थकला आणि आळे या गावी त्याने आपले प्राण सोडले अशी कथा सांगितली जाते. संत नामदेवांनी सुद्धा, “येऊनिया स्थिरावला आळेचीया बनी, पशू तये स्थानी शांत जाहला” असे वर्णन या घटनेचे केले आहे. रेडा समाधी मंदिरात अखंड वीणावादन सुरू असते. चैत्र महिन्यातील वरुथीनी एकादशीला रेडा समाधी यात्रा उत्सव असतो. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत खेळणी, खाण्यापिण्याची रेलचेल तर असतेच पण घरगुती वस्तूंची मोठी बाजारपेठ सजते, कुस्त्या रंगतात, एरवी बाजारात न दिसणाऱ्या दुर्मिळ गोष्टी यात्रेत विक्रीसाठी येत असतात.



अध्यात्माची ओढ असणारी व्यक्ति इथे क्षणभर जरी बसली तरी, ज्ञानोबा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमितील सकारात्मक ऊर्जा नक्की अनुभवायास मिळते.      

कळमजाई पठार

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्रापासून, कळमजाईचं पठार 15 किमी अंतरावर आहे. कळमजाई पठाराचे प्रवेशद्वार वाटावा असं छोटेखानी घाट चढून गेल्यावर आपण कळमजाई पठारावर पोहोचतो. नजर जाईल तिथपर्यंत डोंगरदऱ्यांचे दृश्य, कळमजाई मातेचे मंदिर, मंदिरासमोरील शेकडो वर्ष जूने, अनेक बदलांचा साक्षीदार असलेले विस्तीर्ण झाड, एवढ्यातच बनवलेला बैलगाडा शर्यतीचा घाट, मोरदऱ्याचा जलाशय, उशाला असणारा गव्हाळ्या डोंगर आणि नशिबाने होणारे चिंकारा, मोर आणि माकड दर्शन. ऋतु कुठलाही असो, सोसाट्याचा वारा आपल्या स्वागताला कायम हजर, स्वच्छ वातावरण असेल तर दुरवरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. सूर्योदय आणि सूर्यास्त अगदी फ्रेम करून ठेवावेत असे दिसतात.



एकट्याने किवा सोबतीने छान पायपीट करावी, आजूबाजूच्या निसर्गासोबत मन मोकळं करावं, सकाळी असाल तर गुरं रानाला जाताना बघावी आणि संध्याकाळ असेल तर गोरज मुहूर्त कसा असतो हे अनुभवावं, कितीही सावध रहा, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण तुम्हाला बेसावध करून, तुमचीच शिकार करते, तुम्हाला तुमच्यापासून लांब घेऊन जाते. इथं उघड्या डोळ्याने ध्यान लागतं. इथं ऊंची आहे, खोली आहे, क्षितिज आहे, पाणी आहे, आकाश आहे..। पंचमहाभूतांची अनुभूति आहे. कदाचित त्यामुळेच इथे जाणारा प्रत्येक व्यक्ति पुन्हा पुन्हा इथे जातच रहातो.    

थोडक्यात काय तर, पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून, आपल्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांना शेत शिवार, गाव, निसर्ग, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, या सगळ्याचीच अनुभूति मिळते. मग त्यात शालेय सहली असो, कौटुंबिक सहली असो, कॉर्पोरेट सहली असो किवा एकट्या दुकट्याने फिरणं असो.

मनोज हाडवळे

संस्थापक संचालक

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन

हचिको टुरिझम

जुन्नर पर्यटन विकास संस्था

7038890500