Sunday 17 September 2023

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन – इट्स नॅचरली ऑर्गनिक/भारत समजून घ्यायचा असेल तर

 

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन – इट्स नॅचरली ऑर्गनिक/भारत समजून घ्यायचा असेल तर  

 




पराशर कृषि व संस्कृती पर्यटन- मनोज आणि नम्रताचं, त्यांनी स्वतः उभारलेलं छोटसं विश्व. ज्यात आनंद आहे, अनुभूति आहे, आस्वाद आहे, अनुभव आहे, आवाका आहे, आकर्षण आहे आणि आणखी बरंच काही आहे.

 मनोज, कृषि पदवीधर, तर नम्रता फाईन आर्ट्सची डिग्री घेतलेली. मनोजला शेतीची बहुआयामी जाण; मग त्यात शेतीचा इतिहास, प्रत्यक्ष पिकं, त्यांची रंजक माहिती, पारंपरिक ते आधुनिक शेतीचा प्रवास, शेतीचे अर्थकारण, शेती- एक संस्कृती, व्यवसाय, जीवनपद्धती, शेतकरी, गाव आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अशी यादी वाढतच जाईल. मनोज त्याच्या लेखणीतून व्यक्त होतो आणि बोलताना थकत नाही. तर नम्रता तेवढीच मितभाषी पण रंगांमधून आपलं म्हणणं मांडणारी.





 उभयतांच्या मेहनतीने आणि निसर्गाच्या साथीने, उभं राहिलेल्या पराशर कृषि व संस्कृती पर्यटनाने, 2011 पासून, अनुभवसिद्ध पर्यटनाची कास धरत, आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातीलच नाही, भारतातीलच नाही तर जगभरातील जवळपास 23 देशातील पाहुण्यांना;  भारताच्या कृषि व ग्रामीण संस्कृतीचा अनुभव दिलाय. ग्रामीण जनजीवन अनुभविण्याचं हे ठिकाण अनेक लोकांसाठी, आपलं हक्काचं घर बनलय. पुण्याहून 2 तास, मुंबईहून 4 तास, नाशिकहून दीड तास, आणि नगरहून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या मध्यवर्ती ठिकाणावरील पराशर कृषि व संस्कृती पर्यटन अनेक कारणांसाठी लोकांच्या पसंतीस उतरतय. मग त्यात  ग्रामीण संस्कृतीचा अनुभव, शेतीच्या गोष्टी, गावातून फेरफटका, आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेटी देत असताना, आजूबाजूचा ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देतो.



        शेणाने सारवलेली जमीन, कुडाच्या भिंती, पांघरायला गोंधड्या, अगदी luxary नसली, तरी बेसिक कंफर्ट असणारी मुक्काम व्यवस्था, स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणारे रुचकर जेवण, स्वच्छ परिसर, मोकळी हवा आणि तितकीच प्रेमळ माणसं,  सोबतीला ग्रामीण वस्तूंचं संग्रहालय, देशी बी-बियाण्याची ओळख सांगणारी सिड बँक, 1000 पुस्तकांची लायब्ररी, नम्रताच्या वारली आर्ट, कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, स्टोन पेंटिंगने सजलेली आर्ट गॅलरी मचान, पराशर ऋषींची पर्णकुटी, छोटे छोटे शेतीचे प्रयोग असं बरंच काही. त्याच्या सोबतीने आजूबाजूच्या शेतकाऱ्यांशी गप्पा मारण्याची, त्यांच्या शेतावर, त्यांच्या सोबत काही वेळ थांबण्याची संधी , एक संध्याकाळ शेतकऱ्याच्या घरी मग त्यात गायींच्या धारा काढणं, बकरीला चारा देणं, कोंबडयाना दाणे टाकणं, शेणकोर काढणं.. अशी यादी वाढतच जाईल.



  इथं येणारे पाहुणे अनेक कारणांसाठी येत असतात. मग कोणी आपल्या फॅमिली सोबत कधी निवांत रहायला, तर कधी मुलांना शेती, माती आणि गाव दाखवायला येतो, तर कोणी आपल्या कंपनीतील मित्र मैत्रिणींसोबत जुन्नर परिसर फिरायला, ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला येतो. कोणी कधी एकट्यानेच इथं येऊन आराम करतो; स्वतःला, स्वतःचाच वेळ देतो. इथं सोलो ट्रॅवलर तर खूप वेळा येतात, आणि त्यात मुलींचं प्रमाणही जास्त आहे.  भारताच्या अभ्यासाला आणि भारत अनुभवायला आलेल्या परदेशी अभ्यासकांसाठी पराशर हे पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. 



इथं येऊन गेलेल्या सेलिब्रिटी लोकांची यादी खूप मोठी आहे. Nawazuddin सिदिकी, पूजा बत्रा, दीप्ती भटनागर, माही गिल, निरंजन आयंगर, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, उर्मिला कानेटकर, फुलवा खामकर, मिलिंद गुनाजी, संदीप कुलकर्णी, संदीप पाठक, शुभांगी लाटकर, पूजा नायक अशी कलाकार मंडळी तर राजदत्त, लक्ष्मण उतेकर, कुलदीप रूहिल अशी लेखक दिग्दर्शक मंडळी तर विना गवाणकर (एक होता कारव्हर) यांच्या सारखी लेखक मंडळी इथं राहून गेली आहेत. जेव्हा जुन्नरमध्ये काही शूटिंग सुरू असते तेव्हा कलाकारांना रहायला इथे आवर्जून यावेसे वाटते. एमएक्स प्लेयर वरील प्रसिद्ध वेबसिरीज “आश्रम” चे लेखन पराशरमध्ये थांबूनच पूर्ण करण्यात आलंय.



इथं रीडिंग हॉलिडे साठी, पेंटिंग करण्यासाठी, नृत्य, गायनाची कार्यशाळा घेण्यासाठी, आपल्या आवडीच्या लोकांसोबत गप्पा मारण्यासाठी, मोठी सुट्टी एंजॉय करण्यासाठी लोकं आवर्जून येतात. पराशरच्या प्रांगणात तर तुम्हाला खूप काही करता येतं आणि काहीच करायची गरज नसते. नुसतं एका ठिकाणी बसून जरी राहिले तरी तुमच्या नजरेसमोर निसर्गाचा बहूपात्री प्रयोग अनुभवायला मिळू शकतो. मग कधी एखादा नाचरा आपला नाच दाखवून जाईल, हळद्या थोडी झलक देईल, सूर्यपक्षी फुलातील मकरंद घेताना चमकून जाईल, दयाळ झाडाच्या शेंडयावर बसून सुर आळवेल, वाहत्या वाऱ्यासोबत डोलणाऱ्या फांद्यांना एकटक बघत राहिलं तर आपणही नकळत ती लय पकडून डोलू लागतो.  आणि यातलं काहीच नाही जाणवलं तरी तिथली हंसाची जोडी तुमचं मनोरंजन करतेच करते.



महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणुन जुन्नरचं नाव घेतलं जातं. हे होण्यात मनोजचा वाटा मोठा आहे. त्याने 2011 साली जुन्नर पर्यटन विकास संस्था सुरू केली, 2013 मध्ये जुन्नर तालुक्याचा पर्यटन नकाशा बनवला, जुन्नरमध्ये जबाबदार पर्यटन चळवळ सुरू केली. जुन्नरमध्ये किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, घाटवाटा, डोंगरदऱ्या, आठवडी बाजार, आध्यात्मिक अधिष्ठान, यात्रा जत्रा, बैलगाडे शर्यती, तमाशे, हटके लोकं ... असं बरंच काही आहे. हे सर्व बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर मोठी सुट्टी काढून यायला पाहिजे.



एरवी जुन्नर फिरायला येऊन एखाद्या हॉटेल मध्ये राहिले तर जुन्नरचा पर्यटन वारसा जरी बघायला मिळाला तरी इथल्या स्थानिक जुंदरी संस्कृतीच्या अनुभवाला मुकाल. पण  पराशरचा मातीतला अनुभव तुमची जुन्नरची ट्रीप पूर्णत्वास घेऊन जातो. जुन्नरमधून पुणे-नाशिक आणि मुंबई-विषाखापट्टणम असे 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, हे दोन्ही महामार्ग ज्या  याठिकाणी एकमेकाला छेदतात ते ठिकाण आहे आळेफाटा, आळेफाट्या पासून अवघ्या 7 किमी अंतरावर, राजुरी गावात पराशर कृषि व संस्कृती पर्यटन वसलय.



 इथल्या सगळ्या अॅक्टिविटी तर अनोख्या आहेतच पण मनोज आणि नम्रताने काही अभिनव खेळ शोधून काढले आहेत, या खेळांच्या माध्यमातून रंजकपणे शेती, अन्ननिर्मिती, फळभाज्यांची ओळख, मातीची धूप, जल साक्षरता इत्यादि मुद्दे हसत खेळत मुलांपर्यंत पोहोचवता येतात. म्हणुन तर शालेय सहलींसाठी, पराशर कृषि व संस्कृती पर्यटन हे आवर्जून जावं असं आहे. शिवाय मनोजच्या शेती शिक्षणाचा फायदा इथे येणाऱ्या शाळा कॉलेजच्या सहलींना होतो. मनोजच्या माध्यमातून शेती आणि ग्रामीण भारत यांचं नातं बहुआयामाने समजून घेता येतं. म्हणुन तर एमबीए, कॉमर्स, इकॉनॉमिक्स चे विद्यार्थी, ग्रामीण अर्थव्यवस्था, तिथले स्टेक होल्डर्स, त्यावर परिणाम करणारे घटक, उपयुक्ततेचा नियम  समजून घेण्यासाठी पराशर वर येतात. पराशरची रचना ईकोफ्रेंडली आहे, ईकोफ्रेंडली अर्कीटेक्चरचा अभ्यास करायला भारतभरातून विद्यार्थी आणि कॉलेजच्या सहली येतात. मनोज, कृषि व ग्रामीण पर्यटन संकल्पनेचा प्रशिक्षक व सल्लागार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन कमिटीवर पण तो आहे. भारतातील कृषि पर्यटन संकल्पना समजून घ्यायला, परदेशातील अभ्यासक पराशरवर आले  आहेत.   



स्वतःभवती कृत्रिम वलय तयार झालं, स्वतःला स्वतःचाच वेळ मिळेनासा झाला, जगरहाटीच्या वेगात हरवून जायला झालं,  स्वतःलाच स्वतःची ओळख पटेनासे झालंय तर मग स्वतःचा शोध घेण्यासाठी पराशर एकदम योग्य जागा आहे.   

थोडक्यात काय तर तुमच्याकडे पराशरवर येण्यासाठीची खूप सारी निमित्त आहेत, कारणं आहेत. आणि खरतर इथं येण्यासाठी काही विशिष्ट कारणच हवं असंही काही नाही. एकाच वर्षातील वेगवेगळ्या वेळी जरी तुम्ही इथं गेलात तरी तुमचा अनुभव दर वेळी वेगवेगळा असेल.            

   


      पराशर कृषि व संस्कृती पर्यटन हे व्यावसायिक असूनही आपला घरगुती बाज जपून आहे. इथं आल्यावर तुम्हाला कुठल्या हॉटेल, रिसॉर्ट किवा पर्यटन केंद्रावर आल्याचा फील येत नाही, तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी आल्यासारखे हक्काने वावरू शकता. मुंबई पुण्यात राहणारी महाराष्ट्रा बाहेरची लोकं, इथं आल्यावर, त्यांच्या मातीतला खाद्यपदार्थ इथं बनवू शकतात आणि त्यांच्या मातीची आठवण या मातीत राहून फील करू शकतात.



      तुमच्या इथल्या मुक्कामात मनोज आणि नम्रताशी होणाऱ्या तासभर गप्पा जर रंगल्या तर अजून दुग्धशर्करा योग. अशा गप्पांमधून मैत्री झालेल्या पाहुण्यांची शिदोरी हीच आमची  शाश्वत कमाई आहे हे सांगताना ते दोघंही कुठलाही बडेजाव न आणता तुमच्या सेवेशी तत्पर असतात. इथला सर्वात लहान पर्यटक 2 महिन्यांचा होता आणि सर्वात वयस्कर 85 वर्षांचा होता.

वर्षभर वेगवेगळ्या सीजनमध्ये काही न काही कृषि महोत्सव इथे होत असतात. तसेच पराशरच्या सहयोगाने वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवसिद्ध पर्यटनाचे उपक्रम वर्षभर घेण्यात येतात.    मग त्यात द्राक्ष महोत्सव, रानभाजी महोत्सव, काजवा महोत्सव, तमाशा महोत्सव, यात्रा जत्रा महोत्सव, एक दिवस आठवडी बाजारात, एक दिवस धनगरराजासोबत, भात लावणी, खळे महोत्सव अशी यादी वाढतच जाईल.   

गांधीजी म्हणायचे, भारत समजून घ्यायचा असेल तर खेड्याकडे चला. पराशरच्या माध्यमातून, भारत समजून घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. कारण पराशर नॅचरली ऑर्गनिक आहे.

पराशर विषयी डिटेल व्हिडीओ

https://youtu.be/bETP0DsR7XY?si=6Vb5PyVz2aI0me0r इथं पहायला मिळेल.

 

No comments:

Post a Comment